मोताळा (जि.बुलडाणा) : पीककर्जासाठी आवश्यक कागदपत्रांकरिता परिसरातील शेतकरी मंगळवारी (ता.2) येथील तलाठी कार्यालयात पोहोचले असता, तलाठी कार्यालय कुलूप बंद होते. काही शेतकऱ्यांनी दिवसभर तलाठी कार्यालयात ठाण मांडले. परंतु, तलाठी, कोतवाल किंवा एकही कर्मचारी कार्यालयाकडे फिरकला नाही. उपाशीपोटी ताटकळत बसलेल्या शेतकऱ्यांना रिकाम्या हाताने परतावे लागले. या प्रकारामुळे महसूल प्रशासनाचा गलथान कारभार चव्हाट्यावर आला आहे.
सध्या पेरणीचे दिवस असून, शेतकऱ्यांना पीककर्ज मिळविण्यासाठी सातबारा, नमुना आठ अ व इतर कागदपत्रांची गरज आहे. त्यामुळे शेतकरी बांधव तलाठी कार्यालय, तहसील कार्यालय व बॅंकांचे उंबरठे झिजवत आहेत. येथील तलाठी श्री झोटे यांच्याकडे मोताळा साजा असून, पिंपळगावनाथ साज्याचा अतिरिक्त प्रभार देण्यात आलेला आहे. दरम्यान, मंगळवारी येथील तलाठी कार्यालयात सातबारा, नमुना आठ अ व इतर कागदपत्रांसाठी मोताळा, खरबडी, गिलोरी, धामणगाव देशमुख, पलढग यासह परिसरातील खेडेगावातील शेतकऱ्यांची गर्दी उसळली होती.
काही शेतकरी सकाळी दहा वाजतापासून तलाठी कार्यालयाच्या परिसरात ठाण मांडून बसले होते. परंतु, तलाठी कार्यालय कुलूप बंद होते. तलाठी, कोतवाल किंवा एकही कर्मचारी या कार्यालयाकडे फिरकला नाही. खेडेगावातून भाडे खर्च करून आलेल्या शेतकऱ्यांना दिवसभर उपाशीपोटी ताटकळत बसावे लागले. तलाठ्यांची वाट बघून थकलेल्या एका शेतकऱ्याला याठिकाणी झोप लागली होती. विशेष म्हणजे याठिकाणी शेतकऱ्यांना पिण्यासाठी पाणी सुद्धा उपलब्ध नव्हते. साहेब येणार या आशेवर शेतकरी भूक, तहान विसरून चातकासारखी वाट पाहत होते.
काही जण दोन तीन चकरा मारून परत जात होते. तर काही शेतकरी दोन तीन दिवसांपासून चकरा मारून हैराण झाले. दरम्यान, दुपारनंतर तहसीलदारांना शेतकऱ्यांची व्यथा सांगितली असता, त्यांनी मंडळ अधिकारी व तलाठ्यांना पाठवतो, असे सांगितले. तासाभरानंतर चार वाजताच्या जवळपास मंडळ अधिकाऱ्यांनी एन्ट्री मारली. तोपर्यंत अनेक जण कंटाळून माघारी फिरले होते. दरम्यान, मंडळ अधिकाऱ्यांकडे कुलुपाची किल्ली नव्हती. त्यांनी उपस्थित शेतकऱ्यांना नावे लिहून द्या, उद्या कागदपत्रे देण्याची व्यवस्था करतो, असे म्हणून वेळ मारून नेली.
त्यामुळे शेतकऱ्यांचा भ्रमनिरास झाला. अखेर आर्थिक भुर्दंड सहन करून शेतकऱ्यांना रिकाम्या हाताने घराकडे परतावे लागले. तालुक्यातील बहुतांश तलाठी कार्यालयांची अशीच अवस्था असून, दोन-दोन, तीन-तीन दिवस काही तलाठी मंडळी कार्यालयाकडे फिरकत नसल्याची ओरड शेतकऱ्यांमधून होत आहे. संबंधितांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन शेतकऱ्यांना सुलभपणे पीककर्ज मिळवून देण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.
...अन् वृद्ध शेतकऱ्याला अश्रू अनावर
गिलोरी येथील एक वृद्ध शेतकरी सकाळी अकरा वाजतापासून मोताळा तलाठी कार्यालय परिसरात ठाण मांडून बसले होते. सायंकाळी रिकाम्या हाताने परत जात असताना, त्यांना अश्रू आवरता आले नाही. दरम्यान, स्वाभिमानीचे महेंद्र जाधव व इतर शेतकऱ्यांनी त्यांना धीर दिला.
घरपोच सातबाराचा नुसता गवगवा
मागील महिन्यात मोताळा तालुक्यातील शेतकऱ्यांना महसूल यंत्रणेने घरपोच सातबारा आणि नमुना आठ अ वाटप करण्याचा उपक्रम हाती घेतला होता. वास्तविक तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांना अजूनही सातबारा व आठ अ मिळाला नसल्याचे समजते. महसूल यंत्रणेने घरपोच सातबारा वाटपाचा नुसता गवगवा केल्याची संतप्त प्रतिक्रिया शेतकऱ्यांमधून उमटत आहे.
उपाशीपोटी ताटकळत बसावे लागले
मोताळा तलाठी कार्यालय सकाळपासून बंद असून, शेतकऱ्यांना उपाशीपोटी ताटकळत बसावे लागले. मी तीन चकरा मारल्या, परंतु तलाठी आलेच नाहीत. सध्या पेरणीचे दिवस असून, शेतकरी पीककर्जासाठी वणवण भटकत आहेत. प्रशासनाने याकडे लक्ष देऊन शेतकऱ्यांची समस्या तातडीने सोडविण्याची गरज आहे.
-महेंद्र जाधव, जिल्हा उपाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना
महसूल यंत्रणेची चालढकल
तहसीलदार व्ही.एस. कुमरे यांच्याकडे शेतकऱ्यांची व्यथा मांडली असता, त्यांनी तलाठ्यांशी बोलतो, मंडळ अधिकाऱ्यांना पाठवतो, असे सांगितले. तासाभरानंतर मंडळ अधिकारी त्याठिकाणी पोहोचले. त्यांनी शेतकऱ्यांची नावे लिहून घेतली व उद्या कागदपत्रे देण्याची व्यवस्था करतो, असे सांगून वेळ मारून नेली. त्यामुळे शेतकऱ्यांचा भ्रमनिरास झाला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.