नागपूर - वडील दिवसभर सीताबर्डीच्या मुख्य मार्गावर पर्स विकून कसेबसे कुटुंबाचे पालनपोषण करतात. तर थोरल्या मुलीची अंतराळ विज्ञानमध्ये रुची. अशा परिस्थितीत वडिलांनी पोटाला चिमटा घेऊन दोन्ही मुलींना प्रोत्साहन दिले. थोरल्या मुलीनेही आई-वडिलांच्या मेहनतीचे चीज करत थेट प्रतिष्ठेच्या इस्रोमध्ये झेप घेत, उपराजधानीच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.
ही संघर्षमय पण तेवढीच प्रेरणादायी कहाणी आहे झिंगाबाई टाकळीतील सांडे परिवाराची. घरातील कर्ता पुरुष असलेले प्रफुल्ल सांडे रोज सकाळपासून संध्याकाळपर्यंत बर्डीच्या मुख्य मार्गावर उन्हातान्हात पर्सची विक्री करतात. दिवसभराच्या परिश्रमानंतर होणाऱ्या मिळकतीतून ते गृहिणी (वैशाली) व आपल्या दोन मुलींचा सांभाळतात.
घरात आर्थिक चणचण असूनही, त्यांनी दोन्ही मुलींना कधीच काही कमी पडू दिले नाही. त्यांच्या आवडी-निवडी जोपासल्या, चांगल्या शाळेत शिक्षण दिले. लहानपणापासून अंतराळ विज्ञानात रुची असलेल्या गार्गी सांडे या थोरल्या मुलीनेही प्रचंड मेहनत घेत करिअरमध्ये उंच झेप घेतली.
२० वर्षीय गार्गी नुकतीच इस्रो तिरुवनंतपुरम येथील अंतराळ संशोधन संस्थेत ४५ दिवसांचे प्रशिक्षण (इंटर्नशिप) यशस्वीरित्या पूर्ण करून नागपुरात परतली. या प्रशिक्षणासाठी रस्त्यावर पर्स विक्रेत्याच्या मुलीची इस्रोत झेप!
संपूर्ण भारतातून केवळ पाच विद्यार्थ्यांची निवड झाली होती. त्यात विदर्भ व महाराष्ट्रातील एकमेव गार्गीचा समावेश होता.
या प्रशिक्षणादरम्यान गार्गीने रॉकेटमधील अत्यंत महत्त्वपूर्ण भाग असलेल्या क्रायोजेनिक इंजिन तंत्रज्ञानाचा सहा महिन्यांचा जवळून अनुभव घेतला. ग्रुप लीडर म्हणून त्यातील बारकावे समजून घेतले.
शिवाय भारताचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या चांद्रयान-३ मोहीम यशस्वी होताना मुख्य कॉन्फरन्स रूममध्ये बसून बघितली. हा अविस्मरणीय अनुभव ‘सकाळ’शी शेअर करताना गार्गी म्हणाली, प्रशिक्षणादरम्यान मला इस्रोमध्ये खूप काही शिकायला मिळाले. अंतराळ विज्ञान व तंत्रज्ञान किती ‘टफ’ असते, याची जाणीव झाली. हा अनुभव मी आयुष्यात कदापि विसरू शकत नाही. माझ्या मनात याबद्दल आणखी कुतूहल निर्माण झाले आहे.
त्यामुळे भविष्यात जर्मनी किंवा आयआयटी खरगपूरमधून एम. टेक. करून इस्रोची सायंटिस्ट होण्याचा मानस सध्या एस. बी. जैन कॉलेजमध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या (बी. टेक.) चौथ्या व अंतिम वर्षात शिकत असलेल्या २० वर्षीय गार्गीने बोलून दाखविला.
युवापिढीला ‘मोटिव्हेशन’ची गरज
चांद्रयान-३ ची ऐतिहासिक व यशस्वी मोहीम आणि त्यानंतर आदित्य एल-१ च्या प्रक्षेपणानंतर युवापिढीमध्ये अंतराळ विज्ञानाबद्दल प्रचंड आकर्षण वाढले आहे. त्यामुळे अनेक पालक आपल्या मुला-मुलींना प्रोत्साहन देत आहेत. कॉलेजमधूनही त्यांना तितकाच ‘सपोर्ट’ व ‘मोटिव्हेशन’ मिळणे अपेक्षित आहे. दुर्दैवाने यात नागपूर व विदर्भ कमी पडत असल्याचे दुःख गार्गीने बोलून दाखविले.
नितीन गडकरींकडून गार्गीचे कौतुक
नागपूरचा नावलोकिक वाढल्याबद्दल गार्गीचा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी गडकरींनी तिचे कौतुक करत, हे यश नागपूरकरांसाठी अभिमानाची बाब असल्याचे सांगितले. यावेळी झिंगाबाई टाकळीतील माजी नगरसेविका संगीता गिऱ्हे व दीपक गिर्हे उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.