नागपूर ः उपराजधानीतील विभागीय रेल्वे रुग्णालय आता कोरोनारुग्णांवर उपचारासाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे. मंगळवारपासून येथे रुग्ण दाखल होण्याचा क्रम सुरू झाला. आपत्कालीन परिस्थितीसाठी उपचाराची सुविधा असलेले कोचेसही रेल्वेने तयार ठेवले आहेत. त्याच्या वापरासंदर्भातही संबंधित यंत्रणेसोबत चर्चा सुरू झाली आहे.
रेल्वे मंडळाच्या निर्देशानुसार रेल्वेच्या विभागांनी आयसोलेशन कोचेस तयार करून ठेवले आहेत. त्यात मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने अशाप्रकारचे ३० कोच तयार केले असून ते नागपूर, वर्धा, आमला येथे ठेवण्यात आले आहेत. त्यात एकूण ६९ बेड उपलब्ध असून ऑक्सिजनयुक्त आहेत. तर आयसीयूची सुविधा असलेले १८ बेड आहे .
याशिवाय अजनीत आरपीएफ बॅरेक परिसरातही आयसोलेशन सेंटर तयार करण्यात आले आहे. कोरोना रुग्णांची वाढती संख्या आणि अपुरे ठरणारे बेड लक्षात घेता रेल्वेने तयार ठेवलेल्या यंत्रणेचा उपयोग करण्याची मागणी जोरात सुरू आहे. याशिवाय कोरोनाग्रस्त रेल्वे कर्मचाऱ्यांवर उपचारासाठी रेल्वे रुग्णालयाला कोविड केयर सेंटर म्हणून कार्यरत करण्याचीही मागणी कामगार संघटनांकडून करण्यात येत होती. भारतीय यात्री केंद्राचे सचिव बसंत शुक्ला यांनी यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविले होते.
स्थानिक प्रशासनाला या संदर्भात निर्णय घ्यायचा आहे. उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने रेल्वे यंत्रणेच्या वापरासंदर्भात निर्णय घेण्यास महापालिकेला सांगितले आहे. संभाव्य परिस्थिती लक्षात घेता मध्य रेल्वेने पूर्वीच विभागीय रेल्वे रुग्णालयात कोरोना रुग्णावर उपचार करण्यासाठी आवश्यक यंत्रणा उभारण्यास प्रारंभ केला होता.
मंगळवारपासून येथे रुग्ण दाखल करण्यात क्रम सुरू करण्यात आला आहे. दाखल रुग्णसंख्येबाबत माहिती मिळू शकली नाही. तूर्त रेल्वे संक्रमित कर्मचाऱ्यांनाच येथे दाखल करून घेतले जात असल्याचे सांगण्यात येते. कोरोना रुग्णाच्या वापरासाठी स्वतंत्र गेटही तयार करण्यात आला आहे.
मध्य रेल्वेच्या विभागीय रेल्वे रुग्णालयात कोरोना रुग्णांना दाखल करून घेण्याचा क्रम मंगळवारपासून सुरू करण्यात आला आहे. सोबतच आयसोलेटेड रेल्वे कोचेसच्या वापरासंदर्भात स्थानिक प्रशासनासोबत चर्चा सुरू आहे.-विपुल सुस्कर, विभागीय वाणिज्य व्यवस्थापक, मध्य रेल्वे.
संपादन - अथर्व महांकाळ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.