नागपूर ः शहरात वेगवेगळ्या कंपन्यांचे हजारावर मोबाईल टॉवर उभे आहेत. परंतु हे मोबाईल टॉवर अनधिकृत असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. विशेष म्हणजे महापालिकेनेच ही माहिती दिल्याने शहरात कुणाच्या आशीर्वादाने मोबाईल टॉवर उभे आहेत?, या अनधिकृत मोबाईल टॉवरवर पालिका कारवाई का करत नाही?, असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
मोबाईल आता प्रत्येकाचीच गरज झाली आहे. मोबाईलला रेंज मिळावी, यासाठी शहराच्या प्रत्येक चौकात तसेच घरांवर मोबाईल टॉवर दिसून येत आहेत. वेगवेगळ्या कंपन्यांचे हजारावर मोबाईल टॉवर आहेत. विशेष म्हणजे पालिकेने काही कंपन्यांना चौकात मोबाईल टॉवर उभे करण्यासाठी परवानगीच नव्हे तर जागाही दिली आहे. यातून मनपाला उत्पन्नही मिळत आहे. याशिवाय अनेक बहुमजली इमारतीवरही मोबाईल टॉवर उभे आहेत. परंतु नागपूर महापालिकेने अद्याप कोणतेही मोबाईल टॉवर अधिकृत केले नाही, अशी माहिती धक्कादायक माहिती पुढे आली आहे.
जुना भंडारा मार्गावरील शास्त्रीनगर येथील रहिवासी राजेश बोठारे यांनी माहिती अधिकारात महापालिकेअंतर्गत अधिकृत मोबाईल टॉवरची संपूर्ण यादी पालिकेच्या नगर रचना विभागाला मागितली होती. यातूनच शहरातील मोबाईल टॉवर अधिकृत नसल्याचे पुढे आहे. पालिका नगर रचना विभागातील माहिती अधिकारी व उपअभियंता श्रीकांत देशपांडे यांनी बोठारे यांना मोबाईल टॉवर अद्याप अधिकृत केले नसल्याची माहिती दिली.
देशपांडे यांनी दिलेल्या माहितीमुळे शहरात हजारांवर उभे असलेले मोबाईल टॉवर कुणाच्या आशीर्वादाने सुरू आहे? असा प्रश्न निर्माण झाला आहे. शहरात उभे असलेल्या या अनधिकृत मोबाईल टॉवरवर पालिका का कारवाई करीत नाही? नगर रचना विभागाच्या उपअभियंत्याने दिलेली माहिती खोटी आहे? असाही प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
नगर रचना विभाग संभ्रमात?
शहरात चौक, उद्याने तसेच मोकळ्या जागेवर मोबाईल टॉवर उभे करण्यात आले आहेत. विशेष काही कंपन्यांच्या मोबाईल टॉवरला पालिकेने परवानगी दिली असून यातून उत्पन्न मिळत आहे. विशेष म्हणजे काही कंपन्यांसोबत पालिकेनेच करार केला असल्याचे सूत्राने नमूद केले. त्यामुळे नगर रचना विभागाने सर्व टॉवर अद्याप अधिकृत केले नाही, अशी माहिती का दिली? नगर रचना विभाग मोबाईल टॉवरच्या परवानगीबाबत अंधारात तर नाही? की मोबाईल टॉवरच्या परवानगीची माहिती नागरिकांपासून लपवून ठेवण्याचा तर डाव नाही? असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. मोबाईल टॉवरमधून निघणारे रेडिएशन तीव्र असते, त्यामुळे कॅन्सर, ट्यूमरसारखे असाध्य रोग होण्याची शक्यता संशोधकांनी व्यक्त केली आहे. याशिवाय पक्षी, पर्यावरणालाही धोका असल्याचे तज्ज्ञ वारंवार स्पष्ट करीत आहेत.
संपादन - अथर्व महांकाळ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.