कोंढाळी (जि.नागपूर): वाघोबा आणि माणूस यांची जंगलात आमोरासमोर गाठ पडली तर काय होणार, हा थरार अनुभवण्यासाठी प्रत्यक्ष त्या शेतकऱ्यांच्या ठिकाणी स्वतःचा कल्पना केली की थरार लक्षात येईल ! अशीच घटना काटोल तालुक्यातील वाई येथे घडली. कोंढाळी वनपरिक्षेत्रतातील मेंढेपठार उपवनवनातील वाई येथील शेतकऱ्यांच्या कपाशीच्या शेतात दबा धरून बसलेल्या वाघोबाच्या तावडीतून वाई येथील शेतकरी राजेंद्र कोल्हे व विलास कुकडे प्रसंगावधानाने थोडक्यात बचावले. ‘त्या’ दोन्ही शेतकऱ्यांनी रात्र जागलीकरीता बांधलेल्या मचाणाचा आश्रय घेतला. वाई परिसरात दुसऱ्यांदा वाघोबा पोहचल्याने शेतकरी व गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
मचाणासमोरच मांडला ठिय्या
या बाबतची घटना अशी की शेतकऱ्याच्या वन्यप्राणी उभ्या पीकांचे नुकसान करीत आहेत. त्याकरीता वाई गावाचे शेतकरी राजेद्र कोल्हे व विलास कुकडे हे शेतावर रात्र जागलीकरीता नेहमीप्रमाणे २६ ऑक्टोबरच्या रात्री साडेसातला शेतावर गेले. शेतावर पोहचल्यावर राजेंद्र कोल्हे रात्र जागलीकरीता उभारलेल्या मचानवर बसले. बाजूचे शेतकरी विलास कुकडेही सोबत होते. मचानवर बसल्यावर शेतात वन्यप्राण्याची चाहूल लागली. याकरीता राजेंद्र कोल्हे यांनी जवळ असलेल्या टार्चचा उजेड शेतात केला असता समोर पाहतो तो चक्क वाघोबा मचाणाकडे येत असल्याचे दिसले. वाघोबा शेतात तोही चक्क मचाणाकडे येताना दिसताच टार्च बंद करून भीतीच्या वातावरणात दोन्ही शेतकऱ्यांनी दबक्या आवाजात मोबाईलच्या माध्यमातून गावचे पोलिस पाटील राजेंद्र कराळे यांना वाघोबाने मचाणासमोरच ठिय्या मांडल्याची माहिती दिली.
ओरडण्यामुळे वाघोबाने काढला जंगलाकडे पळ
पोलिस पाटील राजेंद्र कराळे यांनी वेळ न घालवता गावकऱ्यांना जमा केले व २० ते२५ गावकऱ्यांनी राजेंद्र कोल्हे यांच्या शेताकडे धाव घेतली. आरडाओरडा करत शेतावर पोहचले. गावकऱ्यांच्या ओरडण्यामुळे वाघोबाने जंगलाकडे पळ काढला . शेतकऱ्यांच्या प्रसंगसावधानतेने व गावकऱ्यांच्या सहकार्याने दोन्ही शेतकरी वाघोबाच्या तावडीतून सुखरूप बचावले. २६ ऑक्टोबर रोजी या घटनेची माहिती जि.प.सदस्य सलील देशमुख व चंद्रशेखर कोल्हे यांना दिली यांनी वनखात्याच्या वन अधिकाऱ्यांना ही माहिती दिली. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी वाई येथे पोहचल्यावर शेतकरी व गावकऱ्यांना आपापल्या घरात राहण्याची विनंती केली व वाघोबा ज्या दिशेने जंगलभागाकडे गेला, त्या परिसरात रात्र गस्त सुरू केली आहे.
वाई परिसरात दुसऱ्यांदा दर्शन
मागील १० मे रोजी वाघोबाने वाई गावातील चार शेतकऱ्यांच्या सहा जनावरांना गंभीर जखमी केले होते. तेव्हा जि.प.सदस्य सलील देशमुख व चंद्रशेखर कोल्हे ,डिएफओ प्रभूनाथ शुक्ला, आरएफओएफआर आजमी वाई येथे पोहचून संबधित शेतकऱ्यांची भेट घेऊन मोबदला देण्याची मागणी मान्य केली होती. २६ ऑक्टोबरच्या रात्री वाईच्या शेतकऱ्यांच्या शेतातील वाघोबाला गावकऱ्यांनी पिटाळून लावले असले तरी या वाघोबाच्या वाई खुर्दचे शेतकरी किशोर कोल्हे यांच्या कालवडीला आपले भक्ष्य बनविले, अशी माहिती सरपंच संजय डफर यांनी दिली आहे. या प्रकरणी वनपरिक्षेत्र अधिकारी एफआर आजमी यांना विचारले असता त्यांनी सांगितले की वाई गावात वाघ शिरल्याची माहिती मिळताच वन कर्मचाऱ्यांची गस्त सुरू केली आहे. या भागात कालवडीचे शिकार केल्या ठिकाणी कॅमेरे बसविण्यात आले आहेत.
संपादनःविजयकुमार राऊत
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.