Nagpur Rain Update Sakal
नागपूर

Nagpur Rain Update : पावसाने मोडला ५८ वर्षांचा विक्रम; शहराला झोडपले

सकाळ वृत्तसेवा

Nagpur News : विजांचा प्रचंड गडगडाट व मेघगर्जनेसह बरसलेल्या धुवाँधार पावसाने गुरुवारी उपराजधानीत चांगलेच थैमान घातले. सकाळी वादळी पावसाने नागपूरकरांची दाणादाण उडविली व जनजीवन विस्कळीत झाले.

नागपुरात गेल्या ५८ वर्षांत मे महिन्यामध्ये प्रथमच एवढा पाऊस पडला आहे. झोपडपट्ट्यांसह अनेक वस्त्या व घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. जागोजागी विद्युत पुरवठा खंडित झाल्याने मनःस्ताप सहन करावा लागला.

नरेंद्रनगर, मनीषनगर व लोखंडी पुलाखाली गुडघ्यापर्यंत पाणी तुंबल्याने काही काळासाठी वाहतूक ठप्प झाली होती. वादळामुळे ठिकठिकाणी झाडे उन्मळून पडली, विजेचे खांबही वाकले. त्यामुळे अग्निशमन विभागासह महावितरणचीही चांगलीच दमछाक झाली. एकूणच तासाभराच्या पावसाने शहरातील अख्खे जनजीवन विस्कळीत झाले.

अलर्ट पुन्हा तंतोतंत खरा

प्रादेशिक हवामान विभागाने दिलेला ऑरेंज व यलो अलर्ट पुन्हा तंतोतंत खरा ठरला. गुरुवारचा दिवस उजाडताच आभाळ काळेकुट्ट भरून आले. पाहता पाहता वादळ, मेघगर्जना व विजांचा कडकडाट सुरू झाला. सकाळी साडेनऊच्या सुमारास सुरू झालेला पाऊस जवळपास तासभर सुरू होता. वरुणराजाने शहरात सगळीकडेच धुमाकुळ घातला. ऐन कार्यालयात जाण्याच्या वेळेस पाऊस आल्याने दुचाकी व चारचाकी वाहनधारकांची फजिती झाली. त्यामुळे छत्र्या व रेनकोट घालून घराबाहेर पडावे लागले.

रस्ते व चौकही जलमय

पावसामुळे शहरातील रस्ते व चौकही जलमय झाले होते. बेसा, बेलतरोडी, मनीषनगर, शताब्दीनगर, रामटेकेनगर, मेडिकल चौक, मानेवाडा, प्रतापनगर, पडोळे चौक, सीताबर्डी, महाल, इतवारी, सक्‍करदरा, दिघोरी, सदर, काटोल रोड, झिंगाबाई टाकळी, कामठी, कळमना, गड्‌डीगोदाम, त्रिशरण चौक, ओंकारनगर, जरीपटका, दाभा, त्रिमुर्तीनगर, पडोळे चौक, गोपालनगर व छत्रपती चौकाला अक्षरशः तलावाचे स्वरूप आले होते.

‘अग्निशमन’ची धावपळ

वादळी पावसामुळे शहरातील अनेक ठिकाणी झाडे व फांद्या पडल्या. त्यामुळे मनपाच्या अग्निशमन विभागाची धावपळ झाली.त्रिमूर्तीनगर, स्वावलंबीनगरसह ऑरेंजसिटी हॉस्पिटल व जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात झाडे उन्मळून पडल्याचे व काही भागांत विजेचे खांब वाकल्याचे अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले. तर भवन्स श्रीकृष्णनगर व लकडगंज भागांतील घरांमध्ये व बेसमेंटमध्ये पाणी शिरल्याच्या तक्रारी मिळाल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले. सुदैवाने या घटनांमध्ये कोणतीही जीवित व वित्तहानी झाली नाही.

रेल्वे प्रवाशांना फटका

अचानक मुसळधार पावसामुळे नागपूर रेल्वे स्थानकावर उभ्या शालिमार एक्सप्रेससह काही गाड्यांमध्ये पाणी घुसले. उघड्या खिडक्यांमधून डब्यात पाणी जमा झाले. शिवाय सीट ओल्या झाल्याने अनेक प्रवाशांना उभ्याने प्रवास करावा लागला. पावसामुळे त्यांच्या बॅग व कपड्यांसह अन्य साहित्यही ओले झाले होते.

तीन पुलांखाली पाणी

धो-धो पावसामुळे नरेंद्रनगर, मनीषनगर व लोखंडी पुलाखाली चक्क गुडघ्यापर्यंत पाणी साचले होते. त्यामुळे दुचाकी व चारचाकी वाहनधारकांना हॉटेल रॅडिसन ब्ल्यूजवळील उड्डाणपुलावरून जावे लागले. पावसामुळे अनेकांची वाहने बंद पडल्याचे चित्र जागोजागी दिसले.

मनपाचे पितळ उघडे

तासभराच्या पावसाने स्मार्ट सिटी व मॉन्सूनपूर्व तयारीचा दावा करणाऱ्या मनपाच्या दाव्यांचे पितळ उघडे पडले. मुळात पाणी जायला मार्ग नसल्यामुळेच ही स्थिती उद्भवली. जागोजागी नाल्या चोक होऊन व त्यात कचरा साचल्यामुळे रस्ते जलमय झाले. ऐन उन्हाळ्यात हे चित्र पाहायला मिळाले. पावसाळा एक महिन्यावर असल्यामुळे ‘ये तो सिर्फ झाकी है, पुरी बरसात बाकी है’ अशा शब्दांत काहींनी सोशल मीडियावर प्रशासनाची खिल्ली उडविली.

६.४ अंशांची घसरण

पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण होऊन कमाल तापमानात मोठी घट झाली. चोवीस तासांत नागपूरच्या कमाल तापमानात ६.४ अंशांची घसरण होऊन पारा ३२.७ अंशांवर आला. दुपारी मात्र ऊन तापले. इतरही जिल्ह्यांतील तापमानात लक्षणीय घसरण झाली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार', IND vs BAN सामन्याविरोधात हिंदू संघटना आक्रमक, मालिका रद्द होणार?

Aaditya Thackeray : महायुती गद्दारांचा चेहरा घेऊन विधानसभा लढणार का?

Raj Thackeray: डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; राज्यासह केंद्र सरकारला सुनावले खडेबोल

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वडेट्टीवारांचा जोरदार हल्ला

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

SCROLL FOR NEXT