नागपूर : हत्तीपाय रोगाचे समुळ उच्चाटन करण्यासाठी ट्रिपल ड्रग थेरेपीपासून तर विविध उपक्रम राबवण्यात येतात. मात्र, मागील दोन वर्षांपासून कोरोनाच्या महामारीमुळे हत्तीरोगाचे दरवर्षी होणाऱ्या सर्वेक्षणाची गती संथ झाली. हत्तीरोगाचे नागपूर विभागात २५ हजारांपेक्षा जास्त रुग्ण आहेत. यात अंडवृद्धीचे ९ हजार ४७६ रुग्ण आढळले. यांच्यावरील शस्त्रक्रियेची गरज होती, मात्र कोरोनामुळे अंडवृद्धीच्या शस्त्रक्रियांना थांबा लागला होता.नऊ हजारांवर अंडवृद्धीचे रुग्ण शस्त्रक्रियेच्या प्रतिक्षेत असल्याची माहिती पुढे आली आहे.
२००४ पासून राष्ट्रीय हत्तीरोग नियंत्रण कार्यक्रम राबवला जात असून, हत्तीरोगाचे नवीन रुग्ण मिळण्याचे प्रमाण मात्र कमी झाले असल्याचा दावा आरोग्य विभागाने केला आहे. मात्र, नागरिक हत्तीरोग तसेच अंडवृद्धीचा आजार लपवीत असल्याने, अशा रुग्णांना शोधण्याची मोहीम हिवताप विभागाकडून हाती घेण्यात येते.
जिल्ह्यात ४९ मुलांच्या शरीरात दुषित रक्त
नुकतेच लहान मुलाच्या रक्ताची तपासणी करण्यात आली आहे. नागपुर जिल्ह्यात ५२ लाख लोकसंख्या ४ भागात करण्यात आली आहे. यातील २ भाग ग्रामीण नागपुरात तपासणी करणार होते. त्यानुसार ११ लाख ९७ हजार ४०० लोकसंख्येचे दोन भाग करण्यात आले.यासाठी दोन पथके तैनात करण्यात आली. यातील एका पथकाने ६ तालुक्यांत आतापर्यंत ९० गावांतील १ हजार ७२३ मुलांची तपासणी केली. यात १६ मुलांच्या शरीरात हत्तीपायाचे दुषित रक्त आढळून आले. तर दुसऱ्या पथकाने केलेल्या ७६ गावांतून १ हजार ७१० मुलांच्या रक्ताची तपासणी केली असता, ३३ मुलांमध्ये दुषित रक्त आढळले असल्याची माहिती नागपूर जिल्हा हत्तीरोग विभागाने राबलेल्या अभियानातून पुढे आली आहे.
लक्षात न येणारा रोग
हत्तीरोगाचा प्रसार "क्युलेक्स' या डासामुळे होतो. डास चावल्यानंतर जंतू शरीरात पोहोचतात. याचे परिणाम रुग्णावर तत्काळ दिसत नाही. ८ ते १८ महिन्यांनंतर अंगाला खाज सुटणे, पुरळ येणे, वारंवार ताप येणे, अंडवृद्धी होणे, जननेंद्रियावर सूज येणे, ही हत्तीरोगाची लक्षणे दिसून येतात. पुणे येथील सहसंचालक कार्यालयातून मिळालेल्या माहतीनुसार पुर्व विभागातील सहा जिल्ह्यांत २५ हजार ७२५ हत्तीपायाचे रुग्ण असल्याची माहिती मिळाली.
हत्तीरोगाचे विभागातील रुग्ण
गडचिरोली - ४४२०
वर्धा - १८२०
भंडारा - ३२५६
गोंदिया - ०८३६
चंद्रपूर -११३२९
नागपूर - ४०६६
हा आजार समाजाकडून लपवला जात आहे. मात्र शासनाच्या विविध उपक्रमातून सुक्ष्मरित्या सर्वेक्षण करण्यात येते. यामुळेच हत्तीरोगावर नियंत्रण येत आहे.सहाय्यक संचालक डॉ. श्याम निमगडे तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर यांच्या प्रयत्नातून ही मोहिम प्रभावीपणे राबवली जात आहे.
- डॉ. मोनिका चारमोडे, वैद्यकीय अधिकारी (हत्तीरोग), नागपूर विभाग
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.