नागपूर : कडाक्याच्या थंडी असो की, जीवघेणा उकाडा, नाहीतर फाटलेल्या आभाळातील बरसात...उदरनिर्वाहासाठी तलावात जाळे टाकणारा विष्णू. मासे पकडण्यासाठी कडाक्याच्या थंडीत पहाटे ६ वाजता तलावात जाळे टाकतो. हेलकावे खाणाऱ्या डोंग्यातून पाण्यात गस्त घालतो. २४ तासांतील दहा तास पाण्यात राहणारा हा जलाशयाचा राजा, मात्र खिशात दमडी नाही. कफल्लक आयुष्य घेऊन जगणाऱ्या विष्णूने डोंग्यातच संसार थाटला आहे. मीठ भाकरीपासून तर कांदा मिरची डोंग्यातच असते. मासेमारीसाठी रोजंदारीवर आलेल्या विष्णू पचारेचा तीन महिन्यापासून तलावाशेजारी उघड्यावर रात्र काढतो.
पारशिवनी तालुक्यातील कान्हा देवीचा परिसर. विष्णू पचारे, राजू पचारे, महेश नागपुरे मागील तीन महिन्यांपासून कान्हा तलावात रोजंदारीवर मासेमारी करतात. विष्णू मुळचा पंचाळ्यातील. पत्नी, मुलगा मुलगी असा भरलेला संसार. आता हाताला काम नाही, पूर्वी कोणीही कोठेही मासेमारी करीत होते, यामुळे मासे मिळाले की, थेट मासे विकून बाजारात नेत असल्याचे विष्णू सांगत होता. आता मात्र तलावच विकली. तलावाचा ठेका घेण्याची ऐपतच नाही. यामुळे पोटासाठी रोजंदारीवर होडीतून मासे पकडून द्यायचे. दिवसाला ३०० रुपये मिळतात. यातील अर्धे पैसे तर दारूत जातात. उरलेले पैसे उराशी बाळगून महिन्यातून एक खेप घरी टाकली की, पत्नीच्या हाती देत असल्याचे विष्णू म्हणाला. घरापासून दूर रोजंदारीवर मासेमारी करण्यासाठी आलेल्या विष्णूच्या अंगात ना उबदार कपडे ना...रात्री अंगावर घेण्यासाठी उबदार ब्लॅंकेट...उघड्यावर अंगावर पोत पांघरून येथेच आडोशाला मासे विकण्याच्या पारावर झोपत असल्याची माहिती राजूने दिली. रोजंदारीवर मासेमारी करणाऱ्या मजुरांच्या जगण्याचा लाइव्ह शो कान्हादेवीच नाहीतर कुवारा भीवसेनसह जिल्ह्यातील सर्वच तलावांवर दिसतो. तलावाच्या शेजारी डोंग्याजवळ तीन विटांची चूल मांडून सारे जगतात.
खाण्याचे साहित्य डोंग्यात
दिवसभर रोजंदारीवर मासेमारी करून ते जीवन जगतात. सूर्य मावळायच्या वेळी लाकडाच्या होडीवर स्वार होऊन तलावात जाळे टाकणारा विष्णूचा संसार होडीत थाटला आहे. होडीत कांदे, मिरची, पिशवीत पीठ आहे. उगवतीच्या वेळेला पुन्हा जाऊन मासे घेऊन आल्यानंतर कांद्या मीरच्याचा ठेचा बनवून पिठा;या भाजलेल्या पानग्यासोबत खातात. पाण्यात जाऊन जीवाचा धोका पत्करून विष्णूसह त्याच्या साथीदाराला मिळते काय तर दिवसाला फक्त ३०० रुपये. पण, पोटापाण्यासाठी त्यांनी हे काम आनंदाने स्वीकारून कुटुंबाचा गाढा ओढत आहेत, त्यांना ना मरणाची भीती, ना जगण्याची चिंता.
"डोंग्यातून तलावात जाताना कधी उलटेल न कधी जीव जाईल सांगता येत नाही, पर बायको लेकरांचं पोट भरणार कसं. हिवाळ्यात मासे पाण्याच्या तळाशी जातात, तेथे त्यांना ऊब मिळते, यामुळे मासे मिळत नाही. अशावेळी रोजंदारीच धोक्यात येते."
-विष्णू पचारे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.