मोहाडी (जि. भंडारा) : हल्ली आगळ्या-वेगळ्या पद्धतीने वाढदिवस सेलिब्रेट करण्याचे फॅड वाढले आहे. कोणी तलवारीने केक कापून "थ्रिल' आणतात, तर कोणी आपल्या वयाइतक्या वजनाचा केक कापतात. मोठे सेलिब्रेटी कशाकशाचे केक करून कापतील याचा विचारच सामान्यांनी न केलेला बरा! मोहाडी येथून मौदा येथे बदलून गेलेला व वाळूमाफियांचा "नाथ' असलेल्या एका नायब तहसीलदारांनी चक्क नऊ केक कापून आपला "बर्थ डे' सेलिब्रेट केला. या सेलिब्रेशनचे छायाचित्र तालुक्यातील वाळू व्यावसायिकांच्या व्हॉट्सऍपवरून व्हायरल होत आहेत.
एकीकडे वाळूतस्करांवर कारवाई करणाऱ्या प्रामाणिक अधिकाऱ्यांवर जीवघेणे हल्ले होत आहेत. तर दुसरीकडे काही अधिकारी बेलगामपणे व बेजबाबदारपणे वागत आहेत. कोणी कोणाला आपल्या वाढदिवसाला बोलवावे, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. परंतु, फक्त वरवर कारवाईचे नाटक दाखविणाऱ्या अधिकाऱ्यांचे खरे स्वरूप काय आहे, ही बाब यातून अधोरेखित होत आहे. मौदा येथील नायब तहसीलदारांचा वाढदिवस तेथील एका आलिशान हॉटेलमध्ये आयोजित केला होता. विशेष म्हणजे यावेळी झाडून नागपुरातील सारे मोठमोठे वाळूतस्कर उपस्थित होते. हा सगळा थाटमाट व सेलिब्रेशन वाळूतस्करांकडून प्रायोजित असल्याची माहिती याच व्यवसायातील सूत्राकडून समजली.
तालुक्यातून वाहणाऱ्या नद्यांमुळे शेतकऱ्यांच्या जीवनात समृद्धी येऊ शकली नाही. अजूनही त्यांना दारिद्य्र व गरिबीलाच तोंड द्यावे लागत आहे. किंबहुना नदी घाटावरील वाळूचा व्यवसाय (तस्करी) करून अनेकांना मात्र लक्ष्मी प्रसन्न झाली आहे. "प्रयत्ने वाळूचे कण रगडिता धनही गळे' ही उक्ती सार्थ ठरवीत शेकडो वाळूचोर तालुक्यात निर्माण झाले असून ही साखळी नागपुरातील मोठ्या वाळूतस्करांपर्यंत जाते. "बर्थडे मॅन' हे मोहाडी येथे नायब तहसीलदार म्हणून असताना वाळूतस्करांच्या डोक्यावर वरदहस्त ठेवून त्यांनी मोठा धनलाभ प्राप्त केला आहे.
सविस्तर वाचा - बदनामीची धमकी देऊन आठ दिवस केला बलात्कार, तो निघून गेल्यानंतर ती दबक्या आवाजात म्हणाली...
आपल्या कार्यालयीन कामकाजापेक्षा त्यांना वाळूघाटातच जास्त स्वारस्य होते. भंडारा येथे असताना लाचप्रकरणी निलंबन झाल्यानंतर सहीसलामत सुटून ते पुन्हा भंडारा जिल्ह्यातच परतले. वाळूतूनही मलिदा निघतो हे ठाऊक असल्याने कदाचित हा मोह त्यांना सुटला नाही. कधी नव्हे ते खऱ्या अर्थाने वाळूतस्करांचे नाथ झाले आणि वाळूघाट असलेल्या खेड्यांत कात टाकली. यावेळी ते एकटे नव्हते. त्यांचे बंधूराजही त्याच कार्यालयात लिपिक म्हणून आले. अनेकांनी त्यांच्या बंधूप्रेमाने बोटे मोडली. पण या खेळात त्यांचे कोणी वाकडे केले नाही. त्यामुळे त्यांच्यावर कोणाचा हात आहे, हे मात्र, गुलदस्त्यात आहे.
मौदा येथून हलतात मोहाडीची सूत्रे
नायब तहसीलदारांचे आठ महिन्यांपूर्वीच मोहाडी तहसील कार्यालयातून मौदा उपविभागीय कार्यालयात नायब तहसीलदार म्हणून स्थानांतरण झाले. परंतु, आजही सलोख्याचे संबंध कायम आहेत. मोहाडी तालुक्यातून जाणारे वाळूचे टिप्पर महामार्गावरून मौदा ओलांडून जातात. एन्ट्रीच्या नावाखाली वसुली करण्याचे काम आताही अविरत सुरू असल्याचे समजते. मोहाडीतील सूत्रे अजूनही मौदा येथून हलविली जात असल्याची माहिती आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.