पारशिवनी : नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी तालुक्याच्या पदरात निसर्गाने भरभरून टाकले आहे. विद्युत प्रकल्प, भव्य पेंच जलाशय, कोलीतमारा वनक्षेत्र, तीर्थक्षेत्र आणि धार्मिकस्थळे असलेल्या पारशिवनीचा अपेक्षेप्रमाणे विकास झाला नाही. विकास करण्याची जबाबदारी राजकीय नेतृत्वाची आहे.
मात्र, या भागातील राजकीय पुढारी आणि लोकप्रतीनिधींमध्ये विकास घडवून आणण्यासाठी आवश्यक असलेल्या राजकीय इच्छाशक्तीचा अभाव आहे. परिणामी पारशिवनी तालुका विकासापासून दूर आहे.
पारशिवनीपासून नागपूर अवघ्या ३५ किलोमीटर अंतरावर आहे. दळणवळणाच्या सुविधा उपलब्ध असताना याचा लाभ घेता आला नाही. तालुक्यात आदिवासी बांधवही मोठ्या प्रमाणात आहेत. त्यांच्यापर्यंत शासनाच्या योजना पूर्णपणे पोहचल्या नाहीत.
या भागात एकही मोठा औद्योगिक प्रकल्प नाही. बेरोजगारी ही फार मोठी समस्या आहे. शिक्षण घेऊनही रोजगार नसल्याने तरुणवर्गात नाराजी आहे.
नवेगाव खैरी येथील बालोद्यान कधीकाळी प्रसिद्ध होते. या ठिकठिकाणी पर्यटकांची रेलचेल असे. याचा फायदा स्थानिक भागातील व्यावसायिकांना होत होता. रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या होत्या. पण, हे बालउद्यानही आता बंद पडलेले आहे. हे उद्यान पुन्हा सुरू करण्यासाठी कोणत्याही राजकीय नेत्याने प्रयत्न केले नाहीत.
विविध पक्षांच्या आमदार, खासदारांनी पारशिवनीचे नेतृत्व केले आहे. केवळ नाली बांधकाम, लहानसहान रस्ते, धार्मिकस्थळांना संरक्षण भिंत आणि समाजभवनांची उभारणी यापलीकडे लोकप्रतिनिधींची मजल गेली नाही. केवळ धर्म आणि जातीपातीच्या राजकारणाला प्राधान्य देण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.