नागपूर : शहरातील अनेकांनी झाडे तोडण्याची महापालिककडे परवानही मागितली. झाडांच्या मोबदल्यात झाडे लावण्याच्या अटीवर महापालिकेने परवानगी दिली. त्यासाठी नागरिकांनी अनामत रक्कमही भरली. परंतु, झाडे तोडल्यानंतर अनामत रक्कम परत नेणाऱ्यांची टक्केवारी केवळ तीन आहे. त्यामुळे महापालिकेकडे तीन कोटींवर अनामत रक्कम असून नियमानुसार नागरिक झाडे लावत नसल्याची धक्कादायक बाबही यातून पुढे आली आहे.
महापालिकेने नुकताच सिताबर्डी येथील २०८ वर्षांचे पिंपळाचे झाडे तोडण्यासाठी आक्षेप, हरकती, सूचना मागितल्या आहेत. या झाडांसाठी पर्यावरणप्रेमी हळहळ व्यक्त करीत आहेत. त्यातच आता शहरात वर्षाला हजारांवर झाडे तोडली जात असल्याचे माहिती अधिकारातून उघड झाले. आरटीआय कार्यकर्ते अभय कोलारकर यांना महापालिकेने दिलेल्या माहितीतून गेल्या पाच वर्षांमध्ये महापालिकेने ५ हजार २७४ झाडे तोडण्यासाठी परवानगी दिल्याचे पुढे आले. नागरिकांनी झाडे तोडताना पाच झाडे लावण्याबाबत शपथपत्र भरून दिले. याशिवाय महापालिकेला अनामत रक्कमही दिली.
परंतु झाडे तोडल्यानंतर अनामत रक्कम परत घेण्यास नागरिक येतच नसल्याचे महापालिकेचे उद्यान अधिक्षक अमोल चौरपगार यांनी सांगितले. त्यामुळे नागरिकच शहराच्या पर्यावरणाचे शत्रू ठरत असल्याचे अधोरेखित होत आहे. महापालिकेने गेल्या पाच वर्षांत नागरिकांकडून ३ कोटी ९५ हजार रुपये अनामत रक्कम म्हणून घेतले. परंतु पाच वर्षांत केवळ २ ते ३ टक्के नागरिकांनीच अनामत रक्कम परत नेली. अर्थात त्यांनी झाडे लावली. त्यामुळे अनेकांचे झाडांवरील प्रेम बेगडी असल्याचेही यातून सिद्ध होत आहे. बांधकाम आदी करताना झाडे तोडण्यासाठी महापालिका नियमानुसार परवानगी देते.
परंतु नागरिकच नियमांना सुरुंग लावत असल्याचे पुढे येत आहे. बॉक्स.. दोन दिवसांत तीन झाडांवर कुऱ्हाड माहिती अधिकारातील माहितीनुसार गेल्या पाच वर्षांत ५ हजार २७४ झाडे कापण्यात आली. वर्षाला ५२७ तर महिन्याला ४४ झाडे कापली जात आहे. दोन दिवसांत सरासरी तीन झाडांवर कुऱ्हाड मारली जात असून पर्यावरणावर प्रहार होत आहे. १ जानेवारी २०२० ते ३० ऑगस्ट २०२१, या पावणेदोन वर्षांच्या काळात १ हजार ११० झाडे तोडण्याची परवानही महापालिकेने दिली.
नागरिक परवानगी मागतात. झाडे लावण्याच्या अटीवर त्यांच्याकडून अनामत रक्कम घेऊन परवानगी देण्यात येते. परंतु अनामत रक्कम घेण्यास येणाऱ्या नागरिकांची संख्या केवळ ३ टक्के आहे. त्यामुळे उद्यान विभागाकडून अनामत रकमेतून झाडे लावली जाते. भांडेवाडीत आतापर्यंत या रकमेतून १५ हजार ५०० झाडे लावण्यात आली.
-अमोल चौरपगार, उद्यान अधिक्षक, महापालिका.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.