नागपूर : महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) उमेदवारामार्फत साधा संपर्क आणि विचारणाही होत नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे (Nationalist Congress) नेते आणि मतदार सदस्य संभ्रमात पडले आहेत. याचा फटका विधान परिषदेच्या निवडणुकीत (Legislative Council elections) काँग्रेसच्या उमेदवारास बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.
विधान परिषदेसाठी काँग्रेसने रवींद्र भोयर (Ravindra Bhoyar) यांना उमेदवारी दिली आहे. त्यांचा सामना भाजपचे दिग्गज उमेदवार माजी ऊर्जा व पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबत आहे. काँग्रेसने स्वयंसेवक व भाजपचे नगरसेवक असलेल्या भोयर यांनाच गळाला लावल्याने रंगतदार लढत होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
स्वतः काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी काँग्रेसच्या बैठकीत भोयर यांची हमी घेतली होती. पशुसंवर्धनमंत्री सुनील केदार (Sunil Kedar) यांची पहिली पसंती ज्येष्ठ नगरसेवक प्रफुल गुडधे यांना होती. मात्र, पटोले आपल्या मतावर ठाम राहिल्याने गुडधे यांनी उमेदवारी मागे घेतली. सध्या विधान परिषदेच्या आखाड्यात फक्त तीन उमेदवार आहेत.
महाविकास आघाडीच्या तुलनेत भाजपकडे मताधिक्य अधिक आहे. असे असले तरी अंतर्गत असंतोषाचा फायदा काँग्रेसला उचलता येऊ शकतो. यापूर्वी राजेंद्र मुळक उमेदवार असताना भाजपकडे ४५ मतदार अधिक होते. यानंतरही चार मतांनी मुळक निवडून आले होते. भोयर अद्याप मतदारांपर्यंत पोहोचलेले नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेसकडे २४ मतदार आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करून आठवडा उलटून गेला आहे. मात्र, काँग्रेसच्यावतीने आघाडीतील राष्ट्रवादी आणि शिवसेनेसोबत पक्षस्तरावर साधी बैठक अद्याप झाली नाही. कुणी नेता यासाठी पुढाकार घेतानाही दिसत नाही.
स्वतः उमेदवारांनी संपर्क साधला नसल्याने राष्ट्रवादीचे मतदारही नाराज आहेत. नागपूर शहरात राष्ट्रवादीचा एकच नगरसेवक आहे. दुनेश्वर पेठे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आहेत. ग्रामीणमध्ये २३ मतदार आहेत. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबा गुजर यांनीसुद्धा काँग्रेस तसेच उमेदवारानेसुद्धा आमच्यासोबत संपर्क साधला नसल्याचे सांगितले.
राष्ट्रवादीचे आठ जिल्हा परिषद सदस्य आहेत. याशिवाय नरखेड, हिंगणा, वानाडोंगरी नगरपालिकांमध्ये सदस्य आहेत. एकूण संख्या २४ इतकी आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीत ही संख्या निर्णायक मानली जाते. असे असतानाही राष्ट्रवादीसोबत काँग्रेसमार्फत समन्वय का साधला जात नाही याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
आमच्यासोबत काँग्रेसचे उमेदवार रवींद्र भोयर वा काँग्रेसच्या एकाही नेत्याने अद्याप संपर्क साधला नाही. आघाडीचा धर्म म्हणून आम्ही काँग्रेससोबत आहोत. तशा सूचना पक्षश्रेष्ठींकडून आम्हाला आल्या आहेत. महाविकास आघाडी तयार करण्यात राष्ट्रवादीची भूमिका महत्त्वाची आहे. त्यामुळे काँग्रेसने राष्ट्रवादीच्या मतदारांना मानसन्मान देणे अपेक्षित आहे.- बाबा गुजर, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.