Waste water from dumping yard in Bhandewadi slums nagpur 
नागपूर

स्मार्ट सिटीला लागूनच नरकपुरी!

डम्पिंग यार्डमधील कचऱ्याचे घाण पाणी वस्तीत, भांडेवाडीत नागरिकांचे जगणे कठीण, घरोघरी रुग्ण

राजेश प्रायकर

नागपूर - भांडेवाडीत कचऱ्यावर प्रक्रिया होत नसल्याने मोठे ढिगारे तयार झाले आहे. गेल्या १२ दिवसांपासून संततधार पावसाने हा कचरा चिंब झाला असून कुजल्याचे दिसून येते. यातील घाण पाणी लागूनच असलेल्या वस्त्यांमध्ये शिरत असल्याने येथील नागरिकांचे जगणे कठीण झाली आहे. रस्त्यांवर दुर्गंधीयुक्त व आरोग्याला धोकादायक घाण पाणी असून त्यातूनच चालावे लागत आहे. त्यामुळे डम्पिंग यार्डच्या बाजूच्या वस्त्यांमध्ये घरोघरी तापाचे रुग्ण दिसून येत आहे. विशेष म्हणजे भांडेवाडीचा काही भाग स्मार्ट सिटी प्रकल्पात समाविष्ट असून लागूनच असलेल्या भागात नागरिकांना नरकयातना सहन कराव्या लागत आहे.

शहरातील भांडेवाडी परिसर डम्पिंग यार्डमुळे कायमच प्रशासनाकडून दुर्लक्षित करण्यात आला. आजही रिंगरोडपासून भांडेवाडीकडे जाण्यास वळण घेतल्यास खेड्यापेक्षाही वाईट स्थितीतील रस्त्यांनी पुढे जावे लागत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हा रस्ता तयार होत आहे. रस्त्यांमध्ये खड्डे, त्यानंतर एका बाजूच्या रस्त्यांचे काम अनेक दिवसांपासून बंद असल्याने त्या भागात नागरिकांनी अतिक्रमण केल्याचे दिसून येते. डम्पिंग यार्डच्या प्रवेशद्वाराजवळ अजूनही रस्ता तयार होत आहे. खड्ड्यातून निघताना वाहनातील काही कचरा रस्त्यात पडतो.

त्यावरून इतर वाहने जात असल्याने पावसात हा कचरा सडतो. अर्थात रस्त्यावरून जातानाही दुर्गंधी कायम आहे. याच डम्पिंग यार्डच्या भिंतीला लागून सुरजनगर आहे. मागील बाजूला अंतुजीनगर, अब्बुमियानगर आदी आहेत. गेल्या काही वर्षांपासून कचऱ्यावर प्रक्रिया करण्याला महापालिकेने हरताळ फासला. त्यामुळे डम्पिंग यार्डमध्ये कचऱ्याचे ढिगारे तयार झाले आहे. हे कचऱ्याच्या ढिगारे गेल्या बारा दिवसांपासून संततधार पावसामुळे चिंब झाले आहे. या कचऱ्यात ढिगाऱ्यातील घाण पाणी आता संरक्षक भिंतीला पडलेल्या छिद्रातून सुरजनगर वस्तीत शिरत आहे.

या घाण पाण्याच्या दुर्गंधीने नागरिक त्रस्त झाले आहेत. केवळ पाणीच नव्हे तर त्यातून अक्षरशः चिखलासारखा स्त्राव बाहेर पडत आहे. हे सर्व रस्त्यांवर जमा होत असल्याने या घाणीच्या चिखलातून येथील नागरिकांना मार्ग काढावा लागत आहे. एवढेच नव्हे अनेकांच्या घराबाहेर दारातही हा घाणयुक्त चिखल येत असल्याने नागरिकांच्या आरोग्यालाही धोका निर्माण झाला आहे. या घाणीतून नको ते रसायन दुर्गंधीद्वारे नाकात शिरत आहे. परिणामी या वस्तीत घरोघरी नागरिक बेडवर दिसून येत आहे. भांडेवाडीच्या याच भागाला लागून स्मार्ट सिटी तयार होत आहे. एकीकडे स्मार्ट सिटी व दुसरीकडे नरकपुरी, अशी स्थिती आहे. या नरकपुरीतून कधी बाहेर पडणार, असा प्रश्न या भागातील हजारो नागरिक विचारत आहेत.

जेवण करणे अवघड, अनेकदा ओकाऱ्या

डम्पिंग यार्डमधील कचऱ्यातून घाणयुक्त चिखलच वस्तीतील नागरिकांच्या घरापर्यंत पोहोचत आहे. येथे रस्ता नाही, परंतु तयार करण्यात आलेल्या ड्रेनेजमध्ये हा घाणयुक्त चिखल साचला असून नकोशी दुर्गंधी परिसरात पसरली. त्यामुळे अनेकदा या दुर्गंधीमुळे तसेच घाण चिखलामुळे जेवणही नकोशे होत असल्याचे शबाना शेख यांनी सांगितले. अनेकदा जेवताना ओकाऱ्या होतात, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.

डम्पिंग यार्डचे पाणी थोपवावे

पावसाळ्यात डम्पिंग यार्डचे घाण पाणी वस्तीत शिरते. त्यामुळे महापालिकेने हे घाण पाणी बाहेरच येणार नाही, अशी प्रणाली विकसित करण्याची गरज प्रा. सचिन काळबांडे यांनी व्यक्त केली. परिसरातच महापालिकेचे सांडपाणी प्रक्रिया केंद्र आहे. डम्पिंग यार्डमधील कचऱ्यातील पाणी वाहून जाण्यासाठी संरक्षक भिंतीभोवती ड्रेनेज तयार करून ते पाणी सांडपाणी प्रक्रिया केंद्राकडे वळविल्यास पावसाळ्यातील समस्या दूर होऊ शकते, असेही ते म्हणाले.

लोकप्रतिनिधींची उदासीनता, प्रशासनानेही सोडले वाऱ्यावर

गेल्या अनेक वर्षांपासून भांडेवाडीतील या वस्त्या दुर्लक्षित आहेत. या भागातील नागरिकांनी अनेकदा परिसराचे आमदार, तत्कालीन नगरसेवक, महापालिका प्रशासनाकडे डम्पिंग यार्डमुळे निर्माण झालेल्या समस्या सोडविण्यासाठी निवेदन दिले, विनंती केली. परंतु लोकप्रतिनिधींनी उदासिनता दाखवली तर प्रशासनानेही येथील नागरिकांना वाऱ्यावर सोडले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Imtiaz Jaleel : बूथ कॅप्चर भाजपने केले अन् गुन्हा माझ्यावर कसा? इम्तियाज जलील

AUS vs IND 1st Test: भारतीय फलंदाजी ऑस्ट्रेलियन वेगवान माऱ्यासमोर कोलमडली! कसाबसा गाठला १५० धावांचा टप्पा

Nashik Vidhan Sabha Election : ‘महायुती-महाविकास’चे अपक्ष उमेदवारांवर लक्ष; वरिष्ठ नेत्यांकडून अपक्ष उमेदवारांशी संपर्क

Nanded Assembly Election 2024 : जातीय मतविभाजनाचा फटका कोणाला बसणार?

Uddhav Thackeray: निकालाची धडकी? उद्धव ठाकरेंचा प्लॅन बी! 'लाईव्ह'चं शस्त्र उगारलं, पुन्हा दगा टाळण्यासाठी उमेदवारांना एकत्र आणलं

SCROLL FOR NEXT