नागपूर ः महाराष्ट्र पशू व मत्स्यविज्ञान विद्यापीठाद्वारे (माफसू) अनेक महत्त्वपूर्ण संशोधने केली जातात. त्याचा उपयोग थेट शेतकऱ्यांना होतोय का?, त्यातून खरोखरीच बदल होतोय किंवा नाही याबाबतची माहिती मिळविण्यासाठी माफसूद्वारे ‘इम्पॅक्ट स्टडी’ करण्यात येत आहे. त्यासाठी विद्यापीठाचे विस्तार संचालनालय कार्य करीत असल्याची माहिती कुलगुरू डॉ. नितीन पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
डॉ. पाटील म्हणाले, विद्यापीठाच्या पशुविज्ञान, दुग्ध तंत्रज्ञान आणि मत्स्यविज्ञान शाखांतर्गत असलेल्या ३१ विभागांमध्ये संशोधनाचे कार्य सुरू आहे. यामध्ये ६२४ विभाग आणि इतर शासकीय संस्था पुरस्कृत संशोधनांचा समावेश आहे. त्यापैकी २६० संशोधने पूर्ण झाली आहेत. त्यातून निर्माण झालेले तंत्रज्ञान हे शेतकरी आणि पशुपालकांपर्यंत पोहचविणे ही विद्यापीठाची जबाबदारी आहे. त्यासाठी भारतीय कृषी अनुसंधान केंद्राचे कृषी केंद्र आणि विद्यापीठाच्या विस्तार संचालनालयाकडून सुरू असलेल्या ५० कृषी केद्रांना ते तंत्रज्ञान देत, त्यांच्याकडून शेतकऱ्यांपर्यंत पोहचण्याचे काम करण्यात येत आहे. त्यांच्या माध्यमातून संशोधनाच्या आणि तंत्रज्ञानाच्या ‘फिल्ड ट्रायल’ घेण्यात येणार आहे. याशिवाय विद्यापीठाच्या २५ व्या वर्षात पदार्पणाच्या निमित्ताने आयोजित दूध जागृती अभियानातून महाविद्यालय आणि शाळांच्या माध्यमातून त्याचा प्रचारही करण्यात येणार आहे. पत्रकार परिषदेला विविध विभागांचे प्रमुख आणि संचालक उपस्थित होते.
गुळाचे स्वादिष्ट पेढे
गुळ आणि दूध दोन्ही कार्बोहायड्रेट्सचे चांगले स्रोत आहेत, ज्यामुळे त्वरीत ऊर्जा मिळते. गुळामध्ये लोहाचे प्रमाण जास्त असल्यामुळे रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढून अॅनिमियावर नियंत्रण आणता येते. गुळामध्ये पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि फॉस्फरस असतात, तर दुधामध्ये ए, बी१, बी२,बी१२ आणि डी जीवनसत्त्वे असतात, जी शरीराच्या विविध कार्यांसाठी उपयुक्त असतात. गुळामध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि सेलेनियम असतात, जे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात. मधुमेह असणाऱ्या व्यक्ती सुद्धा ह्या पदार्थांचा काही प्रमाणात स्वाद घेऊ शकतात. त्यामुळे गुळ घातलेला दूध पेढा हा आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. याचे नियमित सेवन आरोग्य सुधारण्यासाठी फायदेशीर ठरू शकते. गूळ पेढा या दुग्धपदार्थावर दुग्ध तंत्रज्ञान महाविद्यालय, उदगीर येथे संशोधन चालू आहे.
पनीरच्या निवळीतून ‘व्हे ड्रिंक’
पनीर तयार करताना त्यातून निघणाऱ्या निवळीत ५ ते ६ टक्के प्रथिने असतात. मात्र, त्याचा उपयोग होत नाही. माफसुच्या दुग्ध तंत्रज्ञान विभागाने त्या निवळीवर प्रक्रिया करीत ‘व्हे ड्रिंक’ हे उत्पादन तयार करण्यात आले आहे. पेय खेळाडू व अंग मेहनतीचे काम करणाऱ्या कामगारां करिता ऊर्जेचा तात्काळ स्रोत म्हणून फार उपयोगी आहे. सदर पेय निर्मितीमुळे पनीर उत्पादकांचा नफा वाढेल तसेच पनीर व्हे मुळे होणारी पर्यावरणाची होणारी हानी सुद्धा कमी होईल. तसेच नाविन्यपूर्ण विपणन पद्धतीचा वापर करून शीतपेय विक्री करणाऱ्या पश्चिमात्य कंपन्याना स्पर्धा निर्माण करता येऊ शकेल. हे उत्पादन अतिशय स्वस्त असून १० रुपयात २०० ग्रॅम या दराने मिळू शकणार आहे अशी माहिती डॉ. भिकाने यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.