नागपूर : शहरातील मोकाट श्वानांच्या संख्येवर आळा घालण्यासाठी महापालिकेने नसबंदी शस्त्रक्रिया करण्यास प्रारंभ केला. नसबंदीनंतरही श्वानांचा रस्त्यांवर उपद्रव कमी झाला नाही. रस्त्यांवरील श्वानांचे कळप दुचाकी किंवा इतर वाहनांपुढे येत असल्याने नागपूरकरांवर अपघाताची टांगती तलवार आहे. अचानक श्वान पुढे आल्यामुळे दुचाकीचा ब्रेक लावल्याने मागून वेगाने येणाऱ्या वाहनाची धडक बसण्याच्या घटना दररोज दिसून येत आहेत. यात दुचाकीधारक किरकोळ जखमी होत असला, तरी एखाद्या वेळी अपघातात जीव गेल्यास जबाबदारी कुणाची? मृत कुटुंबप्रमुख असेल तर त्याच्या कुटुंबाचे काय? असे प्रश्न निर्माण झाले आहेत.
पृथ्वीतलावरील प्रत्येक जिवंत घटकाला जगण्याचा अधिकार आहे. श्वानांनाही जगण्याचा अधिकार असून, पशुप्रेमी संघटना त्यासाठी कौतुकास्पद कामगिरी करीत आहेत. त्यामुळेच श्वानांवरील अत्याचाराला आळा बसला. मात्र, शहरात आता मोकाट श्वानांचा हैदोस वाढला आहे. परिणामी महापालिकेने मोकाट श्वानांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी नसबंदीचा निर्णय घेतला. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनुसार, शहरात 80 हजारांवर मोकाट श्वान होते. महापालिकेने नसबंदीसाठी एक एजन्सी नियुक्त केली असून, आतापर्यंत पाच हजार श्वानांवर शस्त्रक्रिया करण्यात आली असल्याचे सूत्राने नमूद केले. सध्या दिवसाला दोनशे श्वानांवर शस्त्रक्रियेचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. श्वानांचा उपद्रव कमी करण्यासाठी आणखी एक एजन्सी नियुक्त करून दिवसाला चारशे श्वानांच्या शस्त्रक्रियेवर भर दिला जाणार आहे. पुढील आठवड्यात यासाठी विविध एजन्सींकडून "एक्स्प्रेशन ऑफ इंटरेस्ट' मागविण्यात आले आहे. श्वानांवरील शस्त्रक्रियेचे सर्व स्तरांतून स्वागत होत आहे. मात्र, त्याच वेळी नसबंदी केलेले मोकाट श्वान जिथे पकडण्यात आले, तिथेच सोडण्यात येत आहेत किंवा सोडण्यात येणार आहेत. सद्य:स्थितीत शहरात प्रत्येक रस्त्याच्या कडेला श्वानांचे कळप दिसून येत आहेत.
काही श्वान फुटपाथवर तर काही दुभाजकांवर दिसून येत आहेत. हे श्वान रस्त्यांवरील एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणावर धाव घेतानाही दिसून येत आहेत. त्यामुळे अनेकदा श्वान दुचाकी, चारचाकीला आडवे येत असून, जोरात ब्रेक लावल्यामुळे वाहने एकमेकांवर आदळत आहेत. अलीकडेच वंजारीनगर जलकुंभ ते तुकडोजी पुतळा चौकाजवळ श्वान आडवे आल्याने जोरात ब्रेक लावल्याने दुचाकीधारकाला मागील चारचाकी वाहनाची धडक बसली. संपूर्ण शहरातील रस्त्यांवर असे दृश्य व घटना होत आहेत. अशाच एखाद्या घटनेत एखाद्याला जीव गमवावा लागला तर नेमकी जबाबदारी कुणाची, असा प्रश्न आता शहरात चर्चेला आला आहे. जीव गमावणारा कुटुंबप्रमुख असला तर त्यांचे कुटुंब उघड्यावर येणार नाही काय? त्या कुटुंबाच्या होणाऱ्या हानीची भरपाई कोण करणार, असाही प्रश्न यानिमित्त काही नागरिकांनी उपस्थित केला आहे. श्वानांना जगवा; परंतु नागरिकांच्या सुरक्षिततेचे काय? याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
कुत्र्यांचा चावा सुरूच
महापालिकेच्या आकडेवारीनुसार, वर्ष 2011 ते सप्टेंबर 2017 या सात वर्षांत शहरात 68 हजार 218 लोकांना कुत्रा चावल्याच्या घटना उघडकीस आल्या. यातील 2011 ते 2015 या पाच वर्षांत 84 नागरिकांना आपला जीव गमवावा लागला. मागील वर्षी एप्रिल ते सप्टेंबर या पाच महिन्यांत 4 हजार 629 जणांना कुत्र्यांनी चावल्याच्या घटनांची नोंद आहे. या वर्षातील माहिती अद्याप नसली, तरी दिवसाला सरासरी कुत्र्यांच्या चावण्याच्या तीस घटनांची नोंद दिसून येत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.