नागपूर : रक्ताचा थेंब न सांडवता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेली धम्मक्रांती विश्वातील ऐतिहासिक एकमेवाद्वितीय क्रांती ठरली. त्याच दीक्षाभूमीतून अखंड ऊर्जा घेऊन तळागाळातील समाजाने उंच झेप घेतली. शांतीच्या मार्गाने आमूलाग्र क्रांतीची शिकवण देणाऱ्या दीक्षाभूमीला डोळ्यात साठवून घेण्यासाठी आलो आहे, अशा शब्दांत दक्षिणेतील ‘जयभीम’ सिनेमातील कलावंत साई दिना यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळ्यासाठी नागपुरात आले असता, त्यांनी ‘सकाळ’शी संवाद साधला. साई दिना उच्च शिक्षित आहेत. कलावंत आहेत, परंतु त्यापेक्षा अधिक ते सामाजिक कार्यकर्ते आहेत. कोरोना काळात त्यांनी दक्षिणेतून देशभरात घरी परतणाऱ्या प्रवासी यात्रींना जेवण दिले. ज्याला मदत हवी असेल त्यांच्यासाठी साई दिना यांच्या घराचे दरवाजे सदैव उघडे असतात. त्यांचा हा दानशूरपणा आणि मदत करण्याची वृत्ती बघून पुदूचेरी विद्यापीठाने त्यांना मानद डॉक्टरेट पदवी बहाल केली. मात्र त्यांच्या चेहऱ्यावर समाधान नव्हते, आपल्याजवळ जे आहे, त्याचा लाभ इतरांना व्हावा हीच वृत्ती आपल्या मनाला समाधान देत असल्याचे ते म्हणाले.
अतिशय परखड आणि मनमोकळेपणे त्यांनी प्रतिनिधीशी संवाद साधला. डॉ. आंबेडकर लहानपणीच आम्हाला माहीत झाले. वैश्विक महासूर्य असूनही येथील व्यवस्थेने, सत्ताधाऱ्यांनी बाबसाहेब नावाच्या महासूर्याला महाराष्ट्रात बंदिस्त केले होते. यासाठी आमचीही मंडळी काही जबाबदार आहेत. मात्र सूर्याला पकडता येत नाही, हेच सत्य. यामुळेच नागपूरच्या भूमीतील दीक्षाक्रांती हे मानवाच्या जगण्याचे अधिष्ठान असणारी भूमी म्हणजे दीक्षाभूमी बनली असून तिला जागतिक रूप प्राप्त झाले आहे.
डॉ. आंबेडकर यांनी देशाला दिलेल्या संविधानामुळे देश संघटित आहे. संविधानातील स्वातंत्र्य, समता, बंधुता व न्यायाची मूल्ये सत्ताधाऱ्यांनी पाळली असती तर देश यापूर्वीच महासत्ता बनला असता, परंतु, कॉंग्रेस असो की भाजप, या दोन्ही मनुवादी विचारसरणीच्या पक्षांनी बाबासाहेबांच्या संविधानाची योग्यरीत्या अंमलबजावणी केली नसल्यामुळे आज २०१४ पासून देशात धर्मांध वातावरण तयार झाले आहे, असे परखड मतही यावेळी त्यांनी व्यक्त केले.
टॉलिवूडमधून सामाजिक न्यायाचा संदेश
बॉलिवूड आणि टॉलिवूड यांच्यात मोठे अंतर असल्याचे एका प्रश्नाच्या उत्तरात सांगताना साई दिना म्हणाले, बॉलिवूडमध्ये प्रेमकथा, प्रेमाचा त्रिकोण यापलीकडे विचार करीत नाही. बॉलिवूड निव्वळ मनोरंजन हा केंद्रबिंदू काम करते, मात्र दलित, शोषितांचे सत्य दाखवण्याचे धारिष्ट्य बॉलिवूडने कधीच केले नाही. तोच दलित शोषितांचा, बहिष्कृतांचा विद्रोह दक्षिणेतील टॉलिवूडने सिनेमातून मांडला.
‘काला, कबाली, पेरिपेरम पेरूमल, कर्णन, जयभीम या कलाकृतींमधून सामाजिक न्यायाचा संदेश टॉलिवूडमधून जोरकसपणे पुढे आला आणि व्यावसायिकदृष्ट्या यशस्वीही झाला आहे, ही शोषितांसाठी स्वतंत्र आर्थिक व्यवस्था तयार होऊ शकते. देशातील आंबेडकर समाजाने शैक्षणिक किल्ले सर केलेत. परंतु डॉ. आंबेडकर यांच्या आर्थिक विचारांना तळागाळात पोचवण्यात आम्ही अजूनही मागे आहोत. यामुळे जागतिकीकरण, खासगीकरणाचे चटके याच समाजाला बसणार आहेत, यामुळे सिनेमा असो व इतर कोणत्याही माध्यमात आता स्वतंत्र अर्थव्यवस्था निर्माण करण्याची गरज आहे, असे साई दिना म्हणाले.
प्रज्ञा, शील, करुणा आणि मैत्रीचा आनंद दीक्षाभूमीला भेट दिल्यानंतर अनुभवता आले. जगात एकमात्र दीक्षाभूमी आहे, ज्या ठिकाणी कोट्यवधीची पुस्तके विकला जातात. गुलाल बुक्का आणि पूजेला येथे स्थान नाही, स्थान आहे ते ज्ञानाला. या दीक्षाभूमीत केवळ ज्ञानाची शिकवण मिळतेय.
-साई दिना, चित्रपट कलावंत, चेन्नई
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.