Nagpur News esakal
नागपूर

Nagpur : कापूस, धान आणि तूर पिकाला फटका; नुकसानभरपाईची मागणी

अवकाळीने हिरावला तोंडचा घास

सकाळ डिजिटल टीम

नागपूर : अवकाळी पावसामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. सोमवारी रात्री आणि मंगळवारी सकाळी झालेल्या अवकाळी पिकाचे मोठे नुकसान झाले. जिल्ह्यातील कापूस, धान आणि तूर पिकाला पावसाचा फटका बसला आहे. हजारो एकरातील पिके नष्ट झाल्यामुळे सरकारने तातडीने नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

कोणता गुन्हा केला रे देवा...

अवकाळी पावसाने मंगळवारी चार तास थैमान घातल्याने हजारो हेक्टर धानाच्या पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे. तालुक्यात हजारो हेक्टर धानाच्या कळपा पाण्याखाली आहेत. शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आले आहे. धान कापून व काढून घरात येण्याच्या तयारीत असताना पावसाने थैमान घातले आहे.

शेतीची मशागतीपासून ते पीक निघेपर्यंत शेतकरी शेतात पैसे लावण्याकरिता कमी पडत नाही. खत, बियाणे, मजुरी सावकार समजून खर्च करीत असतो. परंतु, शेवटच्या क्षणी पीक हातातून जाणे म्हणजे तोंडात येणारा घास हिरावून घेणे, हेच निसर्गाने शेतकऱ्यांसोबत केले आहे. कोणता गुन्हा केला रे देवा. शेतकऱ्यांना जेव्हा पाऊस पाहिजे तेव्हा हात गुंडाळून बसतोस. जेव्हा नाही पाहिजे.,तेव्हा बुडवून जातोस, अशी प्रतिक्रिया लापका येथील शेतकरी राहुल आमदरे यांनी व्यक्त केली.

एकरी ५० हजारांची मदत द्या

तालुक्यात धान, कापूस, तूर, सोयाबीन हे पीक जास्त घेण्यात येत आहे. सर्व पिकांवर अवकाळी पाऊसाचा जास्त प्रमाणात परिणाम झाला आहे. कपाशी पीक या पाण्यामुळे गळून पडत आहे. शेतीचा लवकरात लवकर पंचनामा करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळावी, असे मत शेतकऱ्यांनी व्यक्त केले. अतिवृष्टी व अवकाळी पावसामुळे नागपूर जिल्ह्यातील शेतीचे भरपूर मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना शासनातर्फे ५० हजार रुपये एकरी मदत देण्यात द्यावी. शेतकऱ्यांचे कृषिपंपाचे वीज बिल माफ करण्यात यावे. पेच प्रकल्पातील पाणीपट्टी माफ करण्यात यावी. पीकविम्याची रक्कम तातडीने जमा करण्यात यावी. या करिता आज (ता. २९) दुपारी १२ वाजता उपविभागीय अधिकारी मौदा/तहसीलदार मौदा यांच्यामार्फत शासनाला शिवसेना पक्षातर्फे निवेदन देण्यात येणार आहे.

तालुक्यात अवकाळी पाऊस आल्यामुळे पंचनामा करण्याचे आदेश दिले आहे. तालुक्यातील धान, कापूस यांचे पंचनामा सुरू आहेत.

-धनंजय देशमुख,तहसीलदार, मौदा

दोन दिवसाअगोदर वीस एकरातील धान कापणी केली होती. परंतु, पावसामुळे पूर्ण धान ओला झाला आहे. हे धान घरी येईल किंवा नाही हे सांगता येत नाही. परंतु, पावसामुळे हा खर्च निघणार नाही, असे वाटत आहे.

-प्रकाश (बंटी) हटवार, शेतकरी, मौदा

तुरीच्या पिकाचे नुकसान

परिसरात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या कापूस, तूर व भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांसमोर अवकाळी पावसाचे नवे संकट उभे ठाकले आहे. यामुळे शेतकरी चिंतातुर झालेला दिसून येत आहे. खापा परिसरात सोमवारी मध्यरात्रीपासून पावसाला सुरुवात झाली.तर मंगळवारी सकाळी दहा वाजेपर्यंत पावसाच्या हलक्या सरी सुरू होत्या. अवकाळी पावसाच्या तडाख्याने भाजीपाला व कापूस, तूर पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे.

फुलोऱ्यावर असलेल्या तुरीचा बहर गळाल्याने तुरीच्या पिकास मोठा फटका बसला आहे. अनेकांचा फुटलेला वेचणीला आलेला कापूस पाण्यात भिजला तर काही गळून पडला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अवकाळी पावसामुळे थंडीची हुडहुडी वाढली असून वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. खापा परिसरातील कोदेगाव ,तिघई, आजनी, गुमगाव, वाकोडी,नंदापूर, गडेगाव, कोथुळणा, खुबाळा,बडेगाव या भागात अवकाळी पावसाचा पिकांना चांगलाच तडाखा बसला आहे. तुरीचे पीक चांगले होणार अशी आशा बाळगून असणाऱ्या शेतकऱ्यांसमोर नवे संकट उभे केले. तूर पीक बहदार असताना त्याचवेळी अवकाळी पाऊस आल्याने तुरीचा फूल बहार गळणार आहे.

अवकाळी पावसामुळे कपाशीला फटका

तालुक्यात सोमवारपासून सुरु झालेल्या अवकाळी पावसामुळे तालुक्यातील कापूस तसेच पालेभाज्यांचे नुकसान झाले आहे. सोमवारी सकाळी तालुक्यात पावसाने हजेरी लावली. पहिल्या दिवशी केवळ ५ मी. मी. पाऊस पडला. मात्र २८ नोव्हेंबरला सकाळपासून परत पावसाला सुरुवात झाली.पावसाची निश्चित आकडेवारी समजू शकली नाही.

तरीही सोमवारपेक्षा आज पावसाचे प्रमाण जास्त होते.देवळी,पेंढरी,अडेगाव, कान्होलीबारा, टाकळघाट भागात जास्त पाऊस पडला.अवकाळी पावसाचा सर्वात जास्त फटका कापसाला बसला. काही शेतकऱ्यांची कपाशीची एकच वेचणी झाली होती. शेतात कपाशीचे बोंड फुटून होते. पावसाने ते ओले झाले.बोंड पिवळी व काळी पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.यामुळे उत्पादनातही घट होणार आहे.याशिवाय मेथी ,पालक,कोबी, टमाटर,वांगीचे नुकसान झाले. काही शेतकऱ्यांनी तर दुपारनंतर वांगी व कोबी तोडून थेट बाजारात विक्रीसाठी आणली. काही प्रमाणात तुरीचे सुद्धा नुकसान झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. तालुक्यातील तलाठ्यांना प्राथमिक सर्व्हे करून अहवाल देण्याचे आदेश तहसीलदार प्रियदर्शनी बोरकर यांनी दिले आहे.

हरभरा व गव्हाच्या पिकांना फायदा

हवामान खात्याने दिलेला अंदाज खरा ठरवत अवकाळी पावसाने जिल्ह्यात सर्वत्र दमदार हजेरी लावली.यामुळे पिकाचे नुकसान झाले तरी हरभरा पिकाला फायदा झाला.उमरेड तालुक्यात सुद्धा अवकाळी पावसाने आपली उपस्थिती दर्शविली .त्यामुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला. आता अवकाळी पावसाने विश्रांती घेतली असली तरी अवकाशात ढगाळ वातावरण कायम आहे. तापमानात घसरण झाल्यामुळे वातावरणात प्रचंड गारवा निर्माण झाला आहे .त्यामुळे लोकांना ठिकठिकाणी शेकोटी पेटवून ऊब घ्यावी लागत आहे.थंडी वाढली असल्यामुळे नेहमीच्या वर्दळीच्या ठिकाणी आता गर्दी कमी झाल्याचे दिसून येते. तसेच रात्री सर्वत्र सामसूम होते. वाढत्या थंडीसोबतच नागरिकांना सर्दी, फडसे, खोकला झालेल्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे.

शेतकऱ्यांच्या मागे लागले शुक्लकाष्ठ

हवामान बदलाचा परिणाम सर्वात आधी शेतकऱ्यांना भोगावा लागतो. ऋतू चक्रात होत असलेला बदल शेतीसाठी घातक ठरत आहे.शेतकऱ्यांच्या मागचे शुक्लकाष्ठ संपता संपताना दिसत नाही. ऐन पेरणीच्या हंगामात पावसाने दडी मारली होती. नंतर तो महाप्रलयासारखा कोसळला. शेती, मातीसह खरडून गेली. यातून सावरत कशीबशी रब्बी हंगामाची तयारी सुरू असतानाच मंगळवारी (ता.२८) नागपूर ग्रामीण तालुक्यात अवकाळी पावसाचे आगमन होताच पावसाचे शुक्लकाष्ठ संपता संपता संपणार नाही असे दिसून येते. अवकाळीचा पावसामुळे खरिपातील कापूस, तूर या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. जिरायतीमध्ये असलेले कांदे, चना, गहू या पिकाचे तसेच संत्रा पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे.

तुरीच्या शेंगाला लागणारे अन्नद्रव्य अवकाळी पावसाने धुतल्या गेल्यामुळे तुरीच्या शेंगाला दाणे उगवणार नाही. अनेक शेतात उभे पीक जमीनदोस्त झाले आहे. कापसाची स्थिती याहीपेक्षा बिकट आहे. वेचणीला आलेला कापूस फुटलेला असताना त्यावर पाऊस बरसल्याने कापसाचे बोंड गळून पडत आहे. कापूस ओला झाल्याने त्याची प्रतही खालावली आहे. अगोदरच बाजारात कापसाला दर मिळत नाही. त्यात दर्जा घसरलेल्या कापसाला आता कोणत्या दरात खरेदी केली जाईल, याची चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे. एका दिवसाच्या पावसात या सर्व खर्चावर पाणी फेरले जाते. हे नुकसान कधीच भरून निघत नाही. शेतकऱ्यांना निसर्गाच्या प्रकोपाचा सामना सतत करावा लागत आहे. अवेळी येणाऱ्या पावसाने त्यात भर घातली आहे. झालेल्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत देण्यात यावी, अशी मागणी नागपूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी केली आहे.

बदलामुळे शेतकऱ्यांची वाढली चिंता

तालुक्यात थंडीची प्रतीक्षा असताना तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून प्रशासकीय नोंदणीनुसार ३४.३ मी.मी. मान्सूनोत्तर पाऊस पडला आहे. अतिवृष्टीसारखा पाऊस झाला नसला तरी मात्र वातावरणातील बदलामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. गेल्या दोन दिवसांपासून झालेल्या या अवकाळी पावसामुळे कपाशी संत्रा व भाजीपाला उत्पादनाला फटका बसल्याचे तालुक्यातील नरसाळा येथील कपाशी उत्पादक व संत्रा उत्पादक शेतकरी प्रमोद घोरमारे, उमरी येथील कपाशी उत्पादक शेतकरी संजय टेंभेकर, सालई येथील शेतकरी मनोज मिरचे, नांदोरीचे दीपक पिंगे, शंकर मोवाडे, विलास देशमुख, अशोक गायधने,यादव ठाकरे यांनी सांगितले. कपाशीचे पीक हाती येणे सुरू आहे. मजुरांच्या प्रतीक्षेत बहुतांश शेतकऱ्यांच्या शेतातील कापसाची वेचणी शिल्लक आहे. अशातच अचानक झालेल्या पावसाने कपाशीचे पीक काळे पडून नुकसान होणार असल्याचे शेतकऱ्यांकडून सांगितले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT