नागपूर : कोरोनाच्या फूत्काराने भीतीची काळीकुट्ट छाया गडद होत चालली आहे. अवघे जग "लॉकडाउन' झाले आहे. सर्वांवर घरातच कैद होण्याची वेळ आली आहे. बिकट काळ हा प्रतिभावंतांसाठी तसा "सुकाळ'च असतो. इथे सर्जनाला वाव असतो. या काळात हे प्रतिभावंत काय करीत असतील, हा औत्सुक्याचा विषय आहे. याच अनुषंगाने त्यांच्या अंतरंगात शिरण्याचा हा प्रयत्न.
हा काळ चिंतनाचा आहे. जगाच्या पाठीवर कुठेतरी रोज मरणाऱ्या त्या असंख्य जीवांसाठी दिवसातले काही क्षण स्तब्ध होण्याचा आहे. "लॉकडाउन'मध्ये आपण सगळेच गेले महिनाभर घरातल्या माणसांचे तेच तेच चेहरे पाहून कंटाळून गेलोय. तर, तिथे डॉक्टर, नर्स, पोलिस घराबाहेर पडताना डोळेभरून एकवार पोराबाळांवर नजर फिरवत आहेत.
हा काळ चिंतनाचा
पालघरमधील एक नर्स गेले महिनाभर आपल्या घराच्या शेजारची खोली घेऊन राहतेय आणि आठवडाभराने हॉस्पिटलमधून परतल्यावर घरात न जाता शेजारच्या खोलीत जातेय. नवऱ्याला म्हणतेय की कोरोनाची लागण होऊन मी मेले तर कुणी जवळ येऊ नका. अशा एक ना अनेक कथा आपल्या आसपास घडत आहेत. हा काळ एकीकडे माणसातल्या राक्षसाचे दर्शन घडवीत आहे. तर, दुसरीकडे माणसातल्या देवाचे. म्हणूनच या काळाची नोंद करणे आवश्यक आहे. मी या काळाचे हे करुण आणि रौद्र रूप पाहण्याचा आणि त्याची नोंद करण्याचा प्रयत्न करीत आहे. सोबतच पत्रकार राजेश जगताप आणि अनिल डोडेजा यांच्यासोबत आदिवासी पाड्यातील गरीब तसेच अडकून पडलेले बांधकाम मजूर यांना अन्नधान्य पुरविण्याचे काम करीत आहे.
-किरण येले
कवी, कथाकार, अंबरनाथ (ठाणे)
गांधींचं जीवनदर्शन बळ देऊन गेलं
मरण उंबरठ्यावर येऊन उभं आहे. अवेळी माणसं मरताहेत, याचा ताण माझ्या मनावर सतत जाणवतोय. वाचन, चिंतन, मनन सुरू आहे. एवढ्यात रामचंद्र गुहा लिखित, शारदा साठे यांनी अनुवाद केलेलं "गांधी भारतात येण्यापूर्वी' आणि "महात्मा गांधी जीवन आणि कार्यकाळ' हे वि. रा. जोगळेकर यांनी अनुवाद केलेलं, लुई फिशर यांनी लिहिलेलं चरित्र वाचून झालं. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर संयमानं, निर्धारानं कशी मात करता येते याचं महात्मा गांधी यांचं विलक्षण जीवनदर्शन या काळात खूपच बळ देऊन गेलं. वैचारिक, कथा, कादंबरी आणि कविता वाचत असतो. लिखाण थोडंफार सुरू आहे. टीव्ही, वेबसेरीज सोबतीला आहेतच. मनाला गुंतवण्याचाच हा एक प्रयत्न आहे.
-प्रमोद मनोहर कोपर्डे,
ज्येष्ठ कवी, लेखक, सातारा
जुना ऐवज चाळतो आहे
दौरे, प्रवास, कार्यक्रम, विद्यापीठात रोजची ये-जा एकदम थांबली. भिंतीत खुंटी मारावी तसा गच्च बसून घरात असा कित्येक वर्षांनी कोंडून आहे. या काळात पायाभूत पुष्कळ वाचतो आहे. लिप्यांचे इतिहास, विश्वकोशांचे खंड, तुकारामांची सरकारी प्रत असलेली गाथा, समीक्षेची पुस्तकं, जुनी नियतकालिके वाचत आहे. भाषा व समीक्षा या शाखांतील जुना ऐवज चाळतो आहे. पुष्कळ अघळपघळ झाले होते. पुस्तकं, विविध अंक, शोधप्रबंध, दिवाळी अंक, जुने पेपर फाइल्स यांची सौंदर्यरूप मांडणी करीत आहे. बायको किती कष्ट करते याचे सत्यदर्शन यानिमित्ताने झाले आहे. तिच्या कामांत थोडी लुडबूड करतो. चार-पाच पुस्तकांचा ऐवज घरात जपून ठेवलेला आहे, हे कळले. त्यांचे पुनर्लेखन करीत आहे. उद्याचा सूर्य सुंदर असेल.
-प्रा. डॉ. केशव सखाराम देशमुख
कवी, समीक्षक, नांदेड
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.