गडचिरोली : दु:ख, दैन्याचा नाश करत मनामनात सुख, शांती, समृद्धीचा दीप उजळणारा प्रकाशपर्व अर्थात दिपावलीला शुक्रवार धनत्रयोदशीच्या दिवशी उत्साहात प्रारंभ झाला. इतर सणांप्रमाणे या सणावरही कोरोनाची काळी छाया असली, तरी आशेची मंद का होईना एक पणती प्रत्येकाच्या मनात तेवत असल्याने अनेक नागरिक खरेदीसाठी बाहेर पडले आहेत. ग्राहकांच्या स्वागतासाठी शहरातील बाजारपेठही विविध साहित्यांनी सजली आहे.
प्रकाशपर्व दिपावलीनिमित्त कपडे, मिठाई, रांगोळी, पूजेचे साहित्य, सोन्याचे दागिने, आकाश कंदील, फटाके, सजावटीचे साहित्य, रोषणाईचे इलेक्ट्रिक दिवे, फळे, घरगुती वापराच्या वस्तू, अशा एक ना अनेक साहित्याची खरेदी केली जाते. यंदा कोरोनामुळे बाजार थंडावलाच होता. त्यामुळे दिवाळीतही ग्राहकांचा प्रतिसाद मिळेल की, नाही याबद्दल व्यापारीही साशंक होते. पण, मागील काही दिवसांत ग्राहक दुकानांच्या पायऱ्या चढू लागले असून कोरोनामुळे मरगळलेल्या बाजारपेठेत आशेची धुगधुगी निर्माण झाली आहे.
नागरिकांचा सर्वाधिक भर कापड, मिठाई, घरगुती साहित्याच्या खरेदीवर दिसून येत आहे. दिपावली हे शुभपर्व असल्याने या शुभंकर सणानिमित्त घरी एखादी वस्तू घेणे शुभ मानले जाते. त्यामुळे विविध प्रकारच्या वाहनांची खरेदीही मोठ्या प्रमाणात सुरू आहे. याशिवाय टीव्ही, फ्रिज, वॉशिंग मशिन, मिक्सर ग्राइंडर, या वस्तूचीही खरेदी होत आहे. कापड व मिठाईच्या दुकानांत ग्राहकांची वर्दळ वाढली आहे.
मागील वर्षाप्रमाणे खूप गर्दी नसली, तरी कोरोना काळातील आतापर्यंतची लक्षणीय म्हणावी अशी गर्दी बाजारात आहे. मार्चपासून प्रारंभ झालेल्या कोरोनाने काही महिने नागरिकांना घरातच बंदिस्त ठेवले होते. अनेक सण घरातच साजरे करावे लागले. अनेकांना या आजारात आपले आप्त गमवावे लागले. काहींचे नातलग, घरातील व्यक्ती आताही या आजाराशी झुंज देत आहेत. पण, आता कोरोनाच्या दहशतीलाही नागरिक कंटाळले आहेत.
आता प्रत्येक क्षण हसत साजरा करण्याकडे कल वाढला आहे. त्यामुळेच दिवाळीत थोडी का होईना खरेदी करण्यासाठी अनेकांची पावले बाजाराकडे वळत आहेत. मात्र, कोरोनाच्या काळात अनेकांचे वेतन झालेले नाही, काही जणांचे रोजगार, व्यवसाय बुडाले आहेत. म्हणून या आनंदपर्वाला अशा दु:खाची किनारही आहे.
कापड दुकानांमध्ये वाढला धोका...
दिवाळीच्या सणानिमित्त कापड खरेदी मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे बाजारातील कापड दुकानांमध्ये प्रचंड गर्दी वाढली आहे. काही दुकानांमध्ये सॅनिटायझरची सुविधा नाही. ग्राहक शारीरिक अंतराचे पालन करत नाहीत. अनेकजण मास्क वापरत नाहीत. त्यामुळे अशा दुकानांवर कारवाईची मागणी होत आहे.
संपादन - अथर्व महांकाळ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.