नागपूर - रामटेक लोकसभेतील पराभव भाजपच्या चांगलाच जिव्हारी लागला असल्याने याचे खापर एखाद्या आमदारावर फोडून त्याचे विधानसभेचे तिकीट कापले जाणार असल्याची चर्चा ग्रामीण भागात आहे.
रामटेकमध्ये मागील लोकसभेच्या एकदम उलट निकाला यावेळी लागला. गेल्या लोकसभा निवडणुकीत सर्व सहा विधानसभा मतदारसंघामध्ये शिवसेनेच्या कृपाल तुमानेंना आघाडी होती. यावेळी काँग्रेसच्या श्याम बर्वें यांनी आघाडी घेतली आहे. भाजपचे दोन आणि शिंदेसेनेचा एका आमदार जिल्ह्यात आहे. यापैकी एकाही आमदाराला पारवे यांना वाचविता आले नाही. रामटेकच्या विजयात माजी मंत्री सुनील केदार यांचा सिंहाचा वाटा आहे.
त्यांनी जवळपास एकहातीच किल्ला लढवला. त्यामुळे या रामटेक लोकसभा निकालाचा परिणाम ग्रामीण राजकारणावर होणार असल्याचे बोलल्या जात आहे. या निकालामुळे केदार यांची पकड ग्रामीण भागात अधिकच घट्ट झाली असून त्याचे पडसाद विधानसभेच्या निवडणुकीत दिसणार आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि विद्यमान आमदार टेकचंद सावरकर यांच्या कामठीमधूनही महायुती पिछाडीवर आहे. गेल्या वेळी कामठी मतदार संघात सावरकर थोड्या मतांनी विजयी झाले होते. असे असताना लोकसभेत या मतदार संघातून काँग्रेसला १६ हजारांच्या वर मताधिक्य आहे. उमरेडमधून राजू पारवे काँग्रेसमधून विजयी झाले होते. यंदाची लोकसभा त्यांनी शिवसेनेच्या तिकिटवरून लढविली.
त्यामुळे उमरेडमधून कुणाला संधी मिळेल, याची जोरदार चर्चा आहे. भाजपकडून सुधीर पारवेंना संधी मिळणार असल्याची चर्चा आहे. आशिष जयस्वाल शिंदे गटातून रिंगणात उतरतील की दुसऱ्या पक्षाची साथ घेतील, यावरूनही चर्चा होत आहे.
भाजप शिंदेसेनेसाठी धोक्याची घंटा
जिल्हा मध्यवर्ती बॅंक गैरव्यवहार प्रकरणात सुनील केदार यांना शिक्षा झाल्याने त्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. त्यांनी शिक्षेला स्थगिती द्यावी याकरिता उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. ती न मिळाल्यास सावनेरमध्ये त्यांना वारसदार शोधावा लागेल.
काटोलमधून राष्ट्रवादीचे आमदार अनिल देशमुख यांनाच पुन्हा संधी मिळेल असे दिसते. त्यांचे चिरंजीव सलील देशमुख हेसुद्धा उत्सुक आहेत. हिंगणा सर्वाधिक माघारला असला तरी आमदार समीर मेघे यांनाच भाजप संधी देईल असे दिसते.
रामटेकचा निकाल भाजप व शिंदेसेनेसाठी धोक्याची घंटा असल्याचे एकूण चित्र आहे. सर्वेक्षण व लोकसभेतील परफॉर्मन्सचा आधार घेत भाजपकडून काहींचा पत्ता कापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.