नागपूर : उपराजधानीत चौकाचौकात दिव्यांगांसह धडधाकट माणसंही भीक मागून पोट भरताना नेहमीच नजरेस पडतात. मात्र, काही दिव्यांग असेही आहेत, जे छोटीमोठी कामे करून सन्मानाने जगतात. मुरलीधर लोहार त्यापैकीच एक. दोन्ही हातापायाने अपंग व अर्धांगवायूचा त्रास असूनही मुरलीधर दिवसभर लंगडत लंगडत शहरभर फिरून फळविक्री करत आपले पोट भरतोय. सन्मानाने आयुष्य जगणारा मुरलीधर रस्त्यावर भीक मागून पोट भरणाऱ्या असंख्य आळशी लोकांसाठी नवी वाट दाखविणारे उदाहरण आहे.
हेही वाचा - जिल्हा परिषद सदस्यांना विकासाची तळमळच नाही? गावविकास आराखड्याला ५५ पैकी फक्त २५ सदस्य...
जयताळा परिसरात एका छोट्याशा झोपडीत राहणारा ४१ वर्षीय मुरलीधर लहानपणापासूनच दोन्ही पायांनी दिव्यांग आहे. त्याच्या हाताचेही हाड तुटले आहे. त्यामुळे त्याला नीट पाणी पिता येत नाही. तसेच जेवताही येत. शिवाय अर्धांगवायू आणि त्यात विशेष व्यक्ती असल्यामुळे बोलताही येत नाही. अशा परिस्थितीत तो शासनाकडून मिळालेल्या तीन चाकी सायकलवर बसून दररोज उन्हातान्हात व कडाक्याच्या थंडीमध्ये फळ विकून आपले व वडिलांचे पोट भरतो.
मुरलीधरची दिनचर्या पहाटेलाच सुरू होते. तो पहाटे पाचला उठून सायकलने थेट कॉटन मार्केट गाठतो. तिथे फळे विकत घेऊन घरी परततो. त्यानंतर जेवण केले की पुन्हा सायकलने वणवण भटकतो. दिवसभराच्या भटकंतीनंतर कशीबशी दोन-तिनशेची कमाई होते, असे अशिक्षित व अविवाहित असलेल्या मुरलीधरने सांगितले.
यादरम्यान मुरलीधरला अनेकवेळा कटू अनुभवदेखील येत असतात. बरेच ग्राहक माझ्यासारख्या दिव्यांगाकडून वस्तू विकत घेताना कचरतात, तर काहींना माझी दया येऊन ते फळे विकत न घेताच माझ्या हातात दहा-पाच रुपये ठेवून निघून जातात. पण मी त्यांची मदत स्वीकारत नाही. कारण मला कुणाचीही भीक नको आहे. स्वकष्टाने जेवढी कमाई होते, त्यातच मी समाधानी आहे. काही दिवसांपूर्वी पडल्याने मुरलीधरच्या हाताचे हाड मोडले. त्यावर उपचार न केल्याने अजूनही वेदना होतात. मोडलेल्या व सुजलेल्या हातानेच तो सायकल चालवतो. मुरलीधरची आई काही वर्षांपूर्वी मरण पावली, तर बहीण मुंबईला राहते. सुतारकाम करणारे वडील आणि मुरलीधर दोघेच मेहनत करून आयुष्याची लढाई लढत आहेत.
धडधाकट शरीर नसले तरी मेहनत करू शकतो -
'माझ्यासारखे अनेक दिव्यांग व्यक्ती रस्त्यावर भीक मागून जीवन जगताहेत. मात्र, मला तसे आयुष्य जगायचे नाही. मला धडधाकट शरीर दिले नसले तरी, मी मेहनत करू शकतो. स्वकष्टाने कमावलेली मीठभाकर नेहमीच आनंद व समाधान देते. इतरांनीही भीक न मागता सन्मानाने जीवन जगावे, असे मला वाटते.'
-मुरलीधर लोहार, दिव्यांग फळविक्रेता
संपादन - भाग्यश्री राऊत
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.