नागपूर : मागणी नसतानाही विश्वासात न घेता आर्थिक पिळवणूक करणारे स्मार्ट मीटर सरकारकडून जनतेवर लादले जात आहे. या योजनेचा निषेध करून जय विदर्भ पार्टीने ऊर्जामंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिमेला काळे फासले. ही योजना रद्द करण्याची मागणी करून जोरदार नारेबाजी करण्यात आली.
जय विदर्भ पार्टीच्या वतीने स्मार्ट प्रीपेड मीटरला विरोध म्हणून जुना काटोल नाका चौकात महावितरणच्या विद्युत भवन कार्यालयासमोर मंगळवारी तीव्र आंदोलन करण्यात आले. यावेळी कार्यकर्ते आक्रमक झाले होते. फडणवीस यांच्या प्रतिमेचे बॅनर हातात घेऊन कार्यकर्त्यांनी त्यावर शाही फेकली. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आंदोलनस्थळाजवळून जात असताना एका आंदोलकाने त्यांच्या गाडीवर बुट भिरकावला.
त्यांच्या गाडीवर धाव घेऊन त्यांना आंदोलनस्थळी येण्यास भाग पाडले. बावनकुळे यांनी आंदोलकांना संबोधित करून ऊर्जामंत्र्यांनी भाजपच्या बैठकीत ही योजना तात्पुरती स्थगित करण्यात आल्याचे जाहीर केले आहे. तसेच पुढेही ही योजना लागू होणार नसल्याचे बावनकुळे यांनी आंदोलकांना सांगितले. आंदोलन चिघळत असल्याचे पाहून पोलिसांनी काही आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेऊन सदर पोलिस ठाण्यात आणले. सध्याचे डिजिटल मीटर ठिक आहे. त्याला बदलवू नये.
स्मार्ट मीटर नकोच ही जनतेची मागणी आहे. गुजरात, उत्तर प्रदेश, पुणे (मगरपट्टा), मुंबई (भांडूप, खारघर) येथे स्मार्ट मीटरचा प्रयोग अयशस्वी झाला. जनतेचा रोष लक्षात घेऊन ही योजना अधिकृतपणे रद्द करावी, अन्यथा पुढे तीव्र आंदोलन करू असा इशारा पक्षाचे उपाध्यक्ष मुकेश मासुरकर यांनी दिला. पक्षाच्या वतीने मुख्य अभियंता दिलीप दोडके यांना मागणीचे निवेदन देण्यात आले. यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष अरुण केदार, सहसचिव गुलाबराव धांडे, श्रीकांत दौलतकर, नरेश निमजे राजेंद्र सतई आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.