नागपूर : गरिबांसाठी मेयो आणि मेडिकल आरोग्यमंदिर आहेत. येथील डॉक्टर गरिबांसाठी देवदूत ठरावे. मात्र, दिवसेंदिवस मेयोतील उपचार यंत्रणा ढासळत असून, मेयोतून मेडिकलमध्ये रेफर करण्याचे धोरण सुरू झाले. अवघ्या २६ वर्षांच्या गर्भवतीला मेयोतील त्वचारोग विभागातील डॉक्टरांकडून ‘इंजेक्शन नाही, मेडिकलमध्ये जा...’ असे सांगण्यात आले. ती महिला मेडिकलमध्ये आली. मेयोतील डॉक्टर यमदूताची भूमिका निभावत आहेत, अशी शंका येते. आजाराने होणाऱ्या वेदनांपेक्षा मेयोतून मिळालेल्या वेदनांनी ती गर्भवती खचली. प्रगती गणवीर असे गर्भवतीचे नाव.
वाडी परिसरात राहणाऱ्या महिलेस बॅक्टेरियल संसर्ग झाला. यावरील उपचारासाठी डिगडोह येथील खासगी रुग्णालयात आली. मात्र, पेनिसिलीन इंजेक्शन नसल्याचे सांगण्यात आले. यामुळे महिलेच्या पतीने इंदिरा गांधी शासकीय वैद्याकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) त्वचारोग विभागात उपचारासाठी आणले. मात्र, येथे वॉर्ड नसल्याचे सांगण्यात आले. दोन दिवस या महिलेने मेयोत खेटा घातल्या. अखेर येथील डॉक्टर महिलेने इंजेक्शन नसल्याचे कारण पुढे करीत उपचारासाठी मेडिकलमध्ये रेफर केले. मेडिकलमध्ये उपचारासाठी आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.
मेयोतून मोठ्या प्रमाणात रुग्णांना मेडिकलमध्ये रेफर करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. जर उपचार होत नसतील तर मेयो रुग्णालयाची दारे बंद करा असा संतप्त सवाल नातेवाईकांकडून विचारला जात आहे. प्रगतीची परिस्थिती हलाखीची आहे. यामुळे नातेवाईकांनी डिगडोह येथील एका मोठ्या धर्मदाय रुग्णालयात दाखल केले.
येथे विविध वैद्यकीय तपासणीनंतर तिच्यात गुप्तरोगाचे जिवाणू असल्याचा प्रकार पुढे आला. हा आजार बरा होत असून रुग्णाला पेनेसेलीन ॲन्टिबायोटिक (प्रतिजैविक) इंजेक्शनची गरज असते. इंजेक्शन नसल्याचे कारण सांगण्यात आले. सात ऑक्टोबरला तेथून सुटी देण्यात आली. मेयो रुग्णालयात रेफर केले. रुग्ण मेयो रुग्णालयात दोन वेळा गेली. येथील विभागप्रमुखांना भेटण्यास सांगण्यात आले. इंजेक्शन नसल्याचे सांगत त्वचारोग विभागाचा तज्ज्ञ नसल्याचे सांगत मेडिकलमध्ये उपचारासाठी जाण्याचा सल्ला देण्यात आला.
मेडिकलमध्ये मिळतील का उपचार?
मेयो रुग्णालयातून रेफर केल्यानंतर ती महिला सायंकाळच्या सुमारास मेडिकलच्या वैद्यकीय अधीक्षक कार्यालयात पोहोचली. उपस्थित अधिकाऱ्यांसमोर या महिलेला मेयोत मिळालेल्या उपेक्षेच्या वागणुकीचा पाढा वाचला. मेयोतील प्रकार बघून अधिकारीही थक्क झाले. मेडिकलमध्ये महिलेला उपचाराची हमी दिल्याने डोळ्यात आनंदाश्रू तरळले. डॉक्टरांसमोर हात जोडत उपचारापूर्वीच आभार मानले. गेल्या काही दिवसांपासून मेयो रुग्णालयातून सातत्याने मेडिकल रुग्णालयात रेफर करण्यात येत असल्याची माहिती पुढे आली.
मेयो रुग्णालयातील सर्जिकल कॉम्प्लेक्समधील कोविड रुग्णालय बंद करण्यात आले. गैरकरोनाच्या रुग्णांवर उपचार होत असल्याचा दावा केला जात आहे. मात्र, येथून सर्रास रुग्णांना दाखल न करताच थेट मेडिकलमध्ये रेफर केले जाते. मेयोतील त्वचारोग विभागात या महिलेस उपचार नाकारल्याच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात यावी.- सिद्धांत पाटील, वंचित बहुजन आघाडी, नागपूर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.