कोंढाळी (जि. नागपूर) : काटोल-नरखेड तालुक्यात आंबिया बहाराच्या संत्र्याचे जबरदस्त पीक आले आहे. आंबियाच्या संत्र्यांना आज बाजारात तीन रुपये ते १० रुपये प्रति किलो भाव मिळत आहे. या मातीमोल भावात तोडाई व वाहतुकीचा खर्चही निघत नसल्याने अनेक संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी संत्री तोडून रोडच्या बाजूला फेकून दिली आहेत.
विदर्भातील ‘कॅलिफोर्निया’ म्हणून प्रसिद्ध काटोल-नरखेड तालुक्यातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना निसर्गाचा लहरीपणा व शासनाच्या उपेक्षेने मोठा फटका बसला आहे. काटोल तालुक्यात २० ऑक्टोबरपर्यत ७९९ मी.मी पाऊस पडला.
यंदा सतत पावसाने संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. काटोल, कोंढाळी, नरखेड भागात यंदा आंबीया बहारच्या संत्र्यांचे बंपर पीक आहे. सतत पावसाने संत्रा पिकावरील फायटोथोरा व विविध बुरशीजन्य आजारांनी संत्री काळी पडली व संत्र्यांची योग्य वाढही झाली नाही.
आज बाजारात आंबियाच्या पिकाला तीन ते दहा रुपये प्रती किलो भाव आहे, तर एक मिनी ट्रक संत्रा तोडाईचा खर्च तीन हजार रुपये येतो. कोंढाळी ते नागपूर एक मिनीट्रक संत्रा वाहतुकीचा खर्च तीन हजार असा एकूण ६ हजार रुपये खर्च करूनही एक मिनी ट्रक संत्र्याचे सहा हजार रुपये ही होत नसल्याने संत्रा तोडून फेकण्याची वेळ संत्रा उत्पादक शेतकऱ्यांवर आली आहे. संत्रा फळाची मोठी फळगळती होत असल्याने संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे.
काटोल तालुक्यात अती पाऊस व विविध रोगाने सोयाबीन, कापूस, संत्रा आदी पिकांचे मोठे नुकसान झाले. काटोलचे तहसीलदार अजय चरडे यांनी दिलेल्या माहितीनुसार जुलै २०२० मध्ये ९१.१० हेक्टर भागात ११८ शेतकऱ्यांच्या कापूस व सोयाबीन पिकांचे नुकसान झाले. ऑॅगस्ट महिन्यात सतत पावसाने काटोल तालुक्यात संत्रा, मोसंबी, सोयाबीन पिकावर किड व रोगाच्या प्रादुर्भावाने १८१८१शेतकऱ्यांचे १४५७७ हेक्टर सोयाबीनचे नुकसान झाले. ६५६७ संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचे ४४२.३० हेक्टर, संत्रा व ३७०३ हेक्टर मोसंबीच्या पिकांचे नुकसान झाल्याचे सर्वेक्षण झाले. पण, अद्याप नुकसानीचा मोबदला मिळाला नाही.
अती पावसाने काटोल तालुक्यात एकूण ४६ घरांचे नुकसान झाले. त्यांचे २ लाख ५८ हजार रुपये किमतीचे साहित्य व तीन बकऱ्या पुरात वाहून गेल्या. त्यांना ९ हजार रुपये देण्यात आले. रिधोरा येथील एक महिलेचा पुरात वाहून मृत्यू झाला. त्यांना अद्याप मोबदला देण्यात आला नाही, अशी माहिती काटोलचे तहसीलदार अजय चरडे यांनी दिली.
संपादन - नीलेश डाखोरे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.