बेला : येथून केवळ दोन किलोमीटर अंतरावर असणाऱ्या सालई खुर्द गावाजवळून नांद नदी वाहते. त्यामध्ये शेडेश्वर येथील नांद धरणाचे पाणी सोडल्यामुळे गेल्या सात दिवसांपासून पुराने गावाला वेढा घातला आहे.
त्यामुळे गावकऱ्यांचा संपर्क तुटला आहे. वारंवार आग्रही मागणी केल्यानंतरही शासनाने नदीवर पूल न बांधल्यामुळे अत्यावश्यक कामकाजासाठी येणाऱ्यांना कळमनामार्गे सात किलोमीटरचा अडीअडचणीच्या रस्त्याने फेरा घालून बेला येथे बिकटवाटेने यावे लागते.
कारण कळमना रस्त्याने ये-जा करताना गावाजवळच्या एका पाटाला पूर येतो. शासनाने अजूनपर्यंत नदीवर पूल बांधण्याची तसदी घेतली नाही. त्यामुळे गावकऱ्यांचा संताप अनावर होत आहे. गटग्रामपंचायत कळमना(बेला)अंतर्गत येणाऱ्या सालई खुर्द गावाची सद्यस्थितीत लोकसंख्या अवघी १५० आहे.
रस्ता, पूल व पुराच्या समस्यामुळे गावातील अनेक कुटुंबे बेला येथे वास्तव्यासाठी स्थलांतरित झाली आहेत. नांद धरणाच्या पूरप्रभावित क्षेत्रात हे गाव येते. परंतु शासनाने त्यांचे गेल्या ३० वर्षांपासून अजूनपर्यंत पुनर्वसन केले नाही. हे एक आश्चर्यच आहे. येथील नागरिकांना कामासाठी तसेच कृषी विषयक व दैनंदिन जीवनावश्यक कामासाठी बेला येथेच नेहमी ये-जा करावी लागते. मात्र पूर आल्यामुळे सालई खुर्द गावाचा संपर्क तुटला आहे.
पाच वर्षांपूर्वी गावाबाहेर अंत्यसंस्कारासाठी सिमेंट काँक्रीटची स्मशानभूमी बनवली आहे. परंतु, तेथे जाताना सुद्धा एका नाल्याला पूर येतो. येथील रहिवाशांना अंतिम मोक्षप्राप्तीच्या रस्त्याने सुद्धा नरकयातना सहन कराव्या लागत आहे, ही शोकांतिका दृष्टीपथास येते.
पिढ्यानपिढ्यां चालत आलेली ही समस्या आहे. निवडणूक आली की नेते गावात येतात, आश्वासन देऊन बोळवण करून जातात. एरवी उन्हाळ्यातही आम्हाला कंबरभर पाण्यातून नांद नदीचे पात्र ओलांडून जीव धोक्यात घालून येणे-जाणे करावे लागते. वारंवार मागणी केल्यानंतरही अजूनपर्यंत शासनाने येथे नदीवर पूल बांधला नाही.
अडीअडचणीच्या व अत्यावश्यक वेळी निर्माण होणारा हा जीवन मरणाचे दृष्टचक्र केव्हा बंद होईल, असा संतप्त सवाल सालई खुर्द येथील नागरिक माजी ग्रामपंचायत सदस्य रामदास क्षीरसागर, समीर तेलंग, मनोहर तेलंग, बबन लांजेवार, सुधाकर क्षीरसागर, रवींद्र ठवरे, वसंत भेंडे, भीमराव तेलंग, अंकुश राऊत, गोपाल तेलंग व समस्त नागरिकांनी केला आहे.
येथील नागरिकांना बेला येथे येण्यासाठी दुसरा पर्यायी मार्ग आहे. तो म्हणजे कळमनामार्गे बेला येथे जाण्याचा. परंतु कळमना मार्गाने सात किलोमीटरचा वळसा पडतो . त्या मार्गाने सुद्धा रस्ता बांधकाम अर्धवट झाले आहे.
याशिवाय, गावापासून एक किलोमीटर अंतरावर शेतातून आलेला पाट रस्त्यावर आडवा आहे. मुसळधार पाऊस आला की त्या पाटाला सुद्धा पूर येतो. वायगावला (गोंड)जाणारा तिसरा पर्यायी मातीचा पांधण रस्ता पावसाळ्यात खूप चिखलाने माखलेला असतो. त्यामुळे त्या मार्गाने तर जाताच येत नाही. अशावेळी तिन्ही कडील रस्ते बंद होऊन सालई खुर्दची अवस्था '' अंदमान निकोबार '' बेटाप्रमाणे होते.
बेला : मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे गेल्या चार-पाच दिवसांपासून बेला नजीकच्या वडगाव धरणातून वेणा नदीपात्रात पाणी सोडणे सुरू आहे. वेगवान प्रवाह असल्यामुळे नागरिकांनी नदीपात्र ओलांडू नये व स्वतःसह मालमत्तेची काळजी घ्यावी, असे आवाहन निम्न वेणा वडगाव धरणाचे उप विभागीय अभियंता राजेश पाटील व शाखा अभियंता प्रणील शेंडे यांनी समाज माध्यमांद्वारे केले आहे निम्न वेणा वडगांव धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठया प्रमाणात पाऊस पडणे सुरू असल्यामुळे धरणाची पाणी पातळी सतत वाढत आहे.
धरण सुस्थीतीत व नियंत्रणात ठेवण्यासाठी तसेच जलाशय परिचलन आराखड्याप्रमाणे धरणाचे २१ पैकी ११ गेट ५०सेंटीमीटरने उघडण्यात आले आहेत. त्यातून ४७३. ७७ क्युमेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सोडण्यात येत आहे.
धरणात येणारा पाण्याच्या आवकनुसार पुढे सुद्धा पाण्याचा विसर्ग वाढविणे किंवा कमी करण्याची कारवाई केली जाऊ शकते. तरी नदी काठावरील गावातील नागरिकांनी नदीपात्रातून आवागमन करू नये, कोणीही नदीपात्राजवळ जाऊ नये, तसेच स्वतः ची व आपल्या मालमत्तेची काळजी घ्यावी, असा सतर्कतेचा इशारा पाटबंधारे विभागाच्या वतीने देण्यात आला आहे.
शितलवाडी : तोतलाडोह धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठया प्रमाणात पाऊस झाल्यामुळे तसेच पेंच चौराई धरणाची द्वारे उघडल्याने तोतलाडोह धरणाची पाणी पातळी सतत वाढत आहे. धरण सुस्थितीत, नियंत्रणाकरीता जलाशय परिचलनकरीता धरणाचे ८ वक्रद्वारे ०.३ मिटर विसर्ग पेंच नदीपात्रात सोडण्यात आले आहे.
पुढील काही तासात नदी काठावरील गावांना तसेच नदीपात्रातून आवागमन करणाऱ्या सर्व संबंधितानी स्वतः ची व आपल्या मालमत्तेची काळजी बाळगावी, असा सतर्कतेचा इशारा प्रशासनातर्फे देण्यात येत आहे. कोणत्याही नागरिकांनी नदीपात्राजवळ जाणे टाळाण्याचा इशारा पाटबंधारे विभागाकडून देण्यात आला आहे.
वडगाव धरणातून पाणी सोडणे सुरू असूनसुद्धा बेला सोनेगाव रस्त्यावरील दहेली नजीकच्या पुलावरून पाणी वाहत नसल्यामुळे वाहतूक व्यवस्था सुरक्षितपणे सुरू आहे. त्यामुळे बातमी लिहिस्तोवर बेला सोनेगावमार्गे नागपूर वर्धा व हिंगणघाटला जाण्याची वाहतूक अबाधित सुरू होती.
वेलतूर- चिकना येथील बारोबा तलाव शेतकऱ्यांच्या जीवावर उठला असून त्यात शेतकऱ्याच्या शेकडो एकरातील पीक नष्ट होत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. चिकणा येथे जिल्हा परिषदेच्या मालकीचा तलाव असून तो तलाव पावसाच्या पाण्याने भरल्यावर त्याचे पाणी लगतच्या शेतात पसरते.
पिके बुडून सडत असल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते. सुमारे १३ शेतकऱ्यांच्या शेतीला याचा फटका बसत असतो. वारंवार बसणाऱ्या फटक्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. जलसंधारण विभागाने तलाव खोलीकरण करुन शेतीचे होणारे नुकसान टाळावे, अशी मनिषा फेंडर यांनी मागणी केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.