नागपूर : लहानपणी हट्ट पुरवणारे बाबा... अभ्यासासाठी ओरडणारे बाबा... चांगलं वागण्यासाठी कानउघाडणी करणारे बाबा... आजवर सारं काही देऊन कसलीच अपेक्षा न ठेवता, जेव्हा खुर्चीवर शांत बसतात तेव्हा वाटतं जणू आभाळचं खाली झुकलं... आज माझं मलाच कळून चुकलं... (The-value-of-the-mother-is-known-while-living,-while-the-value-of-the-father-is-known-after-his-death)
बाबा आज निवृत्त होणार... कधी ना कधी ते कामाला विराम देणारच... मग बाबा शासकीय नोकरी करणारे असो किंवा खासगी... इच्छा नसतानाही त्यांच्या जीवनात ही वेळ येतेच. असाच दिवस माझ्याही जीवनात उजाडला... नेहमीप्रमाणे जेवण आटोपल्यावर बाबा म्हणाले, ‘मी आता निवृत्त होतोय. मला नवीन कपडे नको, वाढाल ते जेवीन, जसा ठेवाल तसा राहीन.’ हे उद्गार ऐकताच सुरीनं बोट कापलं जावं आणि टचकन डोळ्यांत पाणी यावं, अगदी तसं बाटलं.
बाबा असे का बोलले असावे? आता ते कुटुंबीयांवर (मुलांवर) ओझं होणार, असे त्यांना का वाटले असावे? आजवर संसाराचा गाडा हाकताना कुणालाही त्यांची किंमत कळली नाही. कुणीही त्यांची साधी विचारपूस केली नाही. हे तर त्यांचं कामच आहे. अस समजून सतत दुर्लक्ष केले. मात्र, आज कळलं आजवर जे जपलं ते सारंच फसले. का बाबाला वाटले की तो ओझं होतील? त्रास होईल जर ते गेले नाही कामावर? त्यांची घरातील किंमत शून्य होईल.
आज का त्यांनी दम दिला नाही?, काय हवं ते करा माझी तब्येत बरी नाही, मला कामावर जायला जमणार नाही. खरंतर हा अधिकार आहे त्यांचा. मग त्यांनी आज असं का म्हटलं असावं? आजवर कुटुंबाचा सांभाळ करणाऱ्या बाबांचे हे वाक्य जिव्हारी लागलं. याला मीच तर जबाबदार नाही ना? असंही वाटू लागलं. या विचाराने मनात वादळ निर्माण झाले. नंतर माझं उत्तर मला मिळालं.
जसा जसा मी मोठा होत गेलो, बाबाच्या कवेत मावेनासा झालो. माझं नुसतं शरीर वाढत नव्हतं तर त्यासोबत वाढत होता तो ‘अहंकार’ आणि त्याने वाढत होता विसंवाद... त्यावेळी आई जवळची वाटायची. त्याचवेळी मी बाबांपासून दुरावत होतो. याचा अर्थ हा नाही की बाबांच्याप्रती माझ्या मनात द्वेष होता. आईसारखंच त्यांच्याप्रतीही मनात भरभरून प्रेम होतं; पण ते शब्दात कधी व्यक्त करताच आलं नाही.
मला लहानाचा मोठे करणारे बाबा, आता स्वतःला लहान समजत आहेत, ही भावना अत्यंत वेदनादायक आहे. ओरडणारे-शिकवणारे बाबा आता काही बोलण्यासाठी मात्र फारसे धजावत नव्हते. त्यांचे मन कष्ट करायला तयार आहे मात्र शरीर साथ देत नाही. ही नेमकी गोष्ट मी ओळखली. खरंतर नोकरीवर लागल्यापासून सांगायचं होत त्यांना ‘बसं झालं आता जरा आराम करा’. परंतु, सूर्याला मावळायला सांगण्याचा अधिकार आपल्याला आहे का? हा प्रश्न उद्भवतो.
हळूहळू मोठा होत असताना बाबांसोबतचा दुरावा वाढत गेला. त्यांचं बोलणे मला टोचू लागलं होते. मी का लहान आहे? बाबा मला सारखे-सारखे का बोलतात? असं मला वाटू लागले. त्यांचे उपदेश, मार्गदर्शन, सल्ला, काळजी, भविष्याची चिंता मला निरर्थक वाटायची. कारण, मी मोठा झालो होतो. मला चांगले-वाईट काय? याची पूर्णपणे जाणीव झाली होती (माझा समज). यामुळेच आम्हा दोघांमध्ये हळूहळू दुरावा वाढत गेला.
याकाळात बाबांपेक्षा मित्र अधिक जवळचे वाटू लागले होते. त्यांचे सल्ले पटू लागले. मित्रांचा सहवास महत्त्वाचा वाटत होता. त्यांची सोबत, बाहेर फिरणे, गप्पा-गोष्टी करणे व सिक्रेट शेअर करणे माझ्यासाठी महत्त्वाचे झाले होते. रात्री उशिरापर्यंत बाहेर राहणे, काळजीपोटी बाबांचा फोन आला तर त्यांच्यावर चिडणे, हे नित्याचे झाले होते. त्यांची काळजी व सल्ले त्रासदायक वाटू लागले होते. यामुळेच आमच्यातील दुरावा वाढत गेला. बाबांच्या त्या एका वाक्याने माझं जगच बदलून टाकले.
आज मात्र माझं मलाच कळून चुकलं... काहीतरी चुकीचं होतयं. यानिमित्त सांगायचं इतकच की, आई-वडिलांनी वेळोवेळी दिलेले उपदेश, त्यांचे मार्गदर्शन आपल्या चांगल्यासाठीच असतात. त्यामुळे त्यांचा सन्मान करणे आपली जबाबदारी आहे. आज बाबा या जगात नाही. त्यांची जागा कुणीही घेऊ शकणार नाही. कितीही प्रयत्न केले तरी मी त्यांच्या इतका मोठा होऊ शकणार नाही. ‘आईची किंमत जिवंतपणीच कळते, बाबांची किंमत त्यांच्या मृत्यूनंतर कळते’ अशीच काही अनुभूती त्यांच्या मृत्यूनंतर येत आहे.
(The-value-of-the-mother-is-known-while-living,-while-the-value-of-the-father-is-known-after-his-death)
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.