नागपूर : नवरात्रनिमित्त महापालिकेने महिलांच्या आरोग्यासाठी पुढाकार घेतला असून ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ अभियान राबविण्यात येणार आहे. घटस्थापनेपासून अर्थात २६ सप्टेंबरपासून हे अभियान सुरू होणार आहे. ५ ऑक्टोबरपर्यंत अठरा वर्षावरील महिला, माता, गरोदर स्त्रियांच्या आरोग्य तपासणीसाठी दहाही झोनमध्ये विशेष आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे.
नवरात्र कालावधीत अभियानाच्या अंमलबजावणीसंदर्भात शुक्रवारी महापालिकेत टास्क फोर्स समितीची बैठक पार पडली. बैठकीत अतिरिक्त आयुक्त राम जोशी, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार, शिक्षणाधिकारी राजेंद्र पुसेकर, सहाय्यक वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय जोशी, झोनल वैद्यकीय अधिकारी डॉ. भावना सोनकुसळे, डॉ. मेघा जैतकर, डॉ. प्रिती झाररीया, डॉ. वैभवी गभने, डॉ. शीतल वांदिले, डॉ. दीपंकर भिवगडे, डॉ. विनय कुमार तिवारी, सुरेन्द सरदारे, डॉ. वसुंधरा भोयर, डॉ. एस. के. धवड, डॉ. सुनील कांबळे, डॉ. अनुपमा मावळे, डॉ. अनिता भांबर्डे यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.
यावेळी अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी अठरा वर्षावरील सर्व महिला माता, गरोदर स्त्रियांच्या आरोग्य तपासणी सोबतच प्रतिबंधात्मक आणि उपचारात्मक आरोग्य सुविधा शिबिरात उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले. प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर नवरात्र कालावधीत दररोज माता व महिलांच्या तपासणीची शिबिरे घेण्यात यावीत, यात वैदयकीय अधिकाऱ्यांनी स्वतः मातांची तपासणी करावी.
आजारी महिलांना उपचार व आवश्यकतेनुसार मदत देण्यात यावी. झोननिहाय तज्ज्ञांची शिबिरे जास्तीत जास्त आयोजित करून नागरिकांना सेवा उपलब्ध करुन द्यावी असे निर्देश दिले. सुरक्षित व सुदृढ आरोग्यसाठी समुपदेशन करण्यात यावे, असेही सांगितले.
घरोघरी जनजागृती
उपक्रमांची माहिती अधिकाधिक महिलांपर्यंत पोहोचविण्यासाठी आरोग्य सेविका व सेवक, झोन वैद्यकीय अधिकारी यांनी घरोघरी जनजागृती करण्याचे निर्देश राम जोशी यांनी दिले. सर्व प्राथामिक आरोग्य केंद्रांचे लोकेशन गूगल मॅपवर उपलब्ध करण्यात आले आहे. दुर्गोत्सव मंडळाच्या मंडपातही आरोग्य तपासणीची व्यवस्था केली जाणार आहे.
मनपाच्या ३४ यूपीएचसीमध्ये शिबिरे
लक्ष्मीनगर झोन - जामठा यूपीएचसी, सोमलवाडा यूपीएचसी, फुटाळा यूपीएचसी
धरमपेठ झोन- हजारीपहाड यूपीएचसी, तेलंगखेडी यूपीएचसी, केटीनगर यूपीएचसी
हनुमाननगर झोन - नरसाळा यूपीएचसी, मानेवाड़ा यूपीएचसी
धंतोली झोन - बाबुलखेडा यूपीएचसी, कॉटन मार्केट यूपीएचसी, नंदनवन यूपीएचसी
नेहरूनगर झोन - बेबीपेठ यूपीएचसी, ताजबाग एचपी, दिघोरी एचपी
गांधीबाग झोन - मोमीनपुरा यूपीएचसी, भालदारपुरा यूपीएचसी, शांतीनगर यूपीएचसी
संतरजीपुरा झोन - मेहंदीबाग यूपीएचसी, जागनाथ बुधवारी यूपीएचसी, सतरंजीपुरा यूपीएचसी
लकंडगंज झोन - डिप्टी सिग्नल यूपीएचसी, पारडी यूपीएचसी, विजयनगर (भरतवाडा) यूपीएचसी, हिवरीनगर यूपीएचसी आशीनगर झोनकपीलनगर यूपीएचसी, पाचपावली यूपीएचसी, शेंडेनगर यूपीएचसी, गरीब नवाज एचपी
मंगळवारी झोन - झिंगाबाई टाकळी यूपीएएचसी, इंदोरा यूपीएचसी, गोरेवाडा यूपीएचसी,नारा यूपीएचसी, एनएमएच हॉस्पिटल (याशिवाय इंदिरा गांधी रुग्णालय, पाचपावली प्रसूतीगृह, आयसोलेशन हॉस्पिटल)
विशेष शिबिरे
या अभियानांतर्गत विशेष आरोग्य तपासणी शिबिरे घेण्यात येणार आहे. यात महिला व मातांची तपासणी केल्या जाणार आहे. वजन व उंचीनुसार बीएमआय काढणे, लघवी तपासणी, मधुमेहसंबंधी सर्व तपासण्या केल्या जाणार आहेत. याशिवाय कर्करोग स्क्रिनिंग, रक्तदाब स्क्रिनिंग, मधुमेह स्क्रिनिंगसह (३० वर्षावरील सर्व महिला) माता व बालकांचे लसीकरण केले जाणार आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.