Nagpur Sakal
नागपूर

Nagpur : 'प्रशासनाची उदासीनता भारी; पाणी आपल्या दारी', मॉन्सूनपूर्व तयारीचे पितळ उघडे, हजारो घरांत पाणी

सकाळ वृत्तसेवा

Nagpur - बुधवारी मध्यरात्री विजांचा प्रचंड कडकडाट व मेघगर्जनेसह बरसलेल्या धुवाधार पावसाने उपराजधानीत तांडव केले. रात्रभर कोसळलेल्या पावसाने नागपूरकरांची झोप उडविली.

झोपडपट्ट्यांसह तब्बल दोनशेवर वस्त्या व हजारो घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांना चांगलाच फटका बसला. जाटतरोडीमध्ये नाल्यावरून घसरून वाहून गेल्याने एकाचा मृत्यू झाला तर एक जण बेसा येथील नाल्यात वाहून गेला असून त्याचे पार्थिव मिळाले नाही.

दरम्यान गुरुवारी रात्रीही जोरदार पावसाच्या सरी कोसळल्या. बुधवारी रात्री जागोजागी विद्युत पुरवठा खंडित झाल्याने असंख्य नागरिकांना रात्र अंधारात काढावी लागली.

पावसामुळे शहरातील नदी-नालेही तुडुंब भरून वाहिले. नरेंद्रनगर, मनीषनगर व लोखंडी पुलाखाली कंबरेपर्यंत पाणी तुंबल्याने वाहतूक ठप्प झाली होती. ठिकठिकाणी झाडे पडली. अख्खे जनजीवनच विस्कळीत झाले. विजांमुळे अनेक घरांमधील घरगुती विद्युत उपकरणे निकामी झाली.

कळमन्यात पावसाच्या पाण्यात अडकलेल्या एका कुटुंबाला बाहेर काढण्यासाठी चक्क नाव चालल्याचे चित्र पाहायला मिळाले. पावसामुळे अंबाझरी तलावदेखील ओव्हरफ्लो झाला. एकूणच यंदाच्या पहिल्याच जोरदार पावसाने महानगरपालिकेच्या मॉन्सूनपूर्व तयारीचे पितळ उघडे पडले.

शहरात गेल्या २९ वर्षांमध्ये प्रथमच १२ तासांमध्ये सर्वाधिक १६४ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली. प्रादेशिक हवामान विभागाने शुक्रवारीदेखील नागपूरसह संपूर्ण विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा दिलेला आहे. सकाळी पाऊस थांबल्यानंतर चक्क ऊन पडल्याने नागरिकांना घामाच्या धारांचाही त्रास सहन करावा लागला.

बुधवारी दिवसभर तापल्यानंतर रात्री अचानक वातावरण बदलले. पाहता पाहता विजांचा कडकडाट सुरू झाला. हृदयात धडकी भरविणाऱ्या विजांच्या कडकडाटांसह आलेल्या मुसळधार पावसाने रात्रभर हजेरी लावली. बुधवारी रात्री साडेदहाच्या सुमारास सुरू झालेला पाऊस गुरुवारी सकाळी साडेसात वाजेपर्यंत सुरूच होता.

पाणी आपल्या दारी

त्यामुळे सकाळी उठताच अनेकांच्या अंगणात, रस्त्यांवर तलावासारखे पाणी साचलेले दिसले. शहरातील नाग, पिवळी, पोरा नदीसह नाले तुडूंब भरले. अऩेक भागातील सिवेज लाईन, ड्रेनेज लाईन भरल्याने अनेक घरांत पावसाचे पाणी शिरले. काही भागात ड्रेनेज लाईन नसल्याने रस्ते पाण्याखाली आले. रस्त्यांना अक्षरशः नदीचे स्वरुप आले.

विशेषतः शहर सिमेवरील वस्त्या तसेच नदी, नाल्या काठावरील वस्त्यांमध्ये पाणी शिरले. शहरातील रस्ते, चौकांमध्ये पाणी साचल्याने सकाळी चाकरमान्यांना कार्यालयांमध्ये पोहोचण्यासाठी चांगलीच कसरत करावी लागली.

रात्री सिव्हिल लाईन्स उद्योगभवनाजवळ व सुभाषनगरातील संत गजानन महाराज मंदिराजवळ झाडे पडली. मनपाच्या अग्निशमन विभागाने रात्रीच झाड रस्त्यावरून हटवले. उमरेड रोडवरील कळमना भागात हरडे यांच्या फार्म हाऊसमध्ये पाणी शिरले. येथे धवनगये कुटुंब अडकले होते. त्यांना अग्निशमन विभागाच्या जवानांनी बोटीने बाहेर काढले.

जाटतरोडी परिसरात आंबेडकर पुतळ्याजवळील नाल्यामध्ये रविचंद्र गेडाम नावाचा ३५ वर्षीय तरुण पडला. नाका तोंडात पाणी गेल्याने त्याचा मृत्यू झाला. मनपा अग्निशमन विभागाच्या जवानांनी त्याचा मृतदेह बाहेर काढला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. बेसा नाल्यात प्रकाश बर्वे हा ४२ वर्षीय तरुण वाहून गेला.

त्याला शोधण्याचे कार्य सायंकाळपर्यंत सुरू होते. परंतु त्याचे शव सापडले नाही. याशिवाय बहुमजली इमारतींच्या तळघरांमध्ये पाणी साचल्याने अऩेकांची वाहने पाण्यात होती. महापालिकेच्या पथकाने पंपाने पाणी बाहेर काढले.

परंतु दुपारपर्यंत अनेक इमारतीचे तळघर पाण्यात होते. शहरातील मोकळे भूखंड तलाव झाल्याचे सर्वच भागात दृश्य होते. सिवेज लाईन तुंबल्याने घाण पाणी घरात शिरल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला. सकाळी पाऊस थांबल्यानंतर मात्र चक्क ऊन पडले.

शहरातील तिन्ही पुलांखाली पाणी

धो-धो पावसामुळे नरेंद्रनगर, मनीषनगर आरयूबी व लोखंडी पुलाखाली कंबरेपर्यंत पाणी तुंबले होते. त्यामुळे वाहनधारकांना हॉटेल रॅडिसन ब्ल्यू जवळील उड्डाणपुलावरून जावे लागले. नरेंद्रनगर पुलाखाली ट्रक जवळपास अर्धा बुडाल्याने दृश्य पाहायला मिळाले. या ठिकाणी तुंबलेले पाणी पंपाद्वारे काढण्यासाठी प्रशासनाचे कर्मचारी प्रयत्न करताना दिसले.

अनेक वस्त्या पाण्यात

पावसामुळे अनेक वस्त्यांमध्ये पाणी घुसले. ठिकठिकाणी पाणी शिरल्याच्या तसेच तलाव साचल्याच्या तक्रारी अग्निशमन विभागाकडे आल्या. पावसाचा सर्वाधिक फटका झोपडपट्टी व खोलगट भागांना बसला.

अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने येथील नागरिकांना रात्र जागवून काढावी लागली. पावसामुळे नाग व पिवळ्या नदीसह छोटेमोठे नाले दुथडी भरून वाहिले. शहरातील रेशीमबाग, कस्तुरचंद पार्कसह अनेक मैदानांवर पाणीच पाणी दिसत होते.

कुठे गुडघाभर, तर कुठे कंबरेपर्यंत पाणी

पावसामुळे शहरातील रस्ते व चौकही जलमय झाले होते. कुठे गुडघाभर तर कुठे कंबरेपर्यंत पाणी साचले होते. बेसा, बेलतरोडी, मनीषनगर, नरसाळा, पिपळा, नगरनगर, शताब्दीनगर, मानेवाडा, पडोळे चौक, सीताबर्डी, महाल, इतवारी मेडिकल चौक,

सक्‍करदरा, दिघोरी, सदर, काटोल रोड, झिंगाबाई टाकळी, कामठी, कळमना, गड्‌डीगोदाम, त्रिशरण चौक, ओंकारनगर, जरीपटका, दाभा, त्रिमूर्तीनगर, पडोळे चौक, गोपालनगर, नारा, इंदोरा, कमाल टॉकीज चौक, छत्रपती चौकासह अनेक चौकांना अक्षरशः तलावाचे स्वरूप आले होते. सुदैवाने रात्रीची वेळ असल्याने वाहनधारकांना त्रास झाला नाही.

कळमना गावात नाव चालली

मिहान मार्गावरील हनुमाननगर परिसरात वीटभट्टीजवळ पाणी तुंबल्याने अनेक कामगार अडकून पडले होते. अडकलेल्या जवळपास १३ कामगारांना एसडीआरएफच्या पथकाने रेस्क्यू करून सुरक्षितस्थळी हलविले.

याशिवाय उमरेड मार्गावरील कळमना गावातील फार्म हाऊसमध्येही एक कुटुंब अडकले होते. मनपाच्या अग्निशमन पथकाने त्यांनाही नावेने सुखरूप बाहेर काढण्यात आले. याशिवाय नरसाळा जिल्हा परिषद शाळेमागील भागात पूराच्या पाण्यात अडकलेल्या कुटुबीयांनाही बाहेर काढण्यात आले.

नागपूर शहर १४९.३ मि.मी.

नागपूर ग्रामीण १३९.४ मि.मी.

कामठी १०३.८ मि.मी.

हिंगणा १९२.९ मि.मी.

उमरेड ११५ मि.मी.

कुहीत ९४.७ मि.मी.

रामटेक ७.५ मि.मी.,

पारशिवनी ५१.२ मि.मी.

मौदा ४३.९मि.मी.

काटोल १५.७मि.मी.

नरखेड ३.२ मि.मी.

सावनेर ७.७ मि.मी.

कळमेश्‍वर १३.३ मि.मी.

उमरेड११५ मि.मी.

भिवापूर ४६.५ मि.मी.

कुही ९४.७ मि.मी.

अंबाझरी तलाव ओव्हरफ्लो

मुसळधार पावसामुळे नागपूरकरांचे आकर्षणाचे केंद्र असलेला अंबाझरी तलावही तुडुंब भरून ओव्हरफ्लो झाला. हे दृश्‍य पाहण्यासाठी तरुण-तरुणींसह अनेकांनी अंबाझरी परिसरात गर्दी केली होती.

जोरदार पावसामुळे शहराला लागून असलेला गोरेवाडा तलावही निम्‍म्यापेक्षा जास्त भरल्याची माहिती आहे. याशिवाय शहरातील सोनेगाव, सक्करदरा, नाईक तलाव, गांधीसागर इतर तलाव काठापर्यंत भरले.

अनेक शाळांना सुटी

मुसळधार पावसामुळे सकाळी अनेक शाळांमध्ये पाणी साचले. एवढेच नव्हे तर रस्त्यांवरील पाण्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यास होणार त्रास बघता पोद्दार, पलोटी, सोमलवार आदी शाळांना सुटी जाहीर करण्यात आली.

त्यामुळे विद्यार्थ्यांनी जलमय झालेले रस्ते, परिसरात आनंद लुटला. परंतु काही विद्यार्थ्यांच्या घरांमध्येच पाणी शिरल्याने ते पालकांना पाणी बाहेर काढण्यास मदत करताना दिसून आले.

गाडी गेली, पण जीव वाचला

कळमना नाका नंबर चारजवळील पिवळी नदीच्या पुलावरून पाणी वाहात होते. त्यावेळी रेल्वेत कार्यरत असलेल्या गुप्ता नावाच्या एका नागरिकाने ॲक्टिव्हासह पूल पार करण्याचा प्रयत्न केला.

मात्र त्यांचा हा प्रयत्न अंगलट आला. पाण्याचा फ्लो अचानक वाढल्याने ते जीवाच्या भीतीने ॲक्टिव्हा तिथेच सोडून पळून गेले. सुदैवाने त्यांचे प्राण वाचले, मात्र गाडी पाण्यात वाहून गेली.

स्वयंपाकघरात घुसले पाणी

मुसळधार पावसामुळे कळमना परिसरातील एका घरातील थेट स्वयंपाकघरात पाणी घुसले. त्यामुळे बेड, धान्य व भांडीकुंडी सावरता सावरता एका गृहिणीची चांगलीच दमछाक झाली. या माऊलीला भांड्याद्वारे पाणी गोळा करून दिवसभर बाहेर फेकावे लागले. या कामात घरच्यांनीही तिला मदत केली.

१२ तासांत तब्बल १४९ मिलिमीटर

शहरात बुधवारी रात्री साडेआठ ते गुरुवारी सकाळी साडेआठ या १२ तासांत तब्बल १४९ मिलिमीटर पावसाची नोंद हवामान विभागातर्फे करण्यात आली. यंदाच्या पावसाळ्यात १२ तासांतील हा विक्रम ठरला.

यापूर्वी १२ जून १९९४ रोजी १२ तासांत सर्वाधिक पाऊस पडला होता. उल्लेखनीय म्हणजे शहरात आतापर्यंत ५९३ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे.

आजही मुसळधारेचा इशारा

हवामान विभागाने शुक्रवारीही नागपूरसह संपूर्ण विदर्भात ऑरेंज व यलो अलर्ट दिला आहे. त्यामुळे बहुतांश जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी मुसळधार पावसाचाही इशारा देण्यात आला आहे.

भंडारा व गोंदिया या दोन जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट असल्यामुळे अतिवृष्टीची शक्यता वर्तविण्यात आली आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे सध्या मध्य भारतावर ढगांची दाटी झाली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार', IND vs BAN सामन्याविरोधात हिंदू संघटना आक्रमक, मालिका रद्द होणार?

Aaditya Thackeray : महायुती गद्दारांचा चेहरा घेऊन विधानसभा लढणार का?

Raj Thackeray: डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; राज्यासह केंद्र सरकारला सुनावले खडेबोल

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वडेट्टीवारांचा जोरदार हल्ला

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

SCROLL FOR NEXT