Nagpur 90 year old father struggle for justice 
नागपूर

नागपूर : ९० वर्षीय वृद्ध पित्याची न्यायासाठी धडपड!

पोलिस आयुक्तांसह जागोजागी मारताहेत चकरा

नरेंद्र चोरे

नागपूर : मायबाप आयुष्यभर मेहनत करून मुलांना लहानाचे मोठे करतात. शिक्षण शिकवून स्वतःच्या पायावर उभे करतात. मात्र बऱ्याचवेळा काही निष्ठुर मुले मायबापांच्या कष्टाची कदर करीत नाहीत. शुक्लानगर (ओंकारनगर चौक) येथील ९० वर्षीय ज्येष्ठ नागरिक वसंतराव देशमुख यांची अशीच काहीशी कहाणी आहे. त्यांनी पित्याचे कर्तव्य पार पाडत आपल्या चारही मुलांना आत्मसन्मानाने जगणे शिकविले. त्या मोबदल्यात मुलांकडून मात्र त्यांना शारीरिक व मानसिक वेदना मिळाल्या. न्यायासाठी या वृद्ध पित्याने जिल्हाधिकारी व पोलिस आयुक्तांपासून ठिकठिकाणी चकरा मारल्या. परंतु कुठेही न्याय न मिळाल्याने ते हताश झाले आहेत.

१९९४ मध्ये पोलिस उपनिरीक्षक म्हणून सेवानिवृत्त झालेले वसंतराव यांना एकूण पाच मुले होती. अभियंता असलेला थोरला मुलगा लग्नापूर्वीच अपघातात मरण पावल्यानंतर चारही मुलांचा त्यांनी व्यवस्थित सांभाळ केला. मुलांना पदवी तसेच पदव्युत्तरपर्यंत शिकवून नोकरी व व्यवसायाला लावले. लग्न करून दिले. इतकेच नव्हे, कुटुंब व व्यस्त ड्यूटी सांभाळून काटकसर करत त्यांनी मुलांसाठी ३२ लाख रुपये खर्च करून बारा खोल्यांचे दोन मजली घरही बांधले.

मात्र मुलांनी मेहनतीची कदर न केल्याने ते सध्या दुःखी आहेत. चारपैकी दोन मुले त्रास देत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. मुलांनी जबरदस्तीने अर्ध्या घरावर बेकायदेशीररीत्या कब्जा केला असून, दारू पिऊन शिवीगाळ व मारझोड करीत असल्याची त्यांची तक्रार आहे. या वादात गेल्या २० वर्षांपासून घराचा टॅक्ससुद्धा भरला नसल्याचे ते म्हणाले. वसंतराव पहिल्या मजल्यावरील सहा खोल्या किरायाने देणार होते. मात्र एका मुलाने रागाच्या भरात दारे व खिडक्या फोडल्याने किरायेदारही यायला घाबरत आहेत. मुलांचे रंगढंग व पैशाची हाव पाहून आता त्यांनी स्वकमाईतून बांधलेले संपूर्ण घरच विकायला काढले आहे.

पोलिसांकडेही मिळाला नाही न्याय

वसंतराव हे स्वतः पोलिस अधिकारी राहिले आहेत. त्यांनी ४० वर्षे इमानेइतबारे पोलिस विभागात नोकरी केली. त्यामुळे मोठ्या आशेने ते अजनी पोलिस ठाण्यात तक्रार घेऊन गेले होते. मात्र तिथेही त्यांची निराशाच झाली. पोलिसांनी कोणतीच कारवाई केली नाही. उलट घरगुती वाद असल्याचे सांगून त्यांना टरकावून लावले. न्यायासाठी एका माजी पोलिस अधिकाऱ्याला इतका त्रास होत असेल, तिथे सर्वसामान्यांचे काय?

आत्महत्या हाच शेवटचा पर्याय

सगळीकडे चपला झिजवूनही न्याय न मिळाल्याने हा वृद्ध पिता पार खचून गेला आहे. शेवटचा प्रयत्न म्हणून त्यांनी मुख्यमंत्र्यांना भेटण्याचा निर्णय घेतला आहे. तिथेही न्याय न मिळाल्यास माझ्यासमोर आत्महत्येशिवाय दुसरा पर्याय शिल्लक राहणार नसल्याचे त्यांनी सांगितले.

मुलांसाठी केली होती विनवणी

आयुष्यभर पोलिस खात्यात नोकरी करणाऱ्या वसंतराव यांनी आपल्या ओळखीचा फायदा करून घेत मुलांच्या ॲडमिशनसाठी त्या काळात नासिकराव तिरपुडे व दादासाहेब धनवटेंसारख्यांचे हात-पाय जोडले होते. त्यामुळेच चारही मुले शिक्षण पूर्ण करू शकल्याने ते म्हणाले. वसंतराव यांना दर महिन्याला २१ हजार पेंशन मिळते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT