नागपूर : नाशिक येथे खासगी बस आणि टँकरच्या अपघातानंतर लागलेल्या आगीत बसमधील १२ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना विदर्भात धावणाऱ्या शिवशाही गाड्यांची पाहणी केली. त्यात बहुतांश गाड्यांमध्ये अग्निशमन यंत्रणाच नसल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. आपत्कालीन परिस्थितीत आगीची घटना उद्भवल्यास प्रवाशांची सुरक्षा कशी होणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
नाशिकमध्ये खासगी बसचा अपघात झाला. खासगी बससारखीच शिवशाहीची रचना आहे. वातानुकूलित आणि आसनाकरिता वापरण्यात आलेले फोम आहे. आगीचा प्रकार उद्भवल्यास यातून लवकर पेट घेण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे अशा प्रसंगी बसगाडीत अग्निशमन यंत्रणा असणे आवश्यक आहे. राज्य परिवहन महामंडळ (एसटी)चे गणेशपेठ येथे मध्यवर्ती बसस्थानक आहे. विदर्भातून बहुतांश शिवशाही येथे येतात. तसेच येथून लांब पल्ल्यासाठी सुद्धा गाड्या जातात.
येत्या काही दिवसात दिवाळीचा सण येऊन ठेपल्याने बसस्थानकावर चांगलीच गर्दी आहे. चंद्रपूर, अमरावती, भंडारा, यवतमाळ, वर्धा, अकोला आदी ठिकाणांहून गाड्या बसस्थानकावर येता. तर नागपूर विभागातूनसुद्धा पुणेसह इतर लांब पल्ल्याचा शिवशाही धावतात. स्थानकावर येणाऱ्या शिवशाहीची पाहणी केली असता बहुतांश गाड्यांमध्ये अग्निशमन यंत्रणाच नसल्याचे आढळून आले. केवळ एका शिवशाहीमध्ये ही यंत्रणा होती. त्यामुळे विदर्भात बहुतांश शिवशाही अग्निशमन यंत्रणेविना धावत असल्याचे पुढे आले आहे. नागपूर विभागात घाटरोड येथे १२ तर गणेशपेठ आगारात २५ शिवशाही आहेत.
अचानक आग लागल्यास शिवशाहीसुद्धा खासगी बस सारखी पेटून क्षणार्धात कोळसा होऊ शकते. अशा आपत्कालीन स्थितीत प्रवाशांचा जीव धोक्यात असू शकतो. त्यामुळे नाशिक घटनेतून एसटी महामंडळ प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून काही धडा घेणार का? असा सवाल निर्माण झाला आहे. यासंदर्भात एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने आणि महाव्यवस्थापक (वाहतूक) शिवाजी जगताप यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
रस्ते सुरक्षा कायद्यांतर्गत वाहनांमध्ये अग्निशमन यंत्रणा असणे बंधनकारक आहे. हा प्रकार प्रवाशांसाठी धोकादायक ठरू शकतो. त्यामुळे एसटी महामंडळाने यावर तत्काळ उपाययोजना करायला हवी.
-मुकेश तिगोटे, सरचिटणीस, महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस (इंटक)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.