नागपूर : भारतात काही वर्षांमध्ये नव संकल्पनांवर आधारित स्टार्टअप सुरू करण्याची चढाओढ सुरू आहे. परंतु, उत्पादने किंवा सेवांचे ‘प्रमोशन’, ‘ब्रँडिंग’, ‘मार्केटिंग’चे आव्हान नवउद्योजकांपुढे उभे ठाकते. उपराजधानीतील कल्पक मित्रांनी एकत्र येत या अडचणीवर ‘डीजिटल फिल्म’ची मात्रा शोधून काढली. व्यावसायिक क्षितिजे विस्तारण्याची क्षमता असल्याने या ‘सोल्युशन’कडे नवउद्योजकच काय पण बड्या कंपन्या आणि शासकीय विभागही आकर्षित होत आहेत.
डीजिटल क्रांतीने जगण्याची रीत बदलून टाकली आहे. हे बदल अंगीकारून मांडल्या जाणाऱ्या संकल्पना अल्पावधीतच यशस्वी होतात. पण, त्या लोकांपर्यंत पोहोचणे आवश्यक असते. अनुराग कुळकर्णी व अविनाश निकष या नागपूरकरांनी डिजिटल फिल्मची संकल्पना मांडली. २०१३-१४ मध्ये छोटेखानी सुरुवात झाली. कंपन्यांना प्रत्येक संभाव्य ग्राहकापर्यंत प्रत्यक्ष पोहोचणे शक्य नाही. परंतु, अगदी छोट्या चित्रफितीतून संभाव्य ग्राहकांच्या मोठ्या समूहापर्यंत पोहोचणे शक्य आहे. म्हणूनच या पर्यायाला प्रतिसाद मिळू लागला.
उत्पादने किंवा सेवांची टू द पॉईंट माहिती, परिणामकारक स्क्रिप्ट आणि दमदार आवाजात अगदी दोन मिनिटांच्या चित्रफितीतून दिली जाते. थेट प्रकल्पस्थळांचे चित्रीकरण असल्याने विश्वासार्हता साधली जाते. या पर्यायाला ग्राहकांकडून प्रतिसाद मिळत असल्याने `सा डिजिटल फिल्म्स प्रा. लि.’ ने अल्पावधीत मुसंडी मारली. प्रमोशनमध्ये भाषांची मर्यादा येऊ नये यासाठी स्थानिक, दाक्षिणात्य विदेशी भाषांमध्ये या चित्रफिती तयार केल्या जातात.
त्यासाठी इंटरनॅशनल व्हाईस ओव्हर आर्टीस्टची मदत घेतली जाते. स्थानिक कंपन्यांसह देशातील बऱ्याच नामांकित कंपन्यांनी त्याची सेवा घेतली आहे. दिल्लीच्या नोएडामध्येही कार्यालय सुरू केले आहे. केंद्रीय मंत्रालये किंवा विभागांकडून प्रमोशनशी संबंधित कामेही या कंपनीला मिळू लागली आहेत. अनुराग कुळकर्णी कंपनीचे संस्थापक आणि सीईओ असून अविनाश सीओओ असून एकूण ६ जणांच्या टिमकडून कंपन्यांना त्यांच्या अपेक्षेनुरूप सेवा दिली जात आहे.
लॉकडाउनच्या काळात घरूनच कामे करावी लागली. संभाव्य ग्राहकांपर्यंत पोहोचणेही शक्य नव्हते. बड्या कंपन्यांसोबत कामांचा करार करताना वाटाघाटी कराव्या लागतात. लॉकडाउनमध्ये हे शक्य नव्हते. अशावेळी डिजिटल फिल्म हे प्रभावी माध्यम ठरले. घरबसल्या कंपनी, उत्पादने व सेवांची माहिती प्रभावी पद्धतीने समोरच्या व्यक्तींपर्यंत पोहोचविता आली. यामुळे कंपनीची सेवा घेणाऱ्या ग्राहकांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे.
प्रभावी मध्यम म्हणून उपयुक्त ठरेल
डीजिटल फिल्मच्या मदतीने शक्य नसलेल्या ठिकाणीही सहज पोहोचणे शक्य आहे. यामुळे व्हिडिओ हा खर्च नाही तर ॲसेट आणि गुंतवणूक असल्याचे मानायला हवे. भविष्यात फिल्म्सचा लाभ निश्चितच दिसून येईल. नव्याने उद्योग, व्यवसाय सुरू करणाऱ्यांना प्रमोशनसाठी व्हिडिओ प्रभावी मध्यम म्हणून उपयुक्त ठरेल.
- अविनाश निकष,
सीओओ, सा डिजिटल फिल्म्स प्रा. लि.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.