नागपूर : पितृपक्ष म्हटले की धार्मिक कार्यक्रमांसह पारिवारिक कार्यक्रमांचे नियोजन करणे हिंदू धर्मियांकडून सहसा टाळले जाते. मात्र, या पितृपक्षाच्या काळातही प्रामुख्याने विदर्भामध्ये एक अनोखा उत्सव गेल्या २६६ वर्षांपासून साजरा होतो आहे. तो म्हणजे हाडपक्या (मस्कऱ्या) गणपती उत्सव. यंदाचे उत्सवाचे हे २६७ वे वर्ष असून यानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ‘ही प्रथा सुरू कशी झाली, याचा उद्देश काय, याचे प्रणेते कोण, सार्वजनिक गणेशोत्सवाशी याचा संबंध आहे का..’ या सर्व गोष्टी जाणून घेणार आहोत.
उत्सवाला भोसलेकालीन इतिहास
राजे भोसले यांचे नागपुरात आगमन झाल्यानंतर अनेक प्रथा परंपरांची सुरवात नागपुरात झाली. भाद्रपद गणेशोत्सव त्यातील एक होय. १७५५ साली नागपूरकर भोसले घराण्यातील तत्कालीन राजे श्रीमंत खंडोजी महाराज भोसले ऊर्फ चिमनाबापू हे बंगालच्या स्वारीवर होते. बंगालवर ऐतिहासिक विजय मिळवून परत येत असतानाच कुळाचारी गणपतीचे विसर्जन झाले होते. त्यामुळे, श्रीमंत खंडोजी महाराज भोसले गणपती उत्सव साजरा करू शकले नाहीत. त्यावेळी राजपुरोहित व अन्य विद्वानांसोबत चर्चा करून पितृपक्षातील भाद्रपद कृष्ण चतुर्थीला(भाद्रपद संकष्टी चतुर्थी) गणपती उत्सव साजरा करण्याचे ठरविले. त्यासोबत, बंगालवर ऐतिहासिक विजय मिळविण्याच्या आनंदोत्सव सुद्धा सार्वजनिक स्वरूपात साजरा करण्याचे ठरविले.
लोकमान्य टिळकांनी घेतली प्रेरणा
असे म्हणतात की लोकमान्य टिळकांनी याच गणपती उत्सवाची प्रेरणा घेऊन भाद्रपद गणपती उत्सव सार्वजनिक स्वरूपात साजरा करण्याचे ठरविले. अन्याया विरुद्ध, स्वातंत्र्यासाठी लढा देताना महाराजांच्या दूरदृष्टीचा अभ्यास करून टिळकांनी कुळाचारी गणपतीला सार्वजनिक उत्सवाचे रूप दिले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.