नागपूर - जिल्ह्यात ३६५ ग्रामपंचयतीच्या निवडणुकीचे निकाल जाहीर होताच विजयावर काँग्रेस आणि भाजपने दावे-प्रतिदावे सुरू केले आहेत. भाजपने २३८ तर काँग्रेसने १३७ ग्रामपंचायती जिंकल्याचा दावा नेत्यांनी केला. राष्ट्रवादीने ८४ ग्रामपंचायती जिंकल्याचे अनिल देशमुख यांचे म्हणणे आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीत आमचाच झेंडा
विशेष म्हणजे या दाव्या-प्रतिदाव्यांसाठी नेत्यांनी सादर केलेली आकडेवारी प्रत्यक्ष निवडणूक झालेल्या ग्रामपंचायतींपेक्षा अधिक होत आहे. यामुळे कोणत्या पक्षाचा वरचष्मा आहे याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. ग्रामपंचायती जिंकून नागपूर ग्रामीणवर आपला झेंडा फडकावण्यासाठी सर्वच पक्षांमध्ये चुरस होती.
सर्वच म्हणतात आम्हीच विजयी
सर्वच आमदारांनी व नेत्यांनी सर्वाधिक ग्रामपंचयती जिंकल्या असल्याचा दावा केला. त्यांनी दावे केलेल्या ग्रामपंचायतींची आकडेमोड ही प्रत्यक्ष निवडणूक झालेल्या ग्रामपंचायतींपेक्षा अधिक आहे. त्यामुळे कोणाचे दावे खरे व कोणाचे खोटे असा संभ्रम निर्माण झाला आहे. भाजपने सर्व उमेदवारांकडून भाजप समर्थित म्हणून शपथपत्र भरून घेतले होते, हे विशेष.
मविआ नेत्यांचे मतदारसंघावर लक्ष
दरम्यान महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आपआपल्या मतदारसंघावर लक्ष केंद्रित केले होते. आमदार सुनील केदार सावनेर, आमदार अनिल देशमुख काटोल-नरखेड, राजू पारवे उमरेड तर शिंदे गटाचे आमदार आशिष जयस्वाल यांनी रामटेकचे नेतृत्व केले.
भाजपने लावली शक्ती पणाला
भाजपने ही निवडणूक सामूहिकपणे लढवली. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि जिल्हाध्यक्ष सुधाकर कोहळे यांनी या निवडणुकीचे नियोजन केले होते. त्यांच्यासोबत आमदार समिर मेघे आणि आमदार टेकचंद सावरकर होते. विधानसभेसाठी इच्छुक व संभाव्य उमेदवारांना भाजपने कामाला लावले होते. निवडणुकीसाठी रसदही पोहचवली होती, असे समजते.
अजित पवार गटाने उघडले खाते
अनिल देशमुख यांच्या बालेकिल्ल्यात अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसने खाते उघडले. त्या तुलनेत अनेक वर्षांपासून विदर्भात सक्रिय असलेल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना फारसे यश मिळाले नाही. ठाकरे गटाला दोनच ग्रामपंचायती जिंकता आल्या. बसपाने २, मनसे ३, गोंडवाना ३ आणि अपक्ष १५ जागांवर विजयी झाले असल्याचे समजते.
विकासाला कौल
भाजपने विकासाचे सकारात्मक राजकारण केले आहे. त्यास ग्रामीण भागातील जनतेने अनुकूल कौल दिला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उठसुठ आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणाऱ्यांना जनतेने सणसणीत चपराक दिली आहे. आगामी लोकसभा आणि विधानसभाही भाजपच जिंकणार असल्याचे यातून स्पष्ट होते.
- चंद्रशेखर बावनकुळे, प्रदेशाध्यक्ष भाजप
भाजपचा दारुण पराभव
जिल्ह्यातील बड्या भाजप नेत्याच्या घरात भाजपाचा दारुण पराभव झाला आहे. त्यामुळे भाजपच्या गोटात चिंतेचे सावट दिसत आहे. दुसरीकडे काँग्रेस कार्यकर्ते प्रचंड उत्साहात आहेत. ही निवडणूक आगामी लोकसभा व विधानसभेचा कौल स्पष्ट करणार आहे.
- राजेंद्र मुळक, जिल्हाध्यक्ष काँग्रेस
महायुतीला निर्भेळ यश
काँग्रेस व महाविकास आघाडीच्यावतीने सादर केलेली आकडेवारी खोटी आहे. आजवर काँग्रेसने अशाच पद्धतीने दिशाभूल केली. भाजपने सर्वाधिक ग्रामपंचायती जिंकल्या आहेत. या भरोशावर आगामी विधानसभा व लोकसभा महायुतीचेच उमेदवार विजयी होतील.
- सुधाकर कोहळे, जिल्हाध्यक्ष, भाजप
६८ ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादीचे वर्चस्व
काटोल-नरखेड विधानसभा मतदारसंघातील ८३ पैकी ६८ ग्रामपंचायती राष्ट्रवादी काँग्रेसने जिंकल्या आहेत. जिल्ह्यातील ८३ ग्रामपंचायतींपैकी सर्वाधिक ६४ ग्रामपंचायतींची निवडणूक या मतदारसंघात होती. बाजारगाव व सातनवरी या दोन्ही ग्रामपंचायतीत राष्ट्रवादीने एक हाती सत्ता मिळविली.
- अनिल देशमुख, माजी गृहमंत्री व आमदार
महायुती- मविआचे दावे-प्रतिदावे
बसपा : ०२
उबाठा : ०२
गोंडवाना : ०३
अपक्ष : १५
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.