नागपूर : कोरोनामुळे शहरातील उन्हाळी क्रीडा शिबिरे बंद असून, क्लबमध्ये सर्वत्र शुकशुकाट पसरला आहे. खेळाडूंचा सराव व स्पर्धा थांबल्यामुळे क्रीडा साहित्यांची विक्री करणाऱ्या दुकानदारांनाही जबर आर्थिक फटका बसतो आहे. लॉकडाउन आणखी वाढण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे ऐन सीझनमध्ये लाखोंची कमाई डुबण्याची भीती असल्याने दुकानदार चिंतीत आहेत.
शालेय परीक्षा संपल्या की शहरात उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबिरांना सुरवात होते. क्रिकेट, स्केटिंग, जलतरण, बुद्धिबळासह असंख्य खेळांचे जागोजागी पीक येते. खेळाडूंच्या सरावामुळे क्रीडा साहित्य विकणाऱ्यांचीही चांगली चांदी असते. मात्र लॉकडाउन लागल्यापासून दुकानेच कुलूपबंद आहेत. क्रीडा साहित्यांची विक्री पूर्णपणे बंद असल्यामुळे दुकानदारांचे आर्थिक नुकसान होत आहे. पहिल्या लॉकडाउनमुळे गतवर्षी दुकानदारांना मोठा फटका बसला.
यावर्षीदेखील तीच अवस्था आहे. उपराजधानीत सीताबर्डी, महाल, इतवारी, धरमपेठ, गोकुळपेठ, सदर, जरीपटका, बजाजनगर, मेडीकल चौक, धरमपेठ, सीए रोडसह ठिकठिकाणी क्रीडा साहित्य विकणाऱ्यांची जवळपास शंभरावर छोटी- मोठी दुकाने आहेत. याशिवाय क्लब, अकादमीचे प्रशिक्षक व रस्त्यांवरही मोठ्या प्रमाणावर क्रीडा साहित्यांची विक्री होते. उन्हाळ्याच्या दिवसांत दरवर्षी लाखो रुपयांची उलाढाल होते. या दोन महिन्यांच्या कमाईवरच त्यांचे वर्षभराचे अर्थचक्र अवलंबून असते. दुकानांचे शटर डाऊन असल्यामुळे त्यांची चिंता वाढली आहे.
दुकानदार व्यवसाय बंद करण्याच्या तयारीत
गेल्या ५१ वर्षांपासून सीताबर्डी परिसरात क्रीडा साहित्य विकणारे सिध्रा स्पोर्ट्सचे मालक टी. एन. सिध्रा म्हणाले, गेल्या वर्षी पहिल्यांदा लॉकडाउन लागल्यापासून मधल्या काही दिवसांचा अपवाद वगळता वर्षभरापासून दुकान बंद आहे. आता पुन्हा लॉकडाउन लागल्याने हा उन्हाळाही कमाईविनाच जाईल, अशी चिन्हे दिसत आहे. गतवर्षी खरेदी केलेले लाखोंचे क्रीडा साहित्य पडून आहे. वर्तमान संकट लक्षात घेता एखाद्या दुकानदाराला क्रीडा साहित्य स्वस्तात विकून दुकान कायमचे बंद करण्याचा सध्या माझा विचार आहे. महाल येथील फ्रेंड्स स्पोर्ट्सचे संचालक राजेंद्र गोरे यांनीही चिंता व्यक्त करून दुकानदारांवर उपासमारीची वेळ येण्याची शक्यता बोलून दाखविली.
संपादन - अथर्व महांकाळ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.