नागपूर : नागपूरची आंतरराष्ट्रीय महिला बॅडमिंटनपटू(International women's badminton player) मालविका बन्सोडने (malwika bansode)दिल्ली येथे सुरू असलेल्या इंडियन ओपन बॅडमिंटन स्पर्धेत गुरुवारी लंडन ऑलिंपिकमधील ब्रॉंझपदकविजेत्या साईना नेहवालवर अनपेक्षित विजय मिळविल्यानंतर मालविकावर सर्वच स्तरातून कौतुकाचा वर्षाव करण्यात आला. मालविकाचा हा विजय अविश्वसनीय, ऐतिहासिक आणि अभिमानास्पद असल्याची प्रतिक्रिया देश-विदेशात असलेल्या नागपूरकरांनी व्यक्त केली. नागपूरच्या लेकीने साईना नेहवालचा पराभव केला याबद्दल तिचे अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा अशी प्रतिक्रिया क्रीडा मंत्री सुनील केदार यांनी दिली.
कौतुक करावे तेवढे कमीच : माकोडे
मालविकाचे पहिले प्रशिक्षक किरण माकोडे आपल्या शिष्याच्या कामगिरीवर आनंद व्यक्त करताना म्हणाले, साईनाविरुद्ध मालविका खरोखरच खूप छान खेळली. तिचे जेवढे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. मालविकाने आतापर्यंत खूप मेहनत केलेली आहे. त्याचेच हे फळ आहे. मालविकाचे एक वैशिष्ट्य आहे. तिला जे काही सांगितले, ते शांतपणे ऐकून त्यावर मेहनत घेते. त्यामुळेच तिने इतकी मोठी झेप घेतली आहे. मालविकाची सध्याची कामगिरी लक्षात घेता तिचे भविष्य उज्ज्वल आहे.
मालविकाच्या कामगिरीचा अभिमान : मुनीश्वर
द्रोणाचार्य क्रीडा पुरस्कारविजेते विजय मुनीश्वर यांनीही मालविकाच्या कामगिरीवर आनंद व्यक्त केला. ते म्हणाले, मालविकाची कामगिरी अभिमानास्पद असून, नागपूरकरांची छाती फुगविणारी आहे. साईनासारख्या दिग्गज खेळाडूला इतक्या सहजपणे हरविणे सोपी गोष्ट नाही. यामागे केवळ मालविकाचीच मेहनत नाही. तिच्या आईवडिलांचेही तितकेच योगदान आहे. मालविकाने असेच सातत्य कायम ठेवल्यास भविष्यात नक्कीच ती देशासाठी ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवू शकते.
मालविकाच्या आयुष्यातील मोठा विजय : डॉ. तृप्ती
मुलीच्या विजयाचा सर्वाधिक आनंद अर्थातच आईला झाला. मालविकाच्या ऐतिहासिक विजयावर प्रतिक्रिया व्यक्त करताना डॉ. तृप्ती बन्सोड म्हणाल्या, ज्या खेळाडूला टीव्हीवर पाहून मालविका लहानाची मोठी झाली, जिला ती आपला आदर्श मानते, अशा खेळाडूला (saina nehwal)पराभूत करणे खूप मोठी गोष्ट आहे. दुर्दैवाने कोरोनामुळे इनडोअर स्टेडियममध्ये प्रेक्षकांना परवानगी नसल्याने मला मालविकाचा सामना लाइव्ह पाहता आला नाही. परमेश्वराचे आशीर्वाद, प्रशिक्षकांनी घेतलेली कठोर मेहनत आणि सहकारी खेळाडूंच्या मदतीमुळेच ती हे यश मिळवू शकली.
सोशल मीडियावर कौतुक
मालविकाच्या विजयाचे सोशल मीडियावर खूप कौतुक झाले. अनेकांनी व्हाट्सॲप, फेसबुक, ट्विटर व इंस्टाग्रामवर मालविकाचे छायाचित्र टाकून तिचे अभिनंदन केले. तिच्या ऐतिहासिक विजयाची सोशल मीडियावर दिवसभर चर्चा होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.