कुही (जि. नागपूर) : तालुक्यातील मांढळ येथील प्रतिष्ठित राष्ट्रीय विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे नवे प्राचार्य राजेंद्र चंद्रभान कांबळे यांनी तब्बल २४ किलोमीटरचा प्रवास पायी दररोज करून शिक्षण घेतले. मात्र, आज ते प्राचार्यपदी सेवारत आहेत. घरची गुरे चारण्याचीही जबाबदारी नाजूक परिस्थितीमुळे राजेंद्र यांच्यावर आली. मात्र, गुरे चारतानाही त्यांनी पुस्तक वाचन सोडले नाही. एमएला असताना महाविद्यालय करून वेल्डिंगचे काम केले, रात्री मातीच्या तेलाच्या दिव्यात अभ्यास केला.
राजेंद्र कांबळे यांचा जन्म १ सप्टेंबर १९६५ साली वर्धा जिल्ह्यातील कारंजा घाटगे तालुक्यातील परसोडी येथे झाला. आईवडील दोघेही मजुरी करायचे. गरिबीमुळे वडिलांना कुटुंबाचा गाडा हाकताना मोठी कसरत करावी लागायची. राजेंद्र यांना शिक्षणात गोडी होती. आई-वडिलांवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वैचारिक क्रांतीचा प्रभाव होता. त्यामुळे ‘आम्ही फाटकं कापड वापरू, पण लेकराला नेटकं घालून शाळेत पाठवू’ अशी चळवळीतील इतर कार्यकर्त्यांप्रमाणे त्यांचीही दुर्दम्य इच्छा होती.
घरी वीज नव्हती, तरी मातीच्या तेलाच्या दिव्यात अभ्यास करीत उच्च माध्यमिकचे शिक्षण पूर्ण केले. आता पुढचा प्रवास आणखीच कठीण होता. कारण पुढच्या शिक्षणासाठी शहरात जाऊन शिकायचे होते. दररोज तिकिटासाठी पैसे मिळण्याइतपत आर्थिक स्थिती नव्हती. म्हणून दररोज २८ किलोमीटरचा सायकलप्रवास करून महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले.
राजेंद्र यांच्यावर एम. बी. मोहोड सरांच्या वाक्याचा मोठा प्रभाव पडला. ते म्हणाले की, उच्च शिक्षण घेताना कोणताही विषय घे, पण बाबासाहेबांचा ‘क्लास’ म्हणजे ‘फस्ट क्लास’मध्ये पास हो. ते शब्द मनात साठवून एमए व बीएडला ‘क्लास’ मिळवला. अशा या हार्डवर्करला नागरिक शिक्षण संस्थेचे सचिव डॉ. अरुण देशमुख यांनी संधी दिली. आज राजेंद्र चंद्रभान कांबळे यांनी मांढळ येथील प्रतिष्ठित राष्ट्रीय विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून पदभार स्वीकारला.
पद, पैसा, प्रतिष्ठा यापेक्षा माणुसकी प्रत्येकाने जपावी, असे मत नेहमी राजेंद्र कांबळे सर भाषणात सामाजिक व्यासपीठावरून मांडतात. राजेंद्र कांबळे यांना सुरुवातीपासूनच ‘सोशल टच’ आहे. ते तालुक्यातील सामाजिक, सांस्कृतिक व साहित्यिक क्षेत्रात सक्रिय आहेत. उच्च शिक्षित असूनही साधी राहणी, मितभाषी स्वभाव, सदैव समाजकार्यात व्यस्त राहण्याची सवय कधी बदललीच नाही. मात्र ‘माझी शाळा, माझे विद्यार्थी’ व ज्या संस्थेने माझ्यासारख्या अनेकांना विद्यादानाची संधी दिली, ते नागरिक शिक्षण मंडळ हे सदोदित प्रगतिपथावर राहावे, त्यासाठी मी सदैव प्रयत्नशील राहील अशी इच्छा कांबळे सरांनी व्यक्त केली.
मांढळ येथील राष्ट्रीय विद्यालय हे सर्वांसाठी सुपरिचित नाव आहे. तेथे मुख्याध्यापकाची जबाबदारी संस्थेने माझ्यावर सोपविली. त्या संधीच सोन करून संस्थेचे सचिव डॉ. अरुण देशमुख यांच्या मार्गदर्शन व शिक्षकांच्या सहकार्याने शाळेला नंबर एकवर कसे आणता येईल, असाच प्रयत्न करील. माझ्या शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव प्रयत्नशील राहील.- राजेंद्र चंद्रभान कांबळे, प्राचार्य राष्ट्रीय विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, मांढळ, ता. कुही
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.