कोरची(जि. गडचिरोली) : कोरची तालुक्यात मागील अनेक महिन्यांपासून विजेचा लपंडाव सुरू असून दूरसंचारसेवेची तीनतेरा वाजले आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भारत संचार निगम लिमीटेड व महावितरण कंपनीबद्दल प्रचंड रोष व्यक्त होत आहे.
कोरची हे तालुक्याचे ठिकाण असून येथे नगरपंचायत असूनसुद्धा स्वातंत्र्याच्या 73 वर्षांनंतरही तालुक्याची पाहिजे तशी प्रगती झालेली दिसत नाही. आजच्या विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगाला बघता मोबाईल, इंटरनेट नेटवर्क व वीज यासुद्धा मानवाच्या गरजा झाल्या आहेत.
केंद्र शासनाकडून डिजिटल इंडियाचे उपक्रम राबविले जात असूनही तालुक्याचे डिजिटल इंडियाशी काही घेणेदेणे नसल्याचे दिसून येत आहे. लॉकडाउनमुळे कित्येक व्यापाऱ्यांचे नुकसान झाले असून कित्येक लोकांवर उपासमारीची पाळी येऊन ठेपली आहे.
लॉकडाउननंतर दुकाने तर सुरू झाली परंतु मोबाईल विक्री व दुरुस्ती, इलेक्ट्रिक दुकाने, झेरॉक्स, ऑनलाइन क्लासेस अशा कित्येक व्यावसायिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. अचानक वेळोवेळी होणाऱ्या विजेच्या ट्रिपमुळे महागड्या मशीन्सवरसुद्धा वाईट परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे. दळणवळणाची साधने नसल्यामुळे विविध क्षेत्रांतील जनतेला कार्यालयीन कामाकरिता बहुतेकदा तालुक्यात पायीच अंतर कापावे लागते.
परंतु वीजपुरवठा खंडित होण्याच्या समस्यांमुळे कित्येकदा यांना निराशेने परतावे लागत असल्याचे दिसून येत आहे. कोरची तालुक्यात बीएसएनएल हा एकमेव पर्याय असून नागरिकांना मिळणाऱ्या सेवेच्या नावावर फक्त खुली लूटमार होत आहे. कारण ग्राहकांकडून पैसे तर पूर्ण महिन्याचे घेतले जातात. परंतु सेवा नाममात्र दिली जात आहे.
वीजबिलामध्येसुद्धा अव्वाच्या सव्वा वाढ करण्यात आली. परंतु तिथे पण ढिसाळ कारभार आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे डासांचे प्रमाण वाढले आहे, साप, विंचवासारखे धोकादायक जीव बाहेर पहायला मिळतात. यापूर्वीही या विषारी सरीसृपांमुळे नागरिकांच्या जिवावर बेतले आहे. काही दिवसांपासून नेटवर्कचे जाणे-येणे सुरू नेहमीच असते. त्याचा परिणाम प्रत्येक कार्यालयात होत आहे.
तालुक्यातील समस्यांबद्दल विचारणा केल्यास हा तालुका वनसमृद्ध असल्यामुळे नेहमी ही समस्या येत असल्याचे सांगितले जाते. तर मग तंत्रज्ञानाचा उपयोग कोरची तालुक्यासाठी नाही का, असा प्रश्न पंचायत समिती सदस्य कचरी काटेंगे यांनी विचारला आहे. यासंदर्भात त्यांनी पत्रक प्रसिद्धीस दिले असून बीएसएनएल व महावितरणच्या कारभारावर सडकून टीका केली आहे. महावितरण कंपनीने वीजपुरवठा सुरळीत करावा व बीएसएनएलने सेवा तत्काळ सुरू करावी, अशी मागणी पंचायत समिती सदस्य कचरी काटेंगे यांनी केली आहे.
संपादन - अथर्व महांकाळ
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.