पचखेडी/कुही (जि.नागपूर) ः कुही तालुक्यातील पचखेडी येथील प्रगतशील शेतकरी मोरेश्वर बाळबुधे यांनी 19 एकरांत मिरची लावली. त्यांना तीन तोडणीत सात लाखांचे मिरचीचे उत्पादन झाले. यासाठी त्यांना कृषी विभागामार्फत घेतलेल्या ठिबक सिंचन योजनेचा शंभर टक्के फायदा झाल्याचे मोरेश्वर यांचे म्हणणे आहे.
सध्या कुही तालुक्यातील शेतकरी हा ओल्या दुष्काळाच्या संकटात सापडला आहे. अशा परिस्थितीत कृषी विभागाचे मार्गदर्शन, मोरेश्वर यांची शेतीतून उत्पन्न काढण्याची जिद्द व आत्मविश्वास कृषी तंत्रज्ञानाचा वापर करून आधुनिक शेती तंत्राचा अवलंब केल्याने मोरेश्वर बाळबुधे यांना डोळ्यात भरण्यासारखे मिरचीचे उत्पादन झाले. त्यांच्या मिरचीच्या एका झाडाला अंदाजे एक ते दोन किलो मिरच्याही लागल्या आहेत. मोरेश्वर यांची मिरचीची शेती पचखेडी-वेलतूर जिल्हा मार्गावर असल्यामुळे ते पीक पाहताच कोणीही पंधरा मिनिटे थांबल्याशिवाय पुढे जात नाही.
तरूणालाही लाजवेल असा उत्साह
आतापर्यंत तीनदाच मिरच्यांची तोडणी झाली आहे. आणखी जवळपास दहा तोडण्या होतील, अशी आशा मोरेश्वर यांनी व्यक्त केली. म्हणजेच आणखी तीस लाखांचे उत्पन्न होणार हे नक्की.
मोरेश्वर यांचे वय साठ वर्षांच्या घरात आहे. पण, शेतीत राबताना तरुणालाही लाजवेल इतकी मेहनत घेतात. पारंपरिक शेतीला फाटा देऊन कृषी विभागाच्या मार्गदर्शनात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून मोरेश्वर यांनी मिरचीचे एवढे मोठे उत्पादन घेतले आहे.
तिन्ही मुलांना केले उच्चशिक्षित
मोरेश्वर बाळबुधे हे गोन्हा पुनर्वसन येथील मूळ रहिवासी. धरणात शेती गेल्याने त्यांना करमेना. मातीशी जुळलेली नाळ कायम ठेवण्यासाठी त्यांनी पचखेडी येथे मुरमाळी व गोटाळ शेती विकत घेतली. म्हणतात ना, "वाळूचे कण रगडता तेलही गळे' या म्हणीप्रमाणे त्यांनी शेतीचा प्रयोग यशस्वी केला. शेतीत यशस्वी प्रयोग करीत असताना त्यांनी त्यांच्या मुलाला उच्चशिक्षित केले. मोठा मुलगा लुलेश्वर डी. फार्म असून फार्मसी न टाकता कृषी केंद्र चालवितात. योग्य शेती करण्यास मदत करून आपल्या सभोवतालच्या शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या शेतीप्रयोगाचे धडे देतात. दुसरा मुलगा यशोधन एमबीबीएसनंतर एम.डी. करीत आहे. तिसरा मुलगा बीएएमएसला आहे. आजही उच्चशिक्षित मुले आठवड्यातून एकदा शेतीत येऊन देखभाल करतात, असे मोरेश्वर यांनी सांगितले.
मनात जिद्द, काम करण्याची तयारी असल्यास काहीही अशक्य नाही. धरती ही माता आहे. तेथूनच जन्म घेतला व तेथेच जाणार आहोत. त्यामुळे तिच्याच सान्निध्यात राहून आपली प्रगती साधायची आहे.
- मोरेश्वर बाळबुधे
प्रगतशील शेतकरी, पचखेडी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.