नागपूर : शिंदे सेना आणि भाजपने युती जाहीर केल्याने शिवसैनिकांना मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसलाही शिवसेना सोबत नको असल्याने नागपूर महानगर पालिकेच्या आखाड्यात उद्धव सेना यांची अवस्था ‘एकटा टायगर’ अशीच होणार असल्याचे दिसून येते. राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असताना भाजपला पराभूत करण्यासाठी महापालिकेसह सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्रित लढाव्या असे प्रयत्न सुरू होते. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनीसुद्धा यास संमती दिली होती. शिवसेनेलाही मुंबईत काँग्रेस आणि राष्ट्रवादीची गरज आहे. त्यामुळे तडजोड करण्याची तयारीसुद्धा तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वीकारली होती. मात्र नागपूरमध्ये काँग्रेसला महाविकास आघाडी मान्य नव्हती. शिवसेना दोन आणि राष्ट्रवादी एक नगरसेवकाची पार्टी असल्याने त्यांच्यासाठी पन्नास जागा सोडण्यास काँग्रेसच्या नेत्यांचा नकार होता आणि आजही आहे.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा राष्ट्रवादीसोबतही आघाडी करण्यास विरोध आहे. शिवसेनेचे नागपूरचे संपर्क दुष्यंत चतुर्वेदी यांच्या नेतृत्वावर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना विश्वास नाही. त्यामुळे शिवसेनेसोबत स्थानिक पातळीवर कोणी बोलणीही करीत नव्हता. शिवसेनेसोबत आघाडी केल्यास फायद्यापेक्षा त्यांच्यात असलेल्या गटबाजीचा फटकाच अधिक बसण्याची शक्यता वर्तविली जात आहे. संपर्क प्रमुख आणि शहर प्रमुख प्रमोद मानमोडे आणि किशोर कुमेरिया या तिघांचेही आपसात पटत नाही. दुसरीकडे प्रवीण बरडे यांच्याकडून पूर्व नागपूरचा मतदारसंघ काढून घेतल्याने शहर प्रमुखांमध्येही वाद निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत शिवसेनेसोबत आघाडी करणे म्हणजे आपल्याच पायावर धोंडा मारून घेण्यासारखे होईल असे काँग्रेस नेत्यांचे म्हणणे आहे.
राष्ट्रवादी चालेल पण शिवसेना नकोच
एकदाची राष्ट्रवादीसोबत आघाडी होईल पण शिवसेनेला सोबत घ्यायचे नाही, असे जवळपास काँग्रेस नेत्यांचे ठरले आहे. त्यामुळे महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेला एकट्यानेच लढावे लागणार असल्याचे दिसून येते. दुसरीकडे अद्याप शिवसेना नेमकी कोणाची हे ठरलेले नाही. दोन्ही गट ‘आमचीच सेना ओरीजनल’ असा दावा करीत आहेत. अनेक पदाधिकारी त्यामुळे वेटींगवर आहे. कुठल्या शिवसेनेसोबत राहायचे, असा प्रश्न त्यांना पडला आहे. अशा गोंधळाच्या परिस्थितीत महापालिकेची निवडणूक जाहीर झाल्यास उद्धव ठाकरे यांच्या सेनेला मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.