चांदूररेल्वे : पळसखेड येथील जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांना व्यवहारज्ञान मिळावे, यासाठी विशेष उपक्रम राबवण्यात आला. शाळेतील विद्यार्थ्यांनी स्वत: राखी तयार केल्या आणि नंतर त्यांनीच आपल्या राखी गावातील बाजारात विकल्या. अमरावती जिल्हाच नव्हे तर विदर्भात विद्यार्थ्यांचा अशाप्रकारचा हा पहिलाच उपक्रम असल्याचे मानले जाते.
दिवसभर विविध राखी तयार करून त्या विकण्यासाठी विद्यार्थ्यांनी थेट गावातील चौकात भरणाऱ्या बाजारात दुकान थाटलं. या चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या सुंदर अशा राखी पाहण्यासाठी आणि खरेदी करण्यासाठी ग्रामस्थांनीदेखील गर्दी केल्याचे बघायला मिळाले.राखी पौर्णिमेनिमित्त तालुक्यातील पळसखेड येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या वतीने राबवला जाणारा आगळावेगळा उपक्रम चांदूररेल्वे तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात कौतुकास्पद ठरला आहे.राखीपौर्णिमा सणाच्या निमित्ताने शाळेतील विद्यार्थ्यांना राखी तयार करण्याचा उपक्रम राबविण्याची कल्पना शाळेच्या मुख्याध्यापिका कुमुदिनी मेश्राम यांच्यासह शाळेतील शिक्षक तुळशीराम चव्हाण आणि प्रीती सपकाळ यांनी पुढे आणली. इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतच्या सर्व १४३ विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभाग घेतला.
प्रीती सपकाळ यांनी विद्यार्थ्यांना राखी नेमकी कशी तयार करायची, यासंदर्भात प्रशिक्षण दिले. ज्या विद्यार्थ्यांना उत्कृष्टरीत्या राखी बनवण्याची कला प्रशिक्षणादरम्यान गवसली त्या विद्यार्थ्यांनी प्रत्येकी २० ते २५ उत्कृष्ट दर्जाच्या सुंदर राखी तयार केल्या. एकूणच शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्यांचा सहभाग या उपक्रमात होता.
चिमुकल्यांच्या राखींना ग्रामस्थांचा प्रतिसाद
विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या राखीचे दुकान पाहून ग्रामस्थांसह बँकेचे व्यवस्थापक, डॉक्टर, शिक्षक व महिलांनी विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या राखी खरेदी करण्यासाठी स्टॉलवर गर्दी केली. दहा रुपयांपासून ते पन्नास रुपयांपर्यंत किंमत असणारी राखी चिमुकल्यांच्या या दुकानात विक्रीसाठी उपलब्ध आहे.
विद्यार्थ्यांना व्यवहारज्ञानाचे धडे
राखी बनवण्यासह त्यांची पॅकिंग करणे, त्या दुकानात सजविणे हे कामदेखील विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मार्गदर्शनात केले. तयार केलेल्या राखी चौकात दुकान लावून विक्री करण्याचा अनुभवदेखील या शाळकरी विद्यार्थ्यांनी घेतला. या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना व्यवहारज्ञान देखील अवगत होण्यास मदत झाली. चार हजार रुपयांच्या कच्च्या मालातून तयार करण्यात आलेल्या या राखींच्या विक्रीतून आठ हजार रुपये निश्चितपणे मिळतील, असा विश्वास शाळेतील शिक्षक तुळशीराम चव्हाण यांनी व्यक्त केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.