उमरखेड : पामलवाड दाम्पत्याच्या पोटी दोन अपत्य एक दिवसाआधी मुलीचा विवाह झाला... मुलीला आणण्यासाठी मुलाला पाठवले मुलगी आणि जावई येणार असल्याने घरी तयारी करण्यात आली आई-वडील त्यांची आतुरतेने वाट पाहत होते मात्र, काळाला हे मान्य नव्हते... आई-वडिलांच्या अंगाखांद्यावर खेळणारे दोन्ही पोटचे लेकरे काळाने ओढून नेली ही बातमी धडकताच मायबापांच्या पायाखालची जमीनच सरकली भविष्याचा आधारच कोलमडल्याने आम्ही कुणाकडे बघावे, असा आर्त टाहो आई साधना व वडील ज्ञानेश्वर यांनी फोडला.
विदर्भातील साखरा हे गाव उमरखेड ते देवसरी रस्त्यावर अवघ्या पंधरा किलोमीटर अंतरावर आहे. साधारण दीड ते तीन हजार लोकसंख्या येथे आहे. सर्व ग्रामस्थ गुण्यागोविंदाने राहतात. याच गावातील साधनाबाई व ज्ञानेश्वर पामलवाड यांना मुलगी पूजा व मुलगा दत्ता असे दोनच अपत्य. त्यांच्याकडे थोडीफार शेती होती. संसाराचा गाडा हाकण्यासाठी आई-वडील मोलमजुरी करून उदरनिर्वाह करीत असत.
त्यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करून घराला घरपण मिळवून दिले. मुलीचे हात पिवळे करण्यासाठी आई-वडिलांनी ऊन, वादळवारा, पाऊस, अंगाखांद्यावर घेऊन काबाडकष्ट करून पैपै पुंजी जमा केली. सुयोगाने पूजाला चांगले स्थळ मिळाले. जारीकोट (ता. धर्माबाद, जि. नादेड) येथील रहिवासी असलेल्या कनेवाड परिवारातील होतकरू मुलगा नागेश साहेबराव कनेवाड याच्याशी शनिवारी (ता. १९) साखरा या गावी मोठ्या धूमधडाक्यात विवाह पार पडला.
परंपरेनुसार आरतणी-परतणी करण्यासाठी शनिवारी नवरी-नवरदेव जारीकोट येथे आले. सासरच्या मंडळींनी पाहुणे रावळे बोलवून पाहुणचार केला. यावेळी नवरीच्या भाऊ दत्ता सुध्दा सोबत होता. पाहुणचार झाल्यावर सोमवारी (ता. २१) नवरा-नवरी आणि पाहुणे मंडळी वाहनाने साखरा गावी निघाले. वाटेत भोकर कीनवट रस्त्यावरील सोमठाणा (ता. भोकर) येथे वाहनांची समोरासमोर धडक झाल्याने नववधू पूजा व भाऊ दत्ता यांच्यासह तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच आई-वडिलांनी एकच हंबरडा फोडला. सारेच ग्रामस्थ शोकसागरात बुडाल्याने घटनेच्या दिवशी गावात एकही चूल पेटली नाही.
देवाऽऽ आमच्या चिमणा-चिमणीच घरटं कारे हिरवलस
वधू-वर भावी आयुष्यातील सुखी संसाराचे दिव्यस्वप्न रंगवीत असताना अपघाताने स्वप्न चकणाचूर झाले. लेकीचे हात पिवळे करण्यासाठी पैपै एक करून लग्न केले. पोटच्या दोन्ही गोळ्याला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपले. नाळ तुटली तरी सारा जीव लेकरात होता. परंतु, काळाला हे पाहवले नाही. निष्ठुर झालेल्या देवाला आमची दया आली नाही. आम्ही बघून जगाव अस कोणी राहिलेले नाही. देवाऽऽ आमच्या चिमणा-चिमणीच घरटं कारे हिरवलस, असे म्हणत साधनाबाई व ज्ञानेश्वर यांनी अश्रूंना वाट मोकळी करून दिली.
अपघातात ५ जण ठार तर १२ जखमी
भोकर-कीनवट रस्त्यावर सोमठाणा (ता. भोकर) शिवारात सोमवारी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास विवाह झाल्यानंतर आरतणी-परतणी करून परत जाताना टेम्पो आणि मॅजीक वाहनाची समोरासमोर जोराची धडक झाल्याने पाच जण जागीच ठार तर बारा जखमी झाले होते. या घटनेत नववधू पूजा ज्ञानेश्वर पामलवार (वय २१, रा, साखरा), भाऊ दत्ता ज्ञानेश्वर पामलवार (वय २२), माधव पुरबाजी सोपेवाड (वय ३०, रा. जांबगाव, ता. उमरी), सनील दिंगाबर धोटे (वय २८, रा. चालगणी, ता. उमरखेड, चालक) व एकाचा मृत्यू झाला होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.