नागपूर - जुना बगडगंज येथे घराचे बांधकाम करत असताना दुसऱ्या माळ्यावरून कोसळल्याने मजुराच्या मेंदूपेशी मृत झाल्या. त्यांच्या कुटुंबीयांच्या परवानगीनंतर एका ६४ वर्षीय ज्येष्ठ नागरिकात यकृताचे प्रत्यारोपण करीत जीवनदान देण्यात आले. तर नेत्रगोलांमुळे दोघांच्या अंधारल्या जीवनात प्रकाशपेरणी शक्य होणार आहे.
राकेश बारसागडे असे मेंदूपेशी मृत झाल्यानंतर अनंताच्या प्रवासाला निघालेल्या मजुराचे नाव आहे. राकेश हे हातमजुरीची कामे करीत होते. दोन दिवसांपूर्वी बांधकाम करीत असताना अचानक त्यांचा तोल गेला आणि ते दुसऱ्या माळ्यावरून खाली कोसळले. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.
नातेवाईकांनी लगेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयमधील ट्रॉमा केअर सेंटर येथे त्यांना दाखल केले. सर्व उपचार केल्यानंतर त्यांना मेंदूमध्ये तीव्र रक्तस्राव झाल्याचे निदान झाले. डॉक्टरांच्या टीमने त्यांना मेंदू मृत घोषित केले. त्यानंतर ट्रॉमाच्या टीमने अवयवदानासाठी कुटुंबाचे समुपदेशन केले. कुटुंबीयांनी अवयवदानास संमती दिली.
त्यामध्ये त्यांचे यकृत आणि कोर्निया दान करण्यास कुटुंबीयांनी परवानगी दिली. ही माहिती विभागीय प्रत्यारोपण समन्वय केंद्राला कळविल्यानंतर यादी तपासण्यात आली. न्यू इरा रुग्णालयात एक ६४ वर्षीय ज्येष्ठ व्यक्ती यकृताच्या प्रतिक्षेत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे त्यांच्यावर यकृताचे प्रत्यारोपण करण्यात आले.
वैद्यकीय दृष्ट्या त्यांचे दोन्ही मूत्रपिंड अवयव प्रत्यारोपणात तंदुरुस्त नसल्याने त्याचे प्रत्योरोपण होऊ शकले नाही. मेडिकलमधील भूलतज्ज्ञ डॉ. सोमा चाम, अधिष्ठाता डॉ. राज गजभिये, मेडिकलचे अधिक्षक डॉ. अविनाश गावंडे, विभागीय अवयव प्रत्यारोपण समितीचे डॉ. संजय कोलते, सचिव डॉ. राहूल सक्सेना यांनी या अवयव प्रत्यारोपणासाठी मोलाचे सहकार्य केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.