नागपूर : परवा परवाच काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षांची निवड झाली. विदर्भाच्या यवतमाळ येथील संध्या सव्वालाखे यांच्या गळ्यात ती माळ पडली. त्यानंतर आता प्रदेशाध्यक्षपदी कोण, या चर्चेने जोर धरला आहे. सद्यस्थितीत महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण या काँग्रेसमधील दोन्ही गटांनी जोर लावल्याचे दिसते. पण प्रदेशाध्यक्षपदाच्या रेसमधील एक प्रमुख दावेदार विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले हे वरीलपैकी एकाही गटाचे नाहीत आणि थोरात गट 'न्यूट्रल' झाल्याचे दिसतेय. त्यामुळे गटबाजीचा भाग नसलेले नाना प्रदेशाध्यक्ष होतील की पक्षातील गटबाजीच्या राजकारणात मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार बाजी मारतील, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
अशोक चव्हाण गटाने राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांना पुढे केले आहे, तर बाळासाहेब थोरात गटाने संग्राम थोपटे यांना पुढे केल्याची माहिती आहे. चव्हाण गटाने वडेट्टीवारांना पुढे करून नानांचा पत्ता कापण्याची खेळी सुरू केल्याचेही सांगण्यात येते. ओबीसींच्या मुद्द्यावर पुढाकार घेऊन वडेट्टीवार ओबीसी नेता म्हणून गेल्या काही काळात समोर आले आहेत. चंद्रपुरात काँग्रेसचे महाराष्ट्रातले एकमेव खासदार बाळू धानोरकर यांच्या साथीने त्यांनी काढलेला ओबीसींचा भव्य मोर्चा आणि 'ओबीसींच्या न्याय हक्कांसाठी प्रसंगी राजीनामा देऊ' आणि 'माझ्या ओबीसी बांधवांपेक्षा मंत्रीपद मोठे नाही', अशी वक्तव्ये मागील काळात करुन वडेट्टीवारांनी राज्याच्या राजकारणावर आपली पकड घट्ट करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. त्यामुळे प्रदेशाध्यक्षपदावर त्यांची वर्णी लागेल, अशी आशा त्यांच्या समर्थकांना आहे.
गटबाजी थांबवायची असेल तर...
प्रदेशाध्यपदाची निवड करण्यासाठीच गटबाजी केली जात आहे. तेव्हा ज्या दोन गटांकडून फिल्डींग लावली जात आहे. त्यांच्यामध्येही निवडीनंतर गटबाजी उफाळून येईल, जे सद्यस्थितीत पक्षासाठी चांगले नाही, असा एक मतप्रवाह पक्षातील मंडळीमध्ये आहे. त्यामुळे नवीन प्रदेशाध्यक्ष गटबाजीतला नसावा, असा विचार हायकमांडने केल्यास नानांची वर्णी लागू शकते. कारण सध्यातरी पक्षात ते कोणत्या गटाचे आहेत, असे बोलले जात नाही. गटबाजीच्या भानगडीत नसल्यामुळे त्यांना थेट पक्षश्रेष्ठींकडूनच अपेक्षा आहे. शेतकरी नेते म्हणून नानांचे नाव मोठे आहे. शेतकऱ्यांच्या मुद्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोध करीत खासदारकीचा राजीनामा देऊन त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे पक्षात त्यांचे चांगले वजन आहे. पक्षाचे नेते राहुल गांधी सध्या तमीळनाडूमध्ये जलीकट्टू हा खेळ बघायला गेले आहेत. ते आल्यानंतर प्रदेशाध्यक्ष घोषीत केला जाणार असल्याचे सांगण्यात येते. नाना कोणत्याच गटाचे नसल्याने राहुल गांधी त्यांच्या नावावर विचार निश्चितच करतील, अशी आशा नानांच्या समर्थकांना आहे.
सर्व मागे पडले, चर्चेत फक्त दोनच नावे -
प्रदेशाध्यक्षपदासाठी विदर्भातील नेते विधानसभा अध्यक्ष नाना पटोले, ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, दुग्धविकास मंत्री सुनील केदार आणि पश्चिम महाराष्ट्रातील नेते संग्राम थोपटे यांच्या नावांची चर्चा आजपर्यंत सुरू होती. पण आत्ता नाना पटोले आणि विजय वडेट्टीवार ही दोनच नावे चर्चेत आहेत. बाकी सर्व नावे मागे पडली असल्याचे काँग्रेसमधील विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. राहुल गांधी तमीळनाडूनमधून परत आल्यावर याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. त्यामुळे आज तरी नवीन प्रदेशाध्यक्षांच्या नावाची घोषणा होणार नाही, असे वाटते. कदाचित उद्या ती होण्याची शक्यता आहे. पण या दोन नावांपैकी विजय वडेट्टीवार यांचे पारडे जड असल्याचेही सूत्र सांगतात. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष कोण होणार? गटबाजीचा भाग नसलेले नाना, की पक्षातील एका गटाचे वडेट्टीवार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.