नागपूर: नागपुरातील महत्वाकांक्षी प्रकल्प आणि नागपूरकरांची 'माझी मेट्रो' नागपूरकरांच्या सेवेत काही दिवसांपूर्वी रुजू झाली. नागपूर कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु झाल्यापासून मेट्रो बंद झाली आहे. पण मेट्रोचे कार्यलय मात्र सुरूच आहे. नागपूर मेट्रोच्या कार्यालयात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
आनंदनगरात मेट्रो हाऊस नावाने माझी मेट्रोचे मुख्य कार्यालय आहे. मेट्रोच्या अत्याधुनिक यंत्रणेची हाताळणी, कॉल आणि इंटरनेटच्या वापरासाठी बीएसएनएलची लीज लाईन घेण्यात आली आहे. अज्ञात आरोपीने कार्यालयातील यंत्रणेशी छेडखानी करीत ईपीडीएक्स इलेक्ट्रॉनिक्स माध्यमाने टेलीफोन यंत्रनावर ताबा मिळविला. या षडयंत्रानंतर इंटरनॅशनल कॉलसाठी त्याचा उपयोग करण्यात आला.
९.८४ लाखांचा फटका
याप्रकाराने माझी मेट्रोला ९.८४ लाखांचा फटका बसला आहे. मार्च महिन्यात टेलिफोनचे भरमसाठ बिल आल्यानंतर या प्रकाराचे बिंग फुटले. १ ते ३१ मार्च या महिनाभरासाठी मेट्रोला तब्बल ९ लाख ८४ हजार ५१० रुपयांचे टेलिफोन बिल पाठविण्यात आले. प्रारंभी चुकीचे बिल पाठविण्यात आल्याचा साऱ्यांचाच समज झाला. तांत्रिक बाबी तपासल्यानंतर बिल बरोबरच असल्याचे स्पष्ट झाले. टेलिफोन किंवा इंटरनेटचा वापर येवढा वापर करणे अशक्य असल्याने मेट्रो व बीएसएनएलकडून अंतर्गत तपास केला असता हॅकिंगचे बिंग फुटले. टेलिकॉम कार्यालयाचे अतिरिक्त मुख्य प्रकल्प व्यवस्थापक आशिष कुमार त्रिभुवन संधी यांनी सदर ठाणे गाठून तक्रार दिली. त्या आधारे पोलिसांनी फसवणुकीसह माहीती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करीत आरोपीचा शोध सुरू केला आहे.
मेट्रोची फोन लाईन हॅक करून विदेशात शेकडो फोन केल्यामुळे आता या आरोपीचे काही दहशतवादी संबंध होते का याबद्दल पोलिस तपासणी करत आहेत. तसेच या आरोपीने कोणत्या देशांमध्ये फोन केले होते याबद्दलची माहिती पोलिस घेत आहेत.
संपादन - अथर्व महांकाळ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.