नागपूर : बेरोजगारी आणि शासकीय नोकऱ्यांच्या कंत्राटीकरणाविरोधात युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी विधानभवनावर धडक देऊन आत घुसण्याचा प्रयत्न केल्याने काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीनिवास गिरी, प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
सरकार मागण्यांची दखल घेत नसल्याने काँग्रेस नेत्यांसह युवक काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले आणि पोलिसांनी मोर्चाला अडविण्यासाठी लावलेल्या बॅरिकेट्सवर चढले. दरम्यान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आंदोलनात सहभागी झाल्यानंतर आंदोलकर्त्यासह त्यांनी बॅरिकेट्सवर चढल्याने त्यांच्यासह इतर नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. सर्वांना अक्षरशः पोलिस वाहनात कोंबण्यात आले. त्यामुळे मोठी तणावाची स्थिती निर्माण झाली होती.
कंत्राटी पदभरतीच्या नावाने राज्यातील तरुणांचे आयुष्य सरकार बरबाद करीत आहे. महाभरतीच्या नावाखाली बेरोजगार युवकांना ऑनलाइन लुटले जात असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला.
बेरोजगारी, शेतकरी, पेपरफुटी प्रकरण, शिक्षक भरती, शिष्यवृत्ती, फेलोशिप, टाटा एअर बसचा प्रकल्प रद्द, विदर्भातील युवकांशी दुजाभाव आदी मुद्द्यांना घेऊन मोर्चात युवक काँग्रेसचे नेते आक्रमक झाले होते. युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीनिवास गिरी, प्रदेश अध्यक्ष कुणाल राऊत यांच्या नेतृत्वात अंजुमन कॉलेज, सदर येथून
निघालेला मोर्चा लिबर्टी टॉकीज जवळ पोलिसांनी थांबविला. मोर्चा निघण्यापूर्वी काँग्रेसच्या आजी माजी नेत्यांनी मार्गदर्शन केले. प्रचंड नारेबाजी करीत मोर्चेकरी लिबर्टी टॉकीज जवळ आले. पोलिसांनी आधीच बॅरिकेट्स लाऊन मार्ग बंद केल्याने मोर्चेकरी आक्रमक झाले.
परिस्थिती लक्षात घेता कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मात्र, मोर्चेकरी इतके आक्रमक झाले की बॅरिकेट्सवर चढून नारेबाजी केली. दरम्यान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले मोर्चात सहभागी झाले होते. आंदोलनात सहभागी झालेले नाना पटोले, कुणाल राऊत, शिवानी वडेट्टीवार, श्रीनिवास गिरी, बंटी शेळके,
सहदेव गोस्वामी, आकाश गुजर, नीलेश इंदूरकर यांच्यासह ३० ते ४० कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. नेत्यांना ताब्यात घेतल्यामुळे कार्यकर्ते पुन्हा आक्रमक झाले होते. या आंदोलनामुळे संपूर्ण मार्गावर एक तास वाहतूक ठप्प झाली होती.
परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून अखेर पोलिसांनी मोर्चा संपल्याचे जाहीर करून कार्यकर्त्यांना मार्ग मोकळा करण्याची विनंती केली. मोर्चात आमदार विकास ठाकरे, माजी मंत्री सुनील केदार, अतुल लोंढे, सुरेश भोयर, राकेश मोहाडे, मिथिलेश कन्हेरे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
राज्यात लाखो पदे रिक्त असूनही नोकऱ्या दिल्या जात नाही. फडणवीस सरकार असताना महाभरतीच्या नावाखाली तरुणांना ऑनलाइन लुटल्या गेले. मोर्चात पोलिसांना पुढे करून दडपशाही केली जात आहे. कारागृहात टाकले तरी चालेल, मात्र तरुणांना न्याय मिळाल्याशिवाय शांत बसणार नाही. अधिवेशनात याबाबत आपण सरकारला जाब विचारू
-नाना पटोले, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.