Fake Receipt for Sand Smuggling: महसूल विभागाच्या ताब्यात असलेली दोन वाहने बोगस कागदपत्रांच्या मदतीने वाळू तस्करांनी पळविली. मात्र येथील ठाणेदाराच्या समयसूचकतेमुळे प्रकरणाचे बिंग फुटले व पळवलेला एक टिप्पर जप्त करण्यात यश आले.
तालुक्यातून मोठ्या प्रमाणात वाळूची अवैध वाहतूक करण्यात येत आहे. वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यात येते. अनेकदा वाहन जप्तही करण्यात येते. अशा वाहनांना बोगस पावत्यांचा मदतीने पळविण्याचा प्रतापही उजेडात आला. त्यामुळे वाळू तस्करांनी प्रशासनातही घट्ट पाय रोवल्याचे दिसून येते.
टिप्पर (क्र. एमएच ३१ डीएस ०१६२) ६ ऑगस्ट तर ट्रॅक्टर (क्र. एमएच ३६ एल ६१९५) हा १९ ऑक्टोबर २०२३ ला चोरीची वाळू वाहून नेताना पवनी (जि. भंडारा) तहसील कार्यालयाच्या भरारी पथकाकडून जप्त करण्यात आले होते. तहसील कार्यालय परिसरात जागा नसल्याने ही वाहने पवनी एसटी आगार व्यवस्थापकांच्या ताब्यात ठेवण्यात आली. तेव्हापासून दोन्ही वाहने आगाराच्या आवारातच उभी होती. जप्त केलेल्या वाहनांवर महसूल खाते दंड आकारणी करते. हे वाहन दंड भरल्यानंतर त्याच्या पावत्या एसटीच्या आगार व्यवस्थापकाला दाखविल्या की वाहने ठेवल्याबाबतचे भाडे वसूल करून त्यांच्याकडून वाहने सोडली जातात. (Latest Marathi News )
परंतु महसूल खात्याचा दंड न भरता, दंड भरल्याच्या बोगस पावत्या संबंधितांकडून तयार करण्यात आल्यात. त्या बोगस पावत्या आगार व्यवस्थापकाला दाखवून २९ मार्चला टिप्पर व ट्रॅक्टर पळविण्यात आले. दरम्यान बोगस पावत्यांच्या मदतीने सोडविलेला टिप्पर त्याच दिवशी भिवापूर पोलिसांनी जप्त केल्याने वरील प्रकरणाचे बिंग फुटले. पवनी तहसील कार्यालयातर्फे मंडळ अधिकारी टी. टी. मोरे यांनी पोलिसांत तक्रार नोंदविली.
वाहन मालकांवर संशय
टिप्पर मालक प्रदीप भोदे रा. नागपूर व ट्रॅक्टर मालक सुरेश लहू काटेखाये रा. पवनी जि. भंडारा यांच्यावर संशय व्यक्त करण्यात येत आहे. त्यांनीच पवनी तहसील कार्यालयाच्या पूर्वीच्या तहसीलदार नीलिमा रंगारी यांची बोगस सही व शिक्क्याने पावत्या तयार करून आगार व्यवस्थापकाची फसवणूक केल्याचा आणि वाहने पळवून नेल्याचा त्यांच्यावर आरोप केला जात आहे. टिप्पर जप्त करण्यात आला मात्र ट्रॅक्टर अद्याप पोलिसांना गवसला नसून पवनी कसून शोध घेत आहेत.
असे फुटले बिंग
२९ मार्चला भिवापूर येथील ठाणेदार जयप्रकाश निर्मल हे पेट्रोलिंग करीत असताना त्यांची नजर निलजकडून भिवापूरच्या दिशेने येत असलेल्या टिप्पर (क्र. एमएच ३१ डीएस ०१६२) वर पडली. ओव्हरलोड वाळू भरलेली असल्याने त्यांनी पाठलाग करून येथील दिघोरा परिसरात टिप्पर थांबविला. चालकाकडे विचारपूस केली असता पवनी येथे जप्त असलेला टिप्पर सोडवून आणल्याचे त्याने सांगितले. (Latest Marathi News )
कागदपत्रांची पाहणी केली असता दंड भरल्याच्या पावतीवर खोडतोड दिसून आली. निर्मल यांना संशय आल्याने त्यांनी पवनीचे तहसीलदार महेंद्र सोनोने यांच्याशी संपर्क साधला. त्यांना पावतीचे छायाचित्र पाठविले. ते बोगस असल्याचे समोर आले व प्रकरणाचे बिंग फुटले. टिप्पर सोबत अशाच बोगस कागदपत्रांच्या मदतीने एक ट्रॅक्टर सुद्धा पळवून नेल्याची बाब तहसील कार्यालयाच्या चौकशीत उघडकीस आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.