टाकळघाट (जि. नागपूर) : पती-पत्नीत होणारा विकोपाला गेला म्हणून ती पोलिस ठाण्यात नवऱ्याची तक्रार करायला गेली. इकडे दारु ढोसलेल्या नवऱ्याचा पोलिसांच्या भीतीने थरकाप उडाला. त्याने रागाच्या भरात पोटच्या दोन वर्षीय चिमुकलीची ब्लेडच्या पात्याने गळा कापून हत्या केली. पोलिसांना घेऊन आई घरी परतली. पाहते ते काय, चिमुकल्या राधिकेचा मृतदेह पाहून तिने काळजाला पाझर फोडणारा हंबरडा फोडला. ही खळबळजनक घटना एमआयडीसी बुटीबोरी ठाण्याच्या हद्दीतील गणेशपूर येथे सोमवारी सायंकाळच्या सुमारास घडली. मृत चिमुकलीचे नाव राधिका किशोर सोयाम (वय२)असून आरोपी वडिलांचे नाव किशोर सोयाम (वय४०) असे आहे.
किशोर हा चंद्रपूर जिल्ह्यातील रहिवासी असून पत्नी पूजा (वय३०) हिच्यासोबत चार वर्षांपूर्वी प्रेमसबंधातून लग्न झाले होते. दोन वर्षीय चिमुकली राधिकासोबत एमआयडीसी बुटीबोरी येथील गणेशपूर येथे दास यांच्याकडे कुटुंब भाड्याने राहत होते. आरोपी किशोर याला दारूचे व्यसन होते. काही दिवसांपासून तो पत्नीच्या चारित्र्यावर संशय करायचा व दारू पिऊन आल्यावर पत्नी पूजाला मारहाण करायचा. सोडचिठ्ठी देऊन टाक, असे वारंवार म्हणायचा. सोमवारी सकाळपासून तो दारू पिऊन असल्याने पत्नीला शिवीगाळ व मारहाण करीत असल्याने तक्रार द्यायला ती ठाण्यात आली. त्यावेळी आरोपी किशोर व मुलगी राधिका हे दोघेही बापलेक घरीच होते. पूजासोबत पोलिस घरी येताच मुलगी राधिका रक्ताच्या थारोळ्यात पडून दिसली. पोलिसांनी त्वरित चिमुकलीला रुग्णालयात हलविले असता डॉक्टरांनी चिमुकलीस मृत घोषित केले. आरोपी किशोर यास ताब्यात घेत याला नागपूर रुग्णालयात उपचारासाठी रवाना केले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेची एमआयडीसी पोलिसांनी नोंद करून गुन्हा दाखल केला. पुढील तपास ठाणेदार विनोद ठाकरे यांच्या मार्गदर्शनात भास्कर मेटकर करीत आहेत.
'राधिका उठ, बेटा उठ'
पतिपत्नीचा वाद झाल्यानंतर पत्नी पतीविरोधात एमआयडीसी ठाण्यात तक्रार द्यायला आली. त्यावेळी पत्नीला फोन करून तुला मारील, मुलीला मारील, अशी बतावणी करत असताना पत्नीने ठाण्यात तक्रार दाखल केली. एमआयडीसी पोलिस पतिला ताब्यात घेण्यासाठी पूजासोबत सोबत गेले असता चिमुकली रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. त्यानेसुद्धा आत्महत्या करण्याच्या उद्देशाने स्वतःच्या गळ्यावर ब्लेडने वार केले असल्याचे चित्र दिसताच पत्नीने 'राधिका उठ बेटा उठ' असे म्हणत हंबरडा फोडला व ढसाढसा रडायला लागली.
हेही वाचा - ‘श्श्शु...! प्रत्येक महिन्याच्या ३ तारखेला 'नो हॉर्न प्लीज’; जनआक्रोशतर्फे नागपूरकरांना...
ती तक्रार द्यायला गेली नसती, तर...
राधिकाची आई पूजा व वडील किशोर दोघेही एमआयडीसी बुटीबोरी येथील वेगवेगळ्या कंपनीत मजुरीचे काम करायचे. पती पत्नीवर संशय घेत होता. दारू पिऊन आल्यावर पत्नीला त्रास द्यायचा. तू मला सोडचिठ्ठी देऊन टाक, असे म्हणत कधी मारहाण सुद्धा करायचा. त्यामुळे त्रासलेल्या पत्नीने पतीविरोधात ठाण्यात तक्रार द्यायचे ठरविले असता ती ठाण्यात तक्रार द्यायला आली. आता पोलिस येईल या भीतीने पतीने पत्नीचा राग त्या निष्पाप मुलीवर काढला. तिच्या गळ्यावर ब्लेडने चिरे मारून तिची हत्या केली. जर पत्नी पतीविरोधात ठाण्यात तक्रार न देता घरीच आपसी समजूत काढून जर एकमेकांना समजून घेतले असते त्यामुळे त्याचा राग शांत झाला असता, अशी परिसरात चर्चा आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.