नागपूर : उपराजधानीत आतापर्यंत घडलेल्या १९ हत्याकांडांचा छडा लावण्यात नागपूर पोलिसांना अपयश आले आहेत. या हत्याकांडात आठ ज्येष्ठांचा समावेश आहे. ‘स्मार्ट अँड हायटेक असलेले नागपूर पोलिस’ या हत्याकांडांचा उलगडा करू न शकल्यामुळे पोलिस आयुक्तांसमोर नवे आव्हान आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चर्चित हत्याकांडाचा सुगावा आणि राज्यासह परप्रांतातील मोठमोठ्या गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यात नागपूर पोलिसांचा मोठा दबदबा आहे. शहरातील कुख्यात गुन्हेगारांच्या मनात गुन्हेशाखेची धडकी भरलेली असते. मात्र, शहरात सात वर्षांत घडलेल्या तब्बल १९ हत्याकांडांचा छडा लावण्यात नागपूर पोलिसांना अपयश आले. या हत्याकांडात तब्बल आठ ज्येष्ठ नागरिकांचा समावेश आहे.
अतिशय संवेदनशील असलेल्या ज्येष्ठांच्या हत्याकांडात तत्कालीन आयपीएस शैलेष बलकवडे यांनी रस दाखवत सकारात्मक प्रयत्न केला होता. मात्र, त्यांची बदली झाल्यानंतर कुण्याही वरिष्ठ अधिकाऱ्यांना हत्याकांडाचा छडा लावण्याचा प्रयत्न केला नाही. वाडीतील भगवती चंदा (७०) आणि सरोजबाई (६२) यांचा खून झाला होता तर नरेंद्रनगरातील प्रजाहित सोसायटीत राहणाऱ्या रोशनी पेठकर (६७) यांची दरोडेखोरांनी घरात घुसून हत्या केली. त्यांचे मारेकरी अद्यापही सापडले नाही.
निरीचे माजी वैज्ञानिक डॉ. आनंद बाळ यांच्या पत्नी वसुंधरा ऊर्फ जयश्री बाळ यांची गळा आवळून हत्या करण्यात आली होती. हे हत्याकांड राज्यभर गाजले होते. हत्याकांडाचा छडा लावण्यासाठी पॉलिग्रॉफीक टेस्ट आणि नार्को टेस्टपर्यंत पोलिस गेले होते. परंतु, पोलिसांच्या पदरी निराशा पडली.
सेंट्रल एव्हेन्यूवर आर्किटेक एकनाथ निमगडे यांची दिवसाढवळ्या गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. आरोपी दुचाकीने पळून गेले होते. सीसीटीव्ही फुटेज असतानाही नागपूर पोलिस तोंडघशी पडले होते. त्यामुळे या हत्याकांडाचा तपास सीबीआयकडे सोपविण्यात आला आहे.
आयुध निर्माणी परिसरातील काली माता मंदिरात पुजाऱ्याचा त्रिशूलने भोसकून खून करण्यात आला. कोराडी भागात प्रमिला मरोतराव कानफाडे (६२) यांची गळा चिरून खून करण्यात आला तर हुडकेश्वरातील न्यू म्हाळगीनगर परिसरातील सुमंताबाई हरिभाऊ देवळे (७५) यांचा गळा आवळून खून झाला होता तर जरीपटक्यातील शाहरूख शेख आणि सदरमधील अजित मेश्राम यांच्याही हत्याकांडाचे गूढ अद्याप उलगडण्यात स्मार्ट नागपूर पोलिसांना यश आले नाही हे विशेष...
उपराजधानीत सोनेगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका झाकण असलेल्या गडरमध्ये युवतीचा सांगाडा सापडला होता. सोनेगाव पोलिसांनी प्राण्यांची हाडे असल्याचा बनाव करीत रेल्वे लाईनजवळ ते हाडे पुरले होते. प्रसारमाध्यमांनी प्रकरण उचलून धरल्यामुळे फॉरेन्सिक रिपोर्टवरून मानवी सांगाडा असल्याचे स्पष्ट झाले होते. या हत्याकांडात शहरातील एका मोठ्या राजकीय नेत्याच्या नावाची चर्चा होती. मात्र, ते हत्याकांडही आतापर्यंत अनडिटेक्ट आहे.
देशातील ‘सुपर कॉप’च्या यादीत असलेल्या महाराष्ट्र पोलिस दलात ‘नागपूर क्राईम ब्रॅंच’चा दबदबा आहे. ड्रग्सचे रॅकेट, डॉन संतोष आंबेकर, राजू बद्रे यांच्यासह क्रिकेट बुकी आणि जुगार माफियांच्या छातीवर पाय ठेवून अंकुश राखला आहे. मात्र, आतापर्यंत गुन्हे शाखेला या १९ पैकी एकाही हत्याकांडाचा उलगडा करता आला नाही. त्यामुळे आता पोलिस आयुक्तांसमोर नवे आव्हान आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.