नागपूर - दीक्षाभूमी परिसरातून कुठला परिसर कुठल्या दिशेने आहे, राहण्याची सुविधा कुठे, याबाबत दिशादर्शक फलक लावले आहेत. हे सर्व फलक मराठीत असून ते दीक्षाभूमीवर आलेल्या उत्तर भारतीय तसेच विदेशी नागरिकांसाठी कोडे ठरले आहे. त्यामुळे येथे केवळ महाराष्ट्रातूनच अनुयायी येत असल्याचा महापालिकेचा समज झाल्याचे दिसते. किंबहुना महापालिकेला दीक्षाभूमीवर देशाच्या कानाकोपऱ्यातूनच नव्हे तर विदेशातूनही नागरिक येत असल्याचा विसर पडल्याचे दिसत आहे.
धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त देशभरातूनच नव्हे तर श्रीलंका, थायलंड, जपान, म्यांमार येथून बौद्ध बांधव दीक्षाभूमीवर आले आहेत. येथे महापालिकेने बौद्ध अनुयायांसाठी तात्पुरते शौचालय, नळ, फिरते शौचालये, आरोग्य सुविधा, अग्निशमन यंत्रणा उभी केली आहे. दीक्षाभूमी परिसरात अनेक ठिकाणी निवासाचीही सुविधा केली. फिरते शौचालय अंबाझरी, कारागृह, नीरी रोड, दक्षिण अंबाझरी रोडवर आहेत. महापालिकेने ठिकठिकाणी दिशादर्शक फलकही लावले आहेत.
विशेष म्हणजे रात्रीच्या वेळी एलईडी स्क्रीनवरील दिशादर्शक फलक आकर्षित करीत आहेत. याशिवाय दीक्षाभूमीकडे जाणारा रस्ता व अजनी रेल्वे स्टेशन, मध्यवर्ती रेल्वे स्टेशन, बस स्थानक आदीबाबत मोठ्या होर्डिंग्सवर रस्त्यांचा नकाशा लावला आहे. परंतु ही सर्व माहिती मराठीमध्येच आहे. परिणामी उत्तरप्रदेश,
मध्यप्रदेश, राजस्थान, बिहार, हिमाचलप्रदेश आदी हिंदी भाषिक प्रदेशातून येणाऱ्या बौद्ध अनुयायांना नेमके काय लिहिले, हेच अर्थच कळत नाही. त्यामुळे त्यांचा गोंधळ उडत असून विविध मार्ग तसेच ठिकाणाबाबत स्टॉलवर विचारणा करावी लागत आहे. कुठल्याही ठिकाणाची माहिती घेताना त्यांचा गोंधळ उडत आहे. अनेकदा स्टॉलवरील कर्मचारी, स्वयंसेवक दिशादर्शक फलकाकडे बोट दाखवित आहे. अशावेळी उत्तर भारतातून आलेल्या नागरिकांची फजिती होताना दिसत आहे. त्यामुळे एका स्टॉलवरील कर्मचाऱ्याने महापालिकेला दीक्षाभूमीचे जागतिक महत्त्व माहिती नाही काय, असा सवाल केला.
दीक्षाभूमी ही जागतिक आहे. येथे देशभरातून तसेच वेगवेगळ्या देशातून अनेक भाषिक लोक येतात. त्यांना या परिसरात येणे किंवा येथून दुसरीकडे जाण्यासाठी दिशदर्शक फलकांची गरज आहे. महापालिकने ती गरज पूर्णही केली. परंतु महापालिकेने दीक्षाभूमीचे जागतिक महत्व लक्षात घेऊन मराठीसह हिंदी व इंग्रजी भाषेतही दिशादर्शक फलक लावण्याची गरज आहे. पुढील वर्षीपासून महापालिकेने हिंदी, मराठी व इंग्रजी भाषेचा वापर करावा.
- ॲड. स्मिता कांबळे,
राष्ट्रीय समन्वयक, समता सैनिक दल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.