‘होळीच्या अग्नीत जळू दे दु:ख सारे, तुमच्या आयुष्यात येऊ दे आनंदाचे क्षण सारे, वाईट सारे जळून जावे, चांगले ते उदयास यावे’
नागपूर - ‘होळीच्या अग्नीत जळू दे दु:ख सारे, तुमच्या आयुष्यात येऊ दे आनंदाचे क्षण सारे, वाईट सारे जळून जावे, चांगले ते उदयास यावे’
या प्रार्थनेसह नागरिकांनी सोमवारी सायंकाळी होळीचे दहन केले. राग, मत्सर, हेवेदावे, अहंकार आदींना खाक करत मैत्री, बंधुत्व, प्रेम, शांतीचा प्रकाश प्रज्वलित करण्याची प्रार्थना यावेळी करून तसे शुभेच्छा संदेश सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले. सोमवारी शहरात भक्तीभावासह ९१५ ठिकाणी होळी पेटवण्यात आली सोबतच अनेकांनी घाई करीत रंगोत्सवालाही सुरूवात करून दिली.
पकोडेवाला गल्ली, प्रतापनगर, महाल, बेसा, लक्ष्मीनगर (बास्केटबॉल ग्राउंड), रघुजीनगर, म्हाळगी नगर, रामेश्वरी, हनुमाननगर या मुख्य वस्त्यांसह गल्लो-गल्ली नागरिकांनी होळीचे दहन करीत पूजन केले. प्रशासनाने ९१५ सार्वजनिक होळी दहनाचा आकडा दिला असला तरी प्रत्यक्षात मात्र ही संख्या पंधराशेच्या वर होती. होळीनिमित्त शहरातील काही गोरक्षण संस्थांनी शेणाच्या गोवऱ्या उपलब्ध करून दिल्या. पुरण पोळीचा नैवेद्य, नारळ या प्रसादासह भक्तिभावाने प्रदक्षिणा मारत नागरिकांनी होळीला नमन केले.
तत्पूर्वी, सकाळपासून नागरिकांनी लाकूड खरेदी करण्यासाठी शहरातील विविध ठिकाणी गर्दी केलेली दिसली. यामध्ये, तरुणांची सख्या जास्त होती. तसेच, विविध साहित्याची खरेदी करण्यासाठी नागरिकांनी शहरातील मुख्य बाजारपेठेमध्ये गर्दी केली होती. तरूणाईसह शाळकरी मुलांनी होळीच्या दिवशीच रंगांची उधळण करीत आपल्या मित्रमंडळींना रंगवीत जल्लोष केला. यामध्ये, दहावी-बारावीच्या परीक्षा केंद्रावरील मुला-मुलींचा देखील सहभाग होता.
होळीला १२ कोटींची उलाढाल
दोन वर्षांच्या कोरोनाच्या निर्बंधानंतर बाजारपेठेला यंदा होळीचा चांगलाच रंग चढला आहे. रेशीम ओळ, लोहा ओळ आणि इतवारी बाजारात रंग, गुलाल, पिचकारी आणि मुखवटे खरेदीसाठी मोठ्यांसह बच्चे कंपनीने तुफान गर्दी आहे. मध्यभारतातील मुख्य बाजारपेठ असलेल्या नागपूर शहरात यंदा १२ कोटीच्या जवळपास उलाढाल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कोरोनाच्या निर्बंधमुक्त वातावरणात होळी खेळण्याचे सर्वांनीच नियोजन केले आहे.
लहान-लहान मोहल्ल्यासह फ्लॅटमध्येही होळीच्या निमित्ताने कार्यक्रमांची रेलचेल राहणार आहे. शहरात पोलिंसाच्या तगड्या बंदोबस्तामुळे अनेकांनी घरीच मित्रपरिवारांसोबत हा सण साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. आतापासून होळीचा उत्साह संचारला आहे. होळीला यंदा नैसर्गिक रंगाला अधिक मागणी दिसत असून भारतीय पिचकाऱ्यांनी बाजार काबीज केला आहे, असे पिचकारी विक्रेते विराग जैन यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.